सोलापूरचा शेतकरी इरेला पेटला अन् द्राक्षातला हापूस ‘सोनाका’ तयार केला.

फेब्रुवारी परतीला लागला. उन्ह तापायला सुरवात झाली. आपण बाजारात द्राक्षे विकत घ्यायला जातो. सगळ मार्केट फिरल्यावर एकेठिकाणी आपल्याला द्राक्षे आवडतात. लांबसडक पिवळसर हिरवां रंग, गच्च भरलेला घड बघून आपण दराची चौकशी करतो. दर सांगायच्या आधी तिथला विक्रेता द्राक्षाचा एक मणी खायला देतो. द्राक्षाची ती गोड चव आपल्याला स्वर्गसुखाची आठवण करून देते.

तो विक्रेता आपल्याला अभिमानाने सांगतो.

द्राक्षं साधी नाहीत. सोनाका आहेत.

जसा आंब्याचा राजा हापूस तसा द्राक्षांचा राजा सोनाका अस म्हटल तर चुकीच ठरणार नाही.

आता हे सोनाका नाव वाचून आपल्याला हा वाण फोरेनचा आहे असं वाटेल. पण हा द्राक्षांचा राजा फोरेनचा नाही तर अस्सल मराठी आहे. तेही आपल्या सोलापूरच्या नान्नजचा. त्याच्या नावाची स्टोरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

उत्तर सोलापूर तालुका म्हणजे दुष्काळी भाग. पावसाची कमतरता हा या भागासाठी शाप आहे पण त्याच शापाचा इथल्या शेतकऱ्यांनी वरदानात रुपांतर केल ते द्राक्ष शेतीमुळे.

पण त्याची खरी सुरवात केली नान्नजच्या द्राक्ष पंडित नानासाहेब काळे यांनी. साल होत १९५८

द्राक्ष शेती त्यांच्यासाठी नवीन होती. सुरवातीला अपयश येत होतं. हव तस उत्पन्न मिळत नव्हत. तरी शिकायची जिद्द जबरदस्त होती. तो बी-वाल्या द्राक्षांचा काळ होता. वेगवेगळ्या देशी वाणाची द्राक्ष सर्वत्र असायची. अशातच एकदा नानासाहेबांना  कुठून तरी त्यांना कळाल की बारामतीला एका शेतकऱ्यानी सीडलेस जातीची द्राक्षे पिकवली आहेत.

नानासाहेब काळे ते पाहायला म्हणून बारामतीला गेले ते येताना इथून द्राक्षाची काडी घेऊन आले. या द्राक्षाच नाव थॉमसन सिडलेस.

खाण्यासाठी, बेदाणे -वाईन निर्मिती अशा बहुउद्देशीय कामासाठी या द्राक्षांचा वापर होतो. जगभरातली ही सर्वात फेमस जात. नानासाहेबांनी ही जात नान्नजच्या  द्राक्षमळ्यात आणली. २५-३० एकरात त्याच उत्पादन सुरु केल. निगुतीने द्राक्षे जपले. तय्च्या पाण्याच नियोजन औषधाच नियोजन सगळी काळजी घेतली.

हळूहळू त्यांना यश मिळू लागल. नानासाहेब काळेंचं प्रगतीशील द्राक्ष बागायतदार शेतकरी म्हणून नाव झाल. त्यांचं पाहून त्या भागात बऱ्याचजणांनी द्राक्ष शेती सुरु केली. प्रमुख द्राक्ष उत्पादन घेणारा तालुका म्हणून उत्तर तालुका ओळखला जाऊ लागला.

बरीच वर्षे उलटली. नानासाहेबांनी पोटच्या पोराप्रमाणे या द्राक्षमळ्याकडे लक्ष देऊन वाढवलं होतं. द्राक्षात होणारा छोटासा बदल, कोणताही रोग पडायची सुरवात त्यांच्या चटकन लक्षात यायची. असच एकदा मळ्यात फेरी मारत असताना त्यांना लक्षात आलं की द्राक्षांच्या घडापैकी काही घड असे आहेत ज्याचे मणी लांबीने जास्त आहेत. काही विशिष्ट वेलीला हे घड लागतात.

