त्या सात दिवसांमुळे सौरव गांगुली चॅपेल गुरुजींच्या प्रेमात होता…

भारतीय क्रिकेट आणि वाद की गोष्ट काय आपल्यासाठी नवीन नाही. हे वाद तसे वेगवेगळ्या टाईप्सचे असतात. म्हणजे बघा हार्दिक पंड्यानं कॉफी पिऊन केलेली बडबड हा एक टाईप, विराट आणि गंभीरमध्ये भर ग्राऊंडमध्ये झालेलं भांडण हा एक टाईप, पण सगळ्यात सुपरहिट टाईप म्हणजे कोच आणि कॅप्टनमध्ये झालेले राडे.

भारताला खऱ्या अर्थानं क्रिकेटचं येड लावणाऱ्या सचिन आणि कपिलचंही कोच आणि कॅप्टन म्हणून जमलं नव्हतं. विराट कोहली आणि अनिल कुंबळे प्रकरणावर तर निबंध लिहिले जाऊ शकतात. पण सगळ्यात फेमस राडा एकच बंगालचा टायगर, भारताचा दादा सौरव गांगुली विरुद्ध खड़ूस ऑस्ट्रेलियन ग्रेग चॅपेल.

त्या दोघांमध्ये काय राडा झाला, भारतीय टीमचा कसा बाजार उठला हे तर तुम्ही लय ठिकाणी वाचलं असणार. आणखी एक गोष्ट तशी सगळ्यांना माहितीये, की दादानीच आग्रह करुन चॅपेल बाबाला कोच म्हणून आणलं होतं. आता त्यामागचं कारण जाणून घेऊ.

२००३ सालातला किस्सा. भारताच्या टीमचे तसे अच्छे दिन सुरु होते. २००२ च्या चॅम्पियन ट्रॉफी आपण जॉइंट विनर्स म्हणून का होईना जिंकली होती. नॅटवेस्ट ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा माज मोडला होता. वर्ल्डकपमध्ये पार फायनल गाठली होती. कॅप्टन गांगुलीची पाचही बोटं तुपात होती. पण त्याला टेन्शन होतं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सिरीजचं.

दादा तसा लय डेंजर स्वभावाचा. सिरीज होणार होती डिसेंबरमध्ये पण भावानं जुलैमध्येच तयारीला सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नडायचं म्हणजे डेरिंग पाहिजे आणि तयारीही. दादानी ठरवलं सगळ्या टीमच्या आधी आपण ऑस्ट्रेलियात जाऊ. तिथली पिच, बॉलर्स यांचा जरा अभ्यास करुन येऊ. पण हे काय एकट्याच्या जीवावर शक्य नव्हतं. कुणी तरी तिथला जाणकार माणूस पाहिजे.

म्हणून दादानी आपल्या एका पत्रकार मित्राकडून चॅपेलचा नंबर मिळवला. चॅपेलला म्हणला, ‘भावा, सिडनी किंवा मेलबर्न तू म्हणशील तिथं येतो पण मला सात दिवस वेळ पाहिजे.’ चॅपेल म्हणला, ‘ओके मेट. सिडनीला ये की निवांत.’

सिडनीला गेल्यावर दादानी कसून प्रॅक्टीस केली. इथली पिच कसे आहेत, दिवसातला कुठला वेळ खेळण्यासाठी कठीण असतो, ग्राऊंडच्या आकारानुसार फिल्डिंग कशी लावायची असे लय प्रश्न त्यानी चॅपेलला विचारले. त्याच्या मदतीनं स्वत:च्या बॅटींगमधल्या चुका सुधारल्या. त्या ट्रेनिंगनंतर दादाला असं वाटू लागलं, की आपण पुन्हा एकदा फॉर्मात आलोय, आपली बॅटिंगही सुधारलीये. सात दिवसांनंतर दादा भारतात आला, न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्ट मॅचमध्ये त्यानं सेंच्युरी पण मारली.

दादानी चॅपेलच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एवढा अभ्यास केला होता, की त्याला तिथल्या ट्रिक्सची चांगलीच जाणीव झालेली. दौऱ्याच्या तारखा जाहीर झाल्यावर त्यानं आपलं वजन वापरुन जगनमोहन दालमियांना तारखा चेंज करायला लावल्या. त्याचं म्हणणं होतं आधी टीमला चांगली प्रॅक्टिस मिळाली पाहिजे. दालमियांनीही त्याचं ऐकलं आणि भारताला प्रॅक्टिस मॅचेस मिळाल्या. त्या दौऱ्यात पहिलीच टेस्ट गॅबावर झाली, त्यात दादानं खणखणीत सेंच्युरी मारली. ऑस्ट्रेलियाची टीम दादाचा आत्मविश्वास बघून गांगरून गेलेली.

पुढं दादापासून प्रेरणा घेत द्रविड, सेहवाग, फॉर्म हरवलेला सचिन (सिडनी टेस्टमध्ये) सगळेच फॉर्मात आले. ॲडलेडवर तर आपण जिंकलोही. शेवटची टेस्ट ड्रॉ करत ऑस्ट्रेलियानं लाज राखली, पण दादाच्या टीमनं धिंगाणा केला होता.

पुढं भारतात आल्यावर, तेव्हाचा कोच जॉन राईटचा करार संपत आला होता, नवा कोच कोण होणार याची चर्चा सुरु झाली. कॅप्टन दादाला चॅपेलसोबत घालवलेले ते सात दिवस आठवले. त्याला वाटलं, आपल्या चुका सुधरवणारा, आत्मविश्वास देणारा चॅपेल कोच म्हणून लई भारी ठरेल. तेव्हाचे बीसीसीआयचे सर्वेसर्वा जगनमोहन दालमिया आणि दादाचं एकदम खास. त्यानी त्या सात दिवसांच्या जोरावर दालमियांकडं मागणी लावून धरली, की कोच मला चॅपेलच हवा.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, चॅपेलचा सक्खा भाऊ इयान चॅपेल आणि दादाला सांगून पाहिलं, की चॅपेलचं कोचिंग रेकॉर्ड काय चांगलं नाही. तो कोच झाला तर टीमचं वाटोळं करील. पण दादावर त्या सात दिवसांची मोहिनी एवढी होती, की त्यानं काय आपली मागणी सोडली नाही आणि भारताच्या कोचपदी ग्रेग चॅपेलची एंट्री झाली आणि पुढं काय झालं हे वेगळं सांगायला नको.

हे ही वाच भिडू:

web title: Sourav Ganguly: Why Sourav Ganguly insisted BCCI to make Greg Chappell as a coach on team India

Leave A Reply

Your email address will not be published.