लोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींनी पुन्हा सत्ता मिळवून दाखवली…

२०१९ च्या निवडणूक झाल्या आणि भाजपनं २०१४ पेक्षाही चांगलं यश मिळवलं. भाजपचा हा वारु जसा लोकसभेत दौडत होता अगदी तसाच वेगवेगळ्या राज्यांमध्येही. साहजिकच कित्येक राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, तर कुठं युती-आघाडीची गणितं जुळवुन सत्तेचा भाग व्हावं लागलं. आम आदमी पार्टी सारख्या पक्षानंही काँग्रेसला दिल्ली आणि पंजाबमध्ये चित केलं.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही गाजली. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेस पुन्हा भरारी घेणार का अशी चर्चाही होऊ लागली. आता काँग्रेसचा विषय पुन्हा चर्चेत आलंय, काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनी केलेल्या विधानामुळं.

‘माझ्या राजकीय प्रवासाचा समारोप भारत जोडो यात्रेनं होऊ शकतोय, याबद्दल मला आनंद आहे’ असं वक्तव्य त्यांनी केलं आणि सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार का ? याची चर्चा सुरु झाली.

सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासाची जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा २००४ ची निवडणूक चर्चेत येईल.

१९९६, १९९८ आणि १९९९ या तिन्ही निवडणूकांमध्ये कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. पण सोनिया गांधींच्या टीमने असा काही प्रचार केला कि, अख्ख चित्र पालटलं. 

२००४ चं ते सालं.

यावेळी सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ९९ साऊथ अव्हेन्यू आणि ८० लोधी इस्टेस्ट या पत्त्यांवर काँग्रेसच्या दोन वॉर रूम उदयाला आल्या.

९९ साऊथ अव्हेन्यूची सदनिका सुरुवातीला काँग्रेसचे राज्यसभा खासदार आर.पी.गोएंका यांच्याकडे होती. पक्षाच्या कामकाजासाठी ही सदनिका सोनिया गांधींच्या ताब्यात देण्यात आली. या सदनिकेचा वापर पक्षाचे, धोरण, नियोजन, माहिती आणि सुसूत्रतेसाठी काम करणाऱ्या विभागासाठी करण्याचे सोनियांनी ठरवले. 

यांनतर दररोजच्या कामकाजासाठी जयराम रमेश, जनार्दन द्विवेदी, सलमान खुर्शीद आणि इतर काही जणांच्या टीमचा तळ ९९ साऊथ अव्हेन्यूवर पडला. त्याआधी काँग्रेसच्या थिंक टॅंकच्या बैठका या सदनिकेत व्हायच्या.

परंपरागत पद्धतीने निवडणुकांचं मॅनेजमेंट हाताळण्याची पद्धत ९९ साऊथ अव्हेन्यूच्या वॉर रूमने बाद केली आणि व्यवसायिक पद्धतीने, कॉर्पोरेट कामकाज पद्धतीचा त्याला नवा चेहरा दिला. पक्षाच्या प्रचार मोहीमसाठी मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या लिओ बार्नेट आणि परफेक्ट रिलेशनसारख्या फेमस कंपन्यांची मदत घेण्याचं काँग्रेसने ठरवलं.

पण अवघ्या २० कोटी रुपयांच्या किरकोळ बजेटमध्ये भाजपच्या तोडीसतोड देणारा प्रचार आपण करू शकणार नाही, असा अंदाज कॉंग्रेस नेत्यांना होता. त्यामुळं महाप्रचाराच्या नादी न लागता आपलं सगळं लक्ष वेगवेगळ्या विभागांच्या प्रादेशिक रणनितीवर केंद्रीत करण्यात आल.

जयराम रमेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं की,

मार्च ते मे २००४ या तीन महिन्यात कॉंग्रेसने देशातल्या विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून तीन हजार जाहिराती प्रसिद्ध केल्या. ज्यातल्या ८० टक्के जाहिराती या प्रादेशिक भाषेतल्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या.

कॉंग्रेसच्या या प्रचार मोहिमेवर सोनिया गांधी बारकाईने नजर ठेवून होत्या. कॉंग्रेसच्या वॉर रूम नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधकांचे ‘हाय प्रोफाईल’ कँपेन अतिशय साध्या रणनीतीने उलथले. निवडक स्थानिक पक्षांशी आघाडी केल्यामुळे संख्याबळाच्या अंकगणितात तर भर पडली, पण त्याचबरोबर आक्रमक प्रचार मोहिमेचे रसायनही जुळत गेले.

