गावाला माणसात आणणारे पोपटराव पवार हे कधी काळी ग्रामपंचायतीची निवडणूक हरले होते.

पोपटराव बागूजी पवार, मूळचा हिवरेबाजारचा असणारा हा तरुण ८० च्या दशकात शिक्षणासाठी केडगाव या आपल्या आजोळी राहिला होता. शिक्षणात हुशार होता. पण क्रिकेटचा नाद भयंकर. आणि तो फक्त बघण्यापुरता नव्हता तर खेळण्यासाठी पण होता. त्यातून तालुका, जिल्हा, महाराष्ट्र अशा संघांकडून क्रिकेट खेळाला होता.

याच काळात केडगावतील तरुण मित्रांनी मैदानाच्या प्रश्नामुळे एकत्र येत पोपटराव पवारांना सरपंचपदाची निवडणूक लढायला लावली. त्यांनी ती लढवली सुद्धा, पण पहिल्याच घासला खडा लागला. निवडणूक हारले. परत शिक्षण आणि क्रिकेटवर लक्ष द्यायला सुरुवात केली.

शिक्षण संपवून पोपटराव आपल्या गावी हिवरेबझारला परतले. त्यावेळी गावची अवस्था म्हणजे हजारभर लोकसंख्येचं गाव. तिथं पाऊस पडत होता- इनमीन ३०० मिलिमीटर. पण म्हणजे किती? तर वाळवंटी राजस्थानइतका किंवा इस्रायलमध्ये पडतो इतकाच. काही वर्षी तर त्याच्यापेक्षाही कमी! १९७२ च्या दुष्ष्काळात तर ग्रामस्थांनी गाव सोडलं होत. 

त्यामुळे जमिनीची धूप आणि जोडीला दुष्काळ, जनावरांच्या चाऱ्याचे वांदे, गावातील शेतकरी जुगार खेळत असायचा. गावातच दारूच्या वीस भट्या होत्या. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. काही लोकांचा तर तो उत्पन्नाचा मार्गच झाला होता. अगदी एका बाटलीवर गावात लग्न जमायची.

हिवरेबझार मध्ये पवार यांचे बाबा पवार नावाचे नातेवाईक होते. ते हा सगळा बदल करायला प्रयत्न करत होते. पोपटरावांनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं. पण गाव एवढं आपल्याच नादात होत की त्यांनी दोन्ही पवारांना विरोध सुरु केला. रागातून गावाबाहेर देखील काढलं. त्यावेळी पवार आणि बाबा पवार हे हिवरेबाजारजवळच्या ‘तास’ या गावात राहायला आले. तिथूनच दोघांनी मिळून गाव सुधारण्याचा विचार केला.

पुढे गावात परतले. पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. १९८९ साली पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पोपटराव उभे राहिले. ग्रामपंचायतीवर निवडून आले. ग्रामसभेच्या वेळी पोपटरावांनी त्यांच्या गावातल्या विकासासाठी काही योजना सांगितल्या. लोकांनी त्यांना एकमतानं सरपंच म्हणून निवडलं.

आणि हिवरेबाजारची माणसात यायची वाटचाल चालू झाली.

पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, शेतीसाठी पाणी, शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, रस्ते, वीज, नोकरी-धंदा, सोशल, कल्चरल ऑक्टिव्हिटीज. हे काही मुद्दे घेतले. या मुद्यांच्या आधारे १९९० ते १९९५ या पाच वर्षांसाठी योजना तयार केली. त्यात प्राधान्य शिक्षणाला दिलं.

त्यातून शाळा आणि व्यायामशाळा दोन्हींची दुरुस्ती करायची ठरली. पण जेव्हा ग्रामपंच्यातीचं खात बघितलं तेव्हा त्यात अवघे १४ हजार रुपये होते. आणि ते पण रोजगार हमी योजनेचे. त्यामुळे ते इतर कामाला वापरता येणार नव्हते. मग यावर शक्कल लढवत आधी गावात वृक्षारोपण केलं. या कामांची बिलं काही मुलांच्या नावावर काढली आणि ते पैसे पुन्हा खात्यात जमा केले. त्याच पैशातून शाळेचा पत्रा आणि व्यायाम शाळेत साहित्य घेतलं.

अशा पद्धतीने तेव्हा पासून प्रत्येक अडचणींवर मात करत, काही तरी शक्कल लढवत मार्ग काढत प्रवास चालू ठेवला. विकाकामासाठी निधी मिळवायचा म्हणजे महाअवघड काम. पण पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवून गावातील पाण्याचा प्रश्न हाताळला.