वळपास दोन तीन वर्ष सलग हा अनुभव आल्यावर त्यांच्या लक्षात आलं ही वेगळी जात आहे. त्यांनी या वेलीच्या काड्या काढल्या आणि त्यांची उत्तम दर्जाची द्राक्षे पिकवली. हीच ती सोनाका द्राक्षे. साल होतं १९७८.

कोणतीही अॅग्रीकल्चरवाली डिग्री नसलेला पण रानातच अनुभवातून कृषितंत्र शिकलेला हा अस्सल मातीतला शेतकरी. त्यांनी या गोड द्राक्षाला नाव दिल तेही आपल्या वडिलांचं. सो म्हणजे सोनबा, ना म्हणजे नानासाहेब आणि का म्हणजे काळे. सोनाकाच्या पहिल्या दोन अक्षरामागे सोलापूर जिल्हा आणि नान्नज गाव यांचाही कल्पक सबंध जोडला होता.

नानासाहेब काळेंनी आपल्या वडीलांचं नाव अजरामर केलं आणि आपल्या गावाला जगाच्या नकाशावर नेऊन पोहचवल. अख्ख्या भारतातच नाही तर बाहेरच्या देशातही सोनाका द्राक्षे फेमस आहेत. द्राक्षपंडित नानासाहेब काळे यांचा या क्षेत्रातील दबदबा पाहून त्याकाळच्या सरकारने त्यांची युरोप दौऱ्याला जाणाऱ्या एका टीममध्ये निवड केली.

शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युरोपमधून आणलेल्या जांभळ्या द्राक्षाच्या वाणाला त्यांचच नाव दिल. हेच ते शरद सिडलेस.

पुढे द्राक्षमहर्षी नानासाहेब काळे यांचा वारसा त्यांचे सुपुत्र कृषिभूषण दत्तात्रय काळे व सारंग काळे यांनी पुढे चालवला.

आजही नान्नजच्या सोनाका फार्मवर द्राक्षाच्या नवीन जाती निर्माण करण्याकडे भर दिला जातो. २००४ साली दत्तात्रय काळेंनी आपल्या मातोश्री सरिता काळे यांच्या नावे काळ्या रंगाच्या लांबट द्राक्षमणी  असलेल्या  (सरिता) सिडलेस या वाणाची निर्मिती केली व पुढे द्राक्षमहर्षी कै. नानासाहेब काळे यांच्या नावाने अंडगोलाकार मोठ्या आकाराच्या, पर्पल रंगाचे (नानासाहेब) पर्पल सिडलेस या नावाचे विकसित वाण २००८ साली तयार केली. आजही या द्राक्षांच विक्रमी उत्पादन घेतलं जात.

आईवडीलांचे नाव द्राक्ष वाणाला देऊन त्यांना अजरामर करण्याची परंपरा चालू ठेवणाऱ्या कृषिभूषण दत्तात्रय काळेंनी बोल भिडूशी खास बातचीत केली.

तेव्हा आम्हाला समजल की सरिता पर्पल आणि नानासाहेब पर्पल या सिडलेस द्राक्ष वाणांना नुकताच पीकवाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. एकाचवेळी द्राक्षांमध्ये दोन वाणांना स्वामित्व हक्क मिळवणारे दत्तात्रय काळे हे देशातले पहिले शेतकरी ठरले.

हे स्वामित्व हक्क मिळाल्यामुळे इतर कोणालाही श्री. काळेंच्या परवानगी शिवाय परस्पर या द्राक्ष वाणाच्या रोपांची निर्मिती, खरेदी विक्री, आयात निर्यात करता येणार नाही.

आज आपल्याला द्राक्षाचे वाण दिसते पण ते शोधून काढण्यासाठी, एका द्राक्षाच वाण तयार करण्यासाठी अखंड तपश्चर्या केल्याप्रमाणे सात आठ वर्षे कष्ट घ्यावे लागतात याची आपल्याला कल्पना नसते. 

आता ते दनाका म्हणजे दत्तात्रय नानासाहेब काळे या वाणाच्या स्वामित्व हक्कासाठी प्रयत्न करत आहेत. दत्तात्रय काळे यांना शासनाचा कृषिभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. मागच्याच वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

  • भिडू भूषण टारे

हे ही वाच भिडू