लिओ बर्नेट जाहिरात एजन्सीने सगळ्या प्रचार मोहिमेची सूत्र ‘आम आदमी’ या शब्दाभोवती केंद्रित केले. काँग्रेसच्या प्रचाराने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गुजरातचा भीषण हिंसाचार, कारगील युद्धातला शवपेट्यांचा भ्रष्टाचार, यूटीआईचा घोटाळा, वाढती बेरोजगारी या सारख्या संवेदनशील विषयांना अधोरेखित केले.

लिओ बर्नेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शर्मा आणि कार्यकारी संचालक जयश्री सुंदर यांनी एक परिणाम कारक गोष्ट शोधून काढली की,

भाजपचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या जीवनमानात फारसा बदल न घडल्याची भावना लोकांच्या मनात आहे. देशातल्या आम आदमीच्या मनात मे २००४ पूर्वी भाजपच्या शायनिंग इंडियाच्या संकल्पनेत आपण कुठेही नाही, अशी मानसिकता तयार झाली.

असे म्हटले जाते की, मतदारांची नेमकी मनोभूमिका सोनियांना उमजली. त्यामुळे एका झेपेत देशभरातल्या जनसमूहांच्या त्या ब्रँड बनल्या. सामान्य जनतेनेही ब्रँड म्हणूनच त्यांचा स्वीकार केला. ज्या ब्रँडचे महत्त्वाचे सूत्र होते, आश्वासने कमी आणि प्रत्यक्ष कृती जास्त.

प्रचार सभांमधून अत्यंत नेटाने जोर देत सोनिया एकाच प्रश्नावर बोलायच्या, ‘जरा शांतपणे मनाशी विचार करा तुम्ही खरोखरच मनापासून आनंदी आहात? तुमच्या अवती भोवतीचा भारत खरोखर तुम्हाला झगमगताना दिसतोय?

जनसामान्यांच्या मनाशी आपली तार जोडण्यासाठी रोड शो चे माध्यम अतिशय उपयुक्त आहे असे सोनियांना जाणवले. आंध्रप्रदेशच्या विजयवाडात त्या प्रचारासाठी पोहोचल्या. तोपर्यंत देशभर लोकांच्या मनात बदलाची हवा आहे याची सोनियांना खात्री पटली होती.

सोनिया यांची भाषणे तयार करणाऱ्यांनी ही कसून होमवर्क केला होता. शासनाच्या अपयशावर बोट ठेवणारी परिणाम कारक वाक्य विशेषतः ग्रामीण भारताचा विकास आणि दारिद्र्य निर्मूलन या कार्यक्रमांकडे सरकारने कसे दुर्लक्ष केले याचे उदाहरण देत, आकर्षक शब्दप्रयोगांनी त्यांची भाषणे रंगवली.

याच दरम्यान,

भाजपच्या शायनिंग इंडियाला प्रत्युत्तर देणाऱ्या घोषणेचा शोध सुरू होता. कॉंग्रेसचा थिंक टँक ‘कॉंग्रेसका हाथ गरीबी के साथ’ या घोषणेपर्यंत येऊन पोहोचला. मात्र, राहुल गांधींनी त्यात ऐन टायमाला बदल केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत गरीब शब्दाऐवजी ‘आम आदमी’ या शब्दाचा प्रयोग करावा आणि ‘कॉंग्रेस का हात आम आदमी के साथ’ अशी घोषणा द्यावी असा आग्रह राहुल गांधींसह जयराम रमेश, जनार्दन द्विवेदी यांनी धरला.

महिनाभर चाललेली प्रचार मोहीम अखेर १० मे २००४ रोजी संपली. सोनिया आणि त्यांचे निकटचे सल्लागार यांच्यासाठी मात्र थकवा आणणारी आणखीन एक फेरी बाकी होती.

एकूण परिस्थितीचा आढावा घेणे, वृत्तवाहिन्यांनी चालवलेले निवडणुकीचे विश्लेषण ऐकणे, या गोष्टींनी १० जनपथला आणि ९९ साऊथ अॅव्हेन्यूला पछाडले होते. अंबिका सोनी, जयराम रमेश, अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस आणि सलमान खुर्शीद यांची टीम दिवसातले सलग वीस तास तिथे बरोबर असायची.

निवडणूक संपली आणि कॉंग्रेस १४५ जागांवर निवडणूक आलं. आता मागच्या दोन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारलेल्या काँग्रेसला सोनिया गांधी नवी उभारी मिळवून देणार का ? याचीच चर्चा आता त्यांच्या या वक्तव्यामुळं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.