गावातल्या सगळ्या घरांना एकच रंग दिला! एखाद्याच्या शेतात जे काम करायचं असेल, उदाहरणार्थ खुरपणी, पेरणी, कापणी इत्यादी, ते काम गावातील सर्वजण मिळून करतात. त्यामुळे एकतर ते काम लवकर होतं, त्याशिवाय मजुरीचे पैसेही वाचतात. नशाबंदी करून कार्यक्षमता वाढवली. कुटुंबनियोजनचा अवलंब केल्यामुळे, जन्मदर दर हजारी अकराइतका कमी झाला.

अशा बारीकसारीक गोष्टीतून पैसे वाचवून विकासासाठी निधी मिळवला. दुसरीकडे त्यांनी शासनाकडून योजना मंजूर करून घेण्यात यश मिळवलं.

आज गाव कसं आहे?

आज गावाच्या वीजपुरवठ्याची व्यवस्था चांगली आहे. स्वतंत्र सबस्टेशन आहे. तिथून दोन वेगळे फीडर घेतले. शेतीसाठी एक आणि घरांसाठी एक. त्यामुळे आकडे टाकून वीजेची चोरी बंद करून शंभर टक्के मीटर बसवले गेले.

गावात चहाची टपरी एकही नाही. गावात दवाखाना नाही. हिवरेबाजारापासून तीन किलोमीटर अंतरावर जखनी गावात हॉस्पिटल आहे. दोन किलोमीटरवर वालकी गावात दोन डॉक्टर आहेत. अहमदनगर पण सतरा किलोमीटर अंतरावर आहेच. लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

गावात कुर्‍हाडबंदी अमलात आल्यामुळे झाडांची संख्या वाढली. तिथं नऊ लाख झाडं आहेत. 

गावात पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या आहेत. डोंगरावरून आलेलं पाणी, चर खणून जमिनीत जिरवण्याची व्यवस्था केली आहे, वरून येणारं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले आहेत, तलाव तयार केले आहेत. त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी सत्तर–ऐंशी फुटांवरनं वीस-पंचवीस फुटांपर्यंत आली आहे. गावात भरपूर पाणी आहे. लोकांची व शेतीची गरज भागूनही पाणी शिल्लक राहतं.

स्त्रियांसाठी बचत गटाची स्थापना, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, दुधाच्या डेअरीची सोसायटी, भजनी मंडळ असे उपक्रम चालू केले आहेत. टेलरिंग, सुतारकाम, डेअरी व्यवसाय अशा मुळे रोजगार पण मिळाले. गावातल्या दुधाचं उत्पादन दिवसाला तीनशे लिटर्सवरून तीन हजार लिटर इतकं वाढलं आहे.

‘हिवरेबाजार’ मध्ये या गोष्टींना पूर्ण बंदी आहे :

१. शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेलचा वापर कोणीही करायचा नाही. तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करायचा.
२. ज्या पिकांना भरपूर पाणी लागतं अशी पिकं…. उदाहरणार्थ ऊस, केळी लावायची नाहीत.
३. आपली जमीन, गावाबाहेरच्या परक्या माणसाला विकायची नाहीत.

त्यामुळेच ते आपल्या गावच अभिमानानं वर्णन करतात,

सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव
माझ्या गावात व्यसनाचा वास नाही
इथं कोणीही अक्षरआंधळा नाही.
गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल
घराघरात एक नाही तर दोनच मुलं.
गावचं माळरान बारा महिने हिरवंगार
दावणीतच गावची जनावरं खाती चारा
गावकर्‍यांनी श्रमदानानं बांधल्या वाटा
बारा महिने धनधान्याचा असतो साठा

पोपटराव पवार म्हणतात, आपल्याकडे संसाधनं भरपूर आहेत, अभाव आहे तो शिस्तीचा व नियोजनाचा. आणि आम्ही नेमक तेच काम नीट केलं.

पोपटराव पवार यांच्या याच शिस्तीमुळं आणि नियोजनामुळे कदाचित एकशेबावीस देशांच्या प्रतिनिधींनी हिवरेबाजारला भेट दिली आहे. आणि ते देखील ३० वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. आता आज लागलेल्या ग्रामपंचात निवडणुक निकालात ७ ही जागांवर पोपटराव पवार यांच्या पॅनलने विजय मिळवून ते पुन्हा एकदा सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याच्या मार्गावर आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.