स्थलांतरित मजुरांच्या देवदूताने देखील हात टेकलेत, “सरकार सकट आपण सगळे फेल ठरलो”

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणून थैमान घातलंय, दररोज नवीन संक्रमितांचा आकडा हजारोंनी वाढतोय. यासोबतच मृत्युच्या आकड्यांचा आलेख देखील वाढत चाललाय. पहिल्या लाटे प्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा जास्त फटका या दुसऱ्या लाटेतही पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालल्याने आरोग्य सेवादेखील कोलमडली आहे.

त्यात अनेक राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  रोजी- रोटीचा प्रश्न निर्माण झालाय. अश्या परिस्थितीत प्रवासी मजुरांनी पुन्हा एकदा घरचा रस्ता पकडलाय.

कडक लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांची पुन्हा फरपट

महाराष्ट्रात सध्या  कडक निर्बंध असूनही  संक्रमितांचा आकडा वाढतच चालला आहे, अश्या परिस्थितीत येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन  होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यासोबतच राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकारने २६ एप्रिलपर्यंत  कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि  बस थांब्यावर मजुरांच्या  लोंढेच्या लोंढे पाहायला मिळत आहे.

मजुरांना सतावतेय भाकरीची चिंता

दिल्लीत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आनंद विहारमध्ये लोकांचा एकच गर्दी पाहायला मिळाली.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केले की, कोणत्याही प्रवासी मजूराने  दिल्ली सोडून जावू नये, परंतु कामगारांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पोटाची चिंता आहे. पोलिस आणि प्रशासन लोकांना समजविण्याचा प्रयत्न करतंय मात्र त्याचा परिणाम फारच कमी दिसून येतोय.

अशीच परिस्थिती मुंबईत देखील दिऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपासून  मुंबईतील लोकमान्य टिळक स्टेशनवर प्रवासी कामगारांची तोबा गर्दी होत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर बसस्थानकाची अवस्था तशीच आहे. येथून बस पकडल्यानंतर बरेच परप्रवासी कामगार आपल्या गावी परतत आहेत.

गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्येही होता असाच देखावा 

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च पासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर त्यात सतत वाढ होत गेल्या. अचानक केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे प्रवासी मजुरांची चांगलीच पायपीट झाली.

रेल्वे, बस,  गाड्या सर्वकाही बंद असल्याने या मजुरांची पायीच आपल्या घराची वाट पकडली. लाखो प्रवासी मजुरांनी आपल्या बायका – मुलांना घेऊन मिळेल ते खात – पीत नाहीतर उपाशी पोटी हजारो किलोमीटरची पायी वारी केली. यात उपासमारीमुळे  अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.

फाळणीनंतरचं हे सर्वात मोठ स्थलांतर मानलं जात होत. भारतातल्या जवळपास वीसहून अधिक मोठ्या शहरांमधून लोकं रस्त्यावर येत आपल्या गावी जात होते.

स्थलांतरित मजुरांना अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक मदतीचे हातही पुढे आहे. जो तो आपपल्या परीने मदतीस उतरला होता. केंद्र सरकार देखील याबबत  सजग झालं होतं आणि मुलभूत  गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावलंही उचलत होत.

स्थलांतरित मजुरांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यासह अनेक उपाययोजना केल्या. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम सुरू  करण्याबरोबर त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे सेवा सुरु केली गेली.

त्यावेळी सिनेमाचा व्हिलन ठरला होता देवदूत .. 

सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद कोरोना काळात  खरा हिरो म्हणून समोर आला होता. गरजूंसाठी देवदूत ठरणाऱ्या सोनू सूदने मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय केली होती. एवढचं नव्हे तर या प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अ‍ॅप लाँच केलं होत. ज्याच नाव होत  ‘प्रवासी रोजगार’.  हे अ‍ॅप आजही  प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देतय.

याशिवाय सोनूने केरळमधील १६७ महिलांना ओडिशामध्ये पोहोचवण्यासाठी एअरलिफ्ट केलं होतं.

एका फॅक्टरीत काम करणाऱ्या या महिला केरळच्या एर्नाकुलममध्ये अडकल्या होत्या.  देशातील अनेक विमानतळं बंद असतानाही सोनूने कोची आणि भुवनेश्वरमधील विमानतळे उघड तसच, कोरोनाच्या परिस्थितीही आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करणाऱ्या आपली ड्युटी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांनाही सोनू सुदने मदत केली.

मुंबई पोलिसांना त्याने २५००० फेस शिल्ड दिले. फक्त स्थलांतरित मजूरच नव्हे तर सोनू आणि त्याच्या टीमने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबालाही मदत केली. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या २८००० लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरवले होते.

या गोष्टीला आता जवळपास एक व्र्हस होईल. कोरोनाची पहिली लाट ओसरून दुसरी लाट सुरु झाली. मात्र सरकारी पातळीवर या दुसऱ्या लाटेसाठी कोणतीही तयारी झाली नाही.

‘यंदा आपण अपयशी होतोय..’ 

दुसऱ्या लाटेत  वाढत्या बिकट परिस्थितीत देवदूत सोनू सूदची मदत देखील अपुरी पडत आहे. त्याने स्वतः ट्वीट करून म्हंटले कि, ‘होय, आपण अपयशी झालोय’. सोनू सूद आणि त्याची संस्था मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर त्याने आपली आरोग्य यंत्रणा सुद्धा अपयशी ठरली असा थेट उल्लेख आपल्या ट्विट मध्ये केला आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनाशी लढण्यासाठी आपली तयारी पूर्ण झालीच नाही. अनेक राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यामध्ये हताश झालेले दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लादताना ५४७६ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. निर्बंधाच्या काळात शिव भोजन थाळी मोफत उपलब्ध करून खाण्याचा प्रश्न मिटवला पण राहण्याचा व इतर प्रश्न मोठा आहे.  सरकारने बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.  मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाची २,५९,१७० नवीन प्रकरण समोर आली आहेत. यासह संक्रमितांचा आकडा  १,५३,२१,०८९ वर पोहोचला आहे. ज्यातील २० लाख रुग्ण सध्या सक्रीय आहेत. तर ११,८०,५३०  लोकांना या कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही भयंकर परिस्थिती पाहता अनेक राज्यात कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत.

हे लॉकडाऊन हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पण केंद्र सरकार आणि विविध राज्यसरकारे अजूनही जागी झालेली दिसत नाहीत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.