त्यादिवशी बॅटिंगमध्ये फेल गेलेल्या गांगुलीनं पाकिस्तानला दहशत काय असते, हे दाखवून दिलं

आयपीएल संपली, १० वेगवेगळ्या टीम्स एकमेकांना भिडल्या. मोठे मासे हरले आणि अंडरडॉग गुजरात टायटन्सनं किस्सा रंगवत आयपीएल मारली. आयपीएलचे प्लेऑफ सुरू झाले की, स्टेडियममध्ये एक माणूस सुटाबुटात हमखास दिसतो. कडक सूट, बारीक काड्यांचा चष्मा आणि रुबाब असा त्याचा अवतार पाहिला की, उगाच आपल्याला भारी वाटतं.

कारण तो माणूस म्हणजे आपला चाईल्डहूड हिरोय, त्याच्यामुळं आपल्यातले कित्येकजण क्रिकेट बघू लागले, कित्येकांनी लेकरांची नावं त्याच्या नावावरुन ठेवली… सौरव!

विषय सुरू आहे दादाचा, सौरव गांगुलीचा.

दादाला आयपीएलच्या प्लेऑफवेळी पाहिलं की जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. त्यात बघून बघून आयपीएलचा कंटाळा आला असलाच तर, उतारा म्हणून एक किस्सा बघू.

ज्यात आपला दादा आहे,  दादागिरी आहे आणि भारत-पाकिस्तान मॅचही.

साल १९९७, तेव्हा टी२० आणि लीग क्रिकेट याचं कुणाला स्वप्नही पडत नसेल. तेव्हा सगळा भर असायचा तो, दोन देशांमधल्या सिरीजमध्ये. त्यावर्षीही अशीच एक सिरीज झाली, भारत विरुद्ध पाकिस्तान आणि ठिकाण कुठलं? तर कॅनडा. विशेष म्हणजे या सिरीजसाठी कपडेही रंगीत नाही, तर पांढरे होते.

सप्टेंबरचा महिना होता, दोन्ही कट्टर विरोधक देशांमध्ये ५ वनडे मॅचची सिरीज खेळवण्यात येणार होती. नाव होतं सहारा कप. पहिली वनडे भारतानं मारली, दुसरी पण मारली, तिसऱ्यात नेमका पाऊस पडला, त्यामुळं तिसरी मॅच पुन्हा एकदा खेळवण्यात आली.

हीच पुन्हावाली तिसरी वनडे, टॉस उडाला आणि पाकिस्ताननं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताचा फॉर्म बघता आपण धूरळा उडवू असं वाटत होतं. पण किस्सा झाला भलताच.

भारताची ओपनिंग जोडी होती, सौरव गांगुली आणि साबा करीम. पाकिस्तानी बॉलर्सची लेन्थ त्यादिवशी प्रॉपर गंडल्यागत वाटली होती. कारण त्यांनी दादा आणि करीमला वाईडची मेजवानी दिली. तेवढ्यात चमत्कार व्हावा अशी सूत्रं हलली.

दादा गांगुली २० बॉल २ रन्स करुन आऊट आणि साबा करीम १६ बॉल २ रन्स करून आऊट. भारताचा स्कोअर १२ वर २ विकेट.

दादा त्यावेळी कडक फॉर्ममध्ये होता, मात्र या हुकमी मॅचमध्ये त्याची दांडी लवकर गुल झाली. पुढं सगळी टीम गंडत गेली. द्रविडची भिंत उभी राहिली पण त्यातून रन्स काही आले नाहीत, ७९ बॉल २५ फक्त.

यापेक्षा मोठा धक्का होता, सचिनचा.

कॅप्टन्सीचं ओझं खांद्यावर असलेला सचिन १० बॉलमध्ये ० रन्स करुन आऊट झाला. भारताचा स्कोअर ३ आऊट २३. कार्यक्रम गंडला होता, तेव्हा अझरुद्दीन धाऊन आला. त्यानं कडक फिफ्टी मारली, पण त्यासाठी घेतले ११० बॉल. आता तो काय टी२० चा जमाना नव्हता, त्यामुळं निवांत खेळलं तरी चालून जाणार होतं. रॉबिन सिंगही त्यादिवशी चालून गेला त्यानं ३२ रन्सचं योगदान दिलं.

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा भारताचा स्कोअर होता, ६ आऊट १८२.

