सोनू सूद राजकारणात येईल असं वाटत असताना, त्याच्या बहिणीनं एन्ट्री मारलीये
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर एका अभिनेत्याचं नाव चांगलंच गाजलं. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले मजूर असतील, औषध किंवा बेडच्या शोधात असलेले रुग्णांचे नातेवाईक असतील सगळ्यांनीच मदतीसाठी त्याला संपर्क केला. तो अभिनेता म्हणजे सोनू सूद.
तेव्हापासूनच सोनू सूद राजकारणात येणार का अशी चर्चा सुरू होती. त्यात त्यानं देशातल्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्यानं या चर्चेला आणखीनच उधाण आलं.
पंजाब विधानसभा निवडणूका जवळ आल्यात, अशातच सोनू सूदनं आपल्या राजकारणातल्या एंट्रीबद्दल घोषणा केली आहे.
सोनूनं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची भेट घेतली होती. त्यामुळं तो या दोन पक्षांपैकी एका पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानं आपली बहीण मालविका सूद हि आपल्याआधी राजकारणात उतरेल असं सांगत आपल्या प्रवेशाबद्दल प्लँनिंग सुरू असल्याचंही सूचित केलं.
काय म्हणाला सोनू सूद?
माझी बहीण मालविका पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मात्र कुठल्या पक्षाकडून ती रिंगणात उतरेल याबाबत निर्णय झालेला नाही. योग्य वेळी त्याबद्दल घोषणा केली जाईल. मालविका यासाठी तयार असून लोकांची सेवा करण्यासाठी ती कटिबद्ध आहे. आरोग्याचा मुद्दा ही आमची प्राथमिकता असेल. ती निवडून आली, तर रुग्णांना मोफत उपचार मिळतील याची काळजी घेईल. पंजाबमधले तरुण हातात काम नसल्यानं ड्रग्सच्या मार्गावर जात आहेत, त्यामुळं राज्यातल्या बेरोजगारीचा मुद्दाही ती उचलून धरेल.
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्हीही चांगले पक्ष आहेत. लवकरच मी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचीही भेट घेणार आहे. मी माझी राजकारणात येण्याबद्दलची योजना लवकरच सांगेन, सध्या मालविकाचं समर्थन करणं महत्त्वाचं आहे. ती आमचं मूळगाव असलेल्या ‘मोगा’शी बांधील आहे.
मालविका सूद काय करते?
कॉम्प्युटर इंजिनिअर असलेली मालविका समाजसेविका आहे. ती मोगामध्ये गरजू मुलांसाठी मोफत इंग्लिश कोचिंग क्लासेस चालवते. भाऊ सोनूसोबत ती आपले दिवंगत पालक शक्ती सागर सूद आणि सरोज बाला सूद यांच्या सूद चॅरिटी फाऊंडेशनचा कारभारही पाहते.
राजकारणातील प्रवेशाबाबत घोषणा करताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालविका म्हणाली, ‘आम्ही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत आहोत. निवडून आल्यावर मी प्रामुख्यानं रुग्णालय आणि शाळांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईल. मी मोगातूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालेलं असलं, तरी कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवेल हे अजून ठरलेलं नाही. आमचा उद्देश राजकीय पक्ष नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली व्यवस्था सुधरवणे हे आहे.’
त्यामुळं आता मालविका आणि सोनू ही सूद भावंडं कुठल्या पक्षात प्रवेश करतात आणि मालविकाच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सोनूची भूमिका काय असेल? याकडे पंजाबमधल्या पक्षांसह सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं असेल.
हे ही वाच भिडू:
- सोनू सूदला मदत मागणाऱ्यांनी ट्विट डिलीट करण्यामागे नेमकं गौडबंगाल काय आहे?
- सोनूला ब्रँड अँबेसेडर बनवण्यामागं केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीवर डोळा ठेवलाय?
- मुंबईतून कामगारांना घरी पाठवणाऱ्या सोनूचं चीनमध्ये सुद्धा भरपूर वजन आहे.