सोनू निगम धमकी देतोय तो मरिना कंवरचा व्हिडीओ नेमका काय आहे?

सध्या सुप्रसिद्ध फिल्म अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात घराणेशाहीचा वाद सुरू आहे.

फिल्मइंडस्ट्रीमधील काही बडे लोक आपल्या मर्जीतल्या लोकांना संधी देतात व त्यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना संपवून टाकतात असे आरोप सध्या सुरू आहेत.

एकेकाळचा भारतातला नंबर वनवर असणारा सिंगर सोनू निगमने देखील या वादात उडी घेतली.

त्याच म्हणणं आहे फक्त फिल्म इंडस्ट्रीच नाही तर भारतातली अख्खी म्युजिक इंडस्ट्री काही माफियांनी स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे ज्याचा फटका मला स्वतःला देखील बसला आहे. यावरून दोन्ही बाजुंनी बरंच काही बोललं गेलं.

अखेर सोनू चिडला आणि आपल्या लाईव्ह व्हिडीओमध्ये थेट नाव घेत बॉम्ब टाकला.

“भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास.”

जेव्हा तू माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ती वेळ विसरलास तू. ब्रदर माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करून दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करून दे. अबू सालेमपासून मला वाचव. अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस? ”

भूषण कुमार हा टी सिरीज या म्युजिक कंपनीचा मालक आणि फिल्म प्रोड्युसर आहे.

त्याचे वडील गुलशन कुमार यांचा अबू सालेमने खंडणीसाठी खून केला होता. हा भूषण कुमार सध्या सोनूला संपवण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप सुरू होते. या व्हिडीओ मध्ये बोलताना सोनू निगम म्हणाला की,

“पुन्हा माझ्या नादी लागलास तर मरीना कंवरचा व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करेन”

आता प्रश्न पडला की ही मरीना कंवर कोण?

मरिना कंवर ही एक मॉडेल आणि नवोदित अभिनेत्री आहे. सोनी टीव्हीवरील सीआयडी, आहट या सिरीयलच्या काही एपिसोडमध्ये तिने काम केलंय. अक्षय कुमारच्या मिलियन डॉलर बेबी या सिनेमातून ती डेब्यु करणार होती पण हा सिनेमा काही कारणाने कॅन्सल झाला.

काही दिवसांपूर्वी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने एक प्रसंग सांगितला.

एकदा मरिना एका म्युजिक व्हिडीओच्या संदर्भात भूषण कुमार यांना भेटायला गेली होती.

हनीसिंग बरोबर हा व्हिडीओ बनला जाणार होता पण भूषण कुमार यांना गडबड असल्यामुळे त्यांनी तिला ऑफिसवर भेटायला बोलावले.

मरिना त्यांना बॉनबॉन नावाच्या सुपरमार्केट जवळ भेटली तिथे ते नेहमीप्रमाणे मोठ्या कार ऐवजी स्विफ्ट या छोट्या कार मध्ये आले होते. ते ऑफिस म्हणून सांगून तिला एका फ्लॅटवर घेऊन गेले.

मरिनाच्या म्हणण्यानुसार भूषण कुमारने तिथे गेल्या गेल्या अचानक तिच्यावर हल्ला केला आणि जबरदस्ती सुरू केली.

भूषण कुमारच्या अश्लील हरकती बघून मरिना घाबरली, इतक्यात त्याच्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा दिव्या खोसलाचा फोन आला आणि ही संधी साधून मरिना तिथून पळाली.

मरिनाच्या मते तिच्या सोबत असाच प्रकार दिग्दर्शक साजिद खान आणि स्वामी रामरहीम यांनी देखील केला होता.

पण भूषण कुमारने केलेल्या जबरदस्तीच्या विरुद्धचे पुरावे तिच्या कडे आहेत. तिचे कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व बरंच काही.

याच प्रकरणाचा व्हिडीओ सोनू निगमच्या हाती सापडला आहे आणि यावरूनच सध्या गोंधळ सुरू आहे.

तर जिच्याबद्दल हा गोंधळ सुरू आहे त्या मरिनाने मात्र आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर डिप्रेशनबद्दलचा मेसेज पोस्ट केला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.