पाकिस्तानला फक्त १८३ रन्स हवे होते. तेव्हा भारताकडे कुंबळे, झहीर, भज्जी असला तोफखाना नव्हता. ॲबी कुरुविला, निलेश कुलकर्णी, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंग अशी आपली बॉलिंग होती. 

भारताला लवकर खोलत पाकिस्तानला चांगलाच बूस्टर मिळाला होता. त्यामुळं त्यांचे बॅट्समन तुटून पडले. शाहीद आफ्रिदीनं ६ चव्वे हाणले, सईद अन्वर पण फोडत होता. ही जोडी आणि रमीझ राजा आऊट झाले खरे, पण १८ ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्कोअर १०८ होता.

जिंकायला इन मिन ७५ रन्स हवे होते, हातात ३२ ओव्हर्स होत्या. फॉर्ममध्ये असलेल्या गांगुलीच्या मनात आग धगधगत होतीच. आपला नेहमीचा तिरका रनअप आणि छातीशी गुंडाळलेला हात घेऊन गांगुलीची बॉलिंग सुरू झाली.

सलीम मलिकनं त्याच्या बॉलिंगवर विनोद कांबळीकडं सोपा कॅच दिला. दादानं नेहमीच्या स्टाईलमध्ये दोन्ही हात उंचावून सेलिब्रेशन केलं आणि तेव्हा भारताला पहिल्यांदा वाटलं असावं की आपण जिंकू.

मग सुरू झाला दादा शो, हसन रझानं शून्यावर असतानाच हवेत कव्वा उडवला आणि आऊट. एजाज अहमद आणि मोईन खानचीही अशीच गत झाली. पाकिस्तानचा स्कोअर दाणकन आदळला ७ आऊट ११८. त्यांनी १० रन्सच्या अंतरात ४ विकेट गमावल्या. विशेष म्हणजे या चारही विकेट काढणारा कार्यकर्ता होता, दादा गांगुली.

सकलेन मुश्ताक आणि अकिब जावेदनं झुंज यायला सुरुवात केली. भारतीय टीममध्ये जोश संचारला होता, विशेषत: दादाला तर जिंकायचंच होतं. त्यानं अकिब जावेदला पायात बॉल टाकला, जावेदनं हाय नाय ती ताकद लाऊन बॉल उचलला खरा, पण त्याची बॅट एका साईडला फिरली आणि बॉल दुसऱ्या साईडला गेला.

कुरुविलानं जेव्हा कॅच धरला, तेव्हा दादानं केलेलं सेलिब्रेशन आणि पाकिस्तानला दिलेली हूल हा तर डीप विषय होता.

शेवटच्या जोडीला ४२ रन्स करायचे होते, कुरुविलानं मुश्ताकची विकेट खोलली, पाकिस्तान १४८ वरच खंगाळलं आणि भारतानं सहारा कप मारला.

खरंतर १८३ रन्स म्हणजे फार मोठं टार्गेट नव्हतं, त्यात भारताकडे तगडी बॉलिंगही नव्हती. पण एक माणूस होता, ज्याच्यात जिद्द होती, स्वतःचं बॅटिंगमधलं अपयश धुवून काढण्याची, स्वतःच्या टीमला जिंकवण्याची… जी त्यानं फक्त १६ रन्स देऊन ५ विकेट्स काढत दाखवून दिली.

बॅट्समन गांगुली फेल ठरला, पण बॉलर गांगुली सगळ्या भारताचा हिरो. 

त्या मॅचमध्ये भारताकडून पूर्ण १० ओव्हर्स टाकणारा तो एकमेव बॉलर होता. निम्मी पाकिस्तानी टीम गारद करत त्यानं त्यांची हवा टाईट केली आणि भारताचे हात कपपर्यंत पोहोचवले.

विशेष म्हणजे या मॅचमध्ये ज्या १६ विकेट्स पडल्या त्या सगळ्याच्या सगळ्या कॅचआऊट होत्या. या सिरीजमध्ये दादा सलग चार मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच होता आणि अर्थात मॅन ऑफ द सिरीजही. एकट्या वाघानं पाकिस्तानला नाक घासायला लावलं, तेही पार दूर कॅनडामध्ये.

म्हणून गांगुली भारी होता, रेकॉर्ड्सच्या पलीकडेही.

 

दादानं खोललेल्या पंजाच्या हायलाईट्स तेवढ्या बघून घ्या 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.