या माणसाने मध्यस्ती केली म्हणून सोनिया गांधी भारताच्या सुनबाई बनल्या..!

एक व्यक्ती गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर विना व्हिसा उतरते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांमार्फत त्याला ताब्यात घेतलं जातं. कारवाई करून त्याला पून्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया चालू केली जाते.
तेव्हा ती व्यक्ती म्हणते,

मला फक्त एक फोन करण्याची परवानगी द्या..

ती व्यक्ती फोन करते..

पुढच्याच क्षणी, त्या व्यक्तीचा पाहूणचार करण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवरील इमिग्रेशन अधिकारी धावू लागतात. पंतप्रधान कार्यालयातून खास फर्मान सोडलं जातं. ७ रेसकोर्सकडे जाणारे रस्ते मोकळे केले जातात. त्या व्यक्तीला घेवून जाण्यासाठी गाड्याचा खास ताफा मागवला जातो.

ती व्यक्ती मस्तपैकी कोका कोला पित पंतप्रधानांच्या घरी पाहूणचार घेण्यासाठी जाते…

असा कोण होता तो माणूस ?

तर हा माणूस होता राजीव आणि सोनियांच्या गांधीच्या प्रेमात मध्यस्थी करणारा. राजीव गांधीची पहिली चिठ्ठी ज्यानं सोनिया मायनो यांना दिली तो चार्लस अॅंथनी..

सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या प्रेमात मध्यस्थी करणारा चार्लस अॅंथनी.

युरोपातलं उच्चभ्रू आणि प्रतिष्ठीत समजलं जाणारी केंब्रिज युनिव्हर्सिटी.

याच केंब्रिज विद्यापीठात इंग्लीश भाषेचं ज्ञान देणारी “लेनॉक्स स्कुल अॉफ लॅंग्वेजेस” संस्था आहे. यामध्ये १९६५ साली सोनिया मायनो शिकत होत्या. इटलीतून आलेल्या सोनिया मायनो यांना मुळातच केंब्रिज हे एक उदास शहरं वाटत होतं.

एका संध्याकाळी सोनिया मायनो केंब्रिजच्या सेंट अॅंड्रयूज रोडवर असणाऱ्या मौसुका बद्दल खास प्रसिद्ध असणाऱ्या व्हर्सिटी या ग्रीक रेस्टारंटमध्ये पोहचल्या. या हॉटेलचा मालक चार्लस अॅंथनीनं सोनियांच स्वागत केलं.

सोनियांना त्यांची नेहमीची खिडकीशेजारची जागा हवी होती पण ती रिकामी नसल्यानं चार्लस त्यांना साऱ्या रेस्टारंट मधून हिंडवत, एका रांउड टेबलला क्रॉस करत पुढे घेवून जावू लागलां.

याच राऊंड टेबलवर तरुणांचा एक गट राजकारणावर तावातावाने चर्चा करत बसलां होता. या तरुणांच्या गटात भारत पाकिस्तान आणि जागतिक राजकारणावर मोठ्या मोठ्या चर्चा चालू होत्या.

भारत पाकिस्तानच्या तरुणांच्या गटात संजय गांधी, दिप कौल, तारिह जहांगिर, सईद मेहमुद, सुहेल इफ्तेकार अश्या भविष्यातील बड्या बड्या हस्ती बसलेल्या होत्या. सोनियांची नजर या टोळक्यातील एका तरुणावर खिळली. तेव्हा तो तरुण देखील चर्चा विसरत आपल्याकडेच एकटक पाहत असल्याचं सोनियांच्या लक्षात आलं.

चर्चेत असणाऱ्या सर्वांनाच हि गोष्ट लक्षात आली तसा सोनिया आणि राजीव यांचा कॉमन मित्र असणाऱ्या क्रिश्चनने त्यांची तोंडओळख करू दिली. सोनिया आपल्या नेहमीच्या जागेवर गेल्या इतक्यात राजीव यांनी टेबलवरच असणारा ट्रिश्यू पेपर घेतला.

त्यावर सुंदर अक्षरात कवितेच्या ओळी लिहून त्यांनी रेस्टारंटचा मालक चार्लस अॅंथनीला बोलवलं, त्याला राजीव गांधीनी सांगितलं,

हि चिठ्ठी सोनियाला दे आणि सोबतीला झकास सोलो म्युझिक लावं.

या घटनेनंतर सोनिया आणि राजीव गांधी वारंवार भेटू लागले ते एकत्र सिनेमाला जातं. या काळातच त्यांनी एकत्र पाहीलेला पहिला सिनेमा होता सत्यजित रे यांचा पाथेर पांचली. या भेटीत सोनियांना कल्पना नव्हती की गांधी घराण्याला भारतातील राजकारणात नेमकं कोणतं स्थान आहे.

त्याचं हे प्रेम केंब्रिजच्या काठावर बहरत होता. पुढच्या तीनचं वर्षात सोनिया मायनो या सोनिया गांधी झाल्या. काळांतराने त्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आल्या, दुर्दैवाने सोनिया गांधी देखील फेकन्यूजच्या राजकारणाच्या बळी ठरल्या. त्या नाईट कल्बमध्ये नाचायच्या यांसारख्या दुर्देवी बातम्या त्यांच्याविरोधात पेरल्या गेल्या.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.