सोनिया गांधींनी सुवर्ण मंदिरात जाऊन शीख दंगलीबद्दल माफी मागितली होती.

१९८४ या वर्षात भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या धार्मिक उन्मादाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्याला संपवण्यासाठी ६ जून १९८४ पवित्र शिखांच्या धार्मिक भावनांना छेद देत भारतीय सुरक्षा एजन्सीने ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ पुर्ण केले. सुरक्षा एजन्सीच्या मते फुटीरतावादी ताकदींशी लढण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.

मात्र भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह ऑपरेशन असं आजही याचं वर्णन केलं जात.

याच भयावह ऑपरेशन ब्लू स्टारचा परिपाक म्हणून चिडलेल्या आत्मघातकी शीख अतिरेक्यांनी पुढच्या ४ महिन्यांमध्येच म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली. या हत्येमागे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर केलेल्या लष्करी कारवाईची पार्श्वभूमी होती.

ज्यांनी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या ते त्यांचेच शीख बॉडीगार्ड होते. यामुळे शीखांच्या विरुद्ध संपूर्ण देशभर जनभावना भडकल्या आणि त्याची परिणिती १९८४च्या शीख दंगलीमध्ये झाली.

इतिहासातील काळे पान.

दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात हजारो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गोंधळ घालत आहेत हे दृश्य पाहायला मिळाले होते. सरकारी आकडेवारी सांगते की, जवळपास २७०० शीखांच्या कत्तली करण्यात आल्या. काँग्रेस नेत्यांनी दिल्ली आणि पंजाब अक्षरशः पेटवला होता.

नवनिर्वाचित पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या या दंगलीचे समर्थन केले होते. पुढे बरेच वर्ष काँग्रेसच्या मानगुटीवर हे दंगलीचे भूत कायम राहिले. अनेकवेळा जाहीर माफी मागून देखील त्यांचे हे पाप धुतले गेले नाही.  

१९९९ साली सोनिया गांधी नुकत्याच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या. त्यावेळी त्या मुलगा राहुल गांधींसमवेत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गेल्या. त्यांच्या सोबत पंजाब काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह आणि इतर नेते देखील होते.

हरमंदिर साहिब इथे दर्शन घेतल्यानंतर त्या शीख धर्मीयांसाठी सर्वात पवित्र आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या अकाल तख्तकडे निघाल्या.

त्यावेळी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख बीबी जागीर कौर यांनी सोनिया गांधी यांना अकाल तख्तकडे जाण्यापासून अडवण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले होते.

त्यामुळे जशा सोनिया अकाल तख्तच्या दिशेने येवू लागल्या त्याक्षणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिट टास्क फोर्सच्या २ धिप्पाड सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या रस्ता अडवला आणि अकाल तख्तच्या दिशेने जाण्यापासून रोखले.

प्रबंधक कमिटी एवढयावरच थांबली नव्हती. सामान्यपणे गुरुद्वारामध्ये येणाऱ्या माननीय व्यक्तींना गुरूंचा आशिर्वाद म्हणून शीख धर्मियांच्यात सिरोपा देण्याची प्रथा आहे. पण सोनियांना सिरोपा देवू नये असे ही आदेश कौर यांनी दिले होते.

यानंतर सोनिया गुरुद्वाराच्या बाहेरच शीख धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ समोर हाथ जोडून काही वेळासाठी उभ्या राहिल्या. आणि त्यावेळी इंडियन एअरलाईन्सच्या अपहरण झालेल्या कंधहार विमानातील प्रवासी आणि क्रू च्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना केली. 

परत जाताना सोनिया गांधी यांनी त्या सुरक्षा रक्षकांना आपल्याला आतमध्ये जाण्यापासून अडवण्याचा कृतीचे कारण विचारले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी कारण सांगताना सांगितले की,

“आम्हाला वरूनच आदेश आले आहेत की, सोनिया गांधींना अकाल तख्त जवळ जावू द्यायचे नाही. शीख धर्मीयांसाठी ती सर्वोच्च स्थानी आहे, आणि ब्लू स्टारच्या वेळी सुरक्षा एजन्सीने सर्वात जास्त नुकसान अकाल तख्तचेच केले होते. सोबतच दंगलींमध्ये खोटेपणाचे प्रतिनिधित्व करत असणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये असेही स्पष्टपणे सांगितले”

‘हरमंदिर साहिबमध्ये आपण जाऊ शकता पण अकाल तख्त ही एक विशेष जागा आहे.’ 

तेव्हा सोनिया यांनी शीख समुदायाची माध्यमांसमोर लिखित मध्ये माफी मागितली, आणि शीख दंगलीविषयी दुःख आणि संवेदना प्रकट केल्या. मात्र त्यानंतर देखील त्यांना अकाल तख्तकडे जावू दिले नाही.

२००५ मध्ये जेव्हा या शीख दंगलीचा तपास करणाऱ्या नानावटी आयोगाचा अहवाल संसदेसमोर तेहवला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत शीख समाजाची माफी मागितली होती. ते म्हणाले होते,

मला केवळ शीख समुदायाची नाही तर संपूर्ण देशाची माफी मागायची आहे. कारण १९८४ मध्ये जे काही झाले होते ते राष्ट्रीय भावनेच्या अगदी विरुद्ध होते. आणि त्यामुळेच माझी मान शरमेने खाली जात आहे. 

आजही अधूनमधून या दंगलीचे भूत काँग्रेसच्या मानगुटीवर येउन बसते. २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी देखील शीख समुदायाची माफी मागितली होती. त्यांनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने या दंगलीचा मुद्दा पुन्हा काढला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.