….जेव्हा आफ्रिकन संघाने ४३४ रन्स चेस करून इतिहास घडवला.

स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. व्हॉट ए व्हिक्टरी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला टोनी ग्रेग ओरडला आणि ग्राउंडवर उपस्थित हजारो प्रेक्षकांसह टेलिव्हिजनवर मॅच बघत बसलेले कोट्यावधी क्रिकेटरसिक क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

१२ मार्च २००६. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. ऑस्ट्रेलियन संघाचा आफ्रिका दौरा. पाच वन-डे मॅचच्या सिरीजमधला शेवटचा सामना. सुरुवातीच्या २ मॅचेस आफ्रिकेने जिंकल्यानंतर पुढच्या २ मॅचेसमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियन संघाने सिरीजमध्ये बरोबरी साधलेली. ऑस्ट्रेलियन टीम पत्नीच्या कॅन्सरमुळे उपलब्ध नसलेल्या त्यांच्या सर्वात महत्वाच्या बॉलरशिवाय, ग्लेन मॅक्ग्राथ शिवाय खेळत होती, तर आफ्रिकन टीमकडेही इंज्युरीमुळे संघाच्या बाहेर असणारा शॉन पोलॉक नव्हता. म्हणजेच बरोबरीचा गेम होता. फिट्टमफाट.

रिकी पॉटिंगची बहारदार खेळी

ricky ponting
Cricket Australia

ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉटिंगनं टॉस जिंकून बटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीही ओपनर्सनी फिफ्टीज मारून चांगली सुरुवात करून दिल्याने अॅडम गिलख्रिस्टची विकेट पडल्यानंतर ग्राउंडवर आलेला पॉटीगची गाडी  सुसाट सुटली आणि अवघ्या ७३ बॉल्समध्ये त्यानं शतक ठोकलं. तोपर्यंत दुसरा ओपनर कॅटीच आउट झाल्याने वरच्या पोझिशनवर प्रोमोट झालेल्या माईक हसीने वाहत्या गंगेत हात धुवून घेत ताबडतोड ८१  रन्स ठोकल्या होत्या. ४७  ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या २ विकेट्स गमावून ३७४ रन्स स्कोअरबोर्डवर लागल्या होत्या.४८ वी ओव्हर टाकायला टेलीमॅक्स ज्यावेळी आला त्यावेळी आफ्रिकन संघ इतक्या दबावात होता की ओव्हरचे पहिले सलग ४ बॉल्स त्याने नो-बॉल टाकले होते. हसीच्या ठिकाणी आलेला सायमंडस तोडफोड करतच होता. आउट होण्यापूर्वी पॉटीगनंही ९ सिक्सर्स आणि १३ फोरच्या मदतीने १०५ बॉल्समध्ये १६४ रन्स फटकावल्या होत्या. शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये ५३ रन्स ठोकत ऑस्ट्रेलियन संघाने ५० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून आफ्रिकन टीमसमोर विजयासाठी ४३५ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

कॅलिसचे प्रेरणादायी शब्द

५० ओव्हर्समध्ये ४३४ रन्सचं टार्गेट यशस्वीपणे चेस करण्याचा विचारही  डोक्यात आणायचा असेल तर तुम्ही वेडेच असायला लागता. आफ्रिकन संघात असा एक वेडा माणूस होता. जॅक्स कॅलिस त्याचं नाव. ड्रेसिंग रूममध्ये तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, “कम ऑन गाईज, इट्स ए ४५० विकेट. देय आर १५ रन्स शॉर्ट” त्यावेळी जरी ड्रेसिंग रूममध्ये सगळेच जण कॅलिसवर हसले होते आणि कॅलिसही त्या मॅचमध्ये फारसा प्रभावी ठरला नव्हता तरी कॅलिसचे हेच शब्द होते जे आफ्रिकन टीमला इन्स्पायर करत होते.

स्मिथची कॅप्टन्स इनिंग आणि हर्षल गिब्ज नावाचं वादळ

 

इनिंग्ज ब्रेकनंतर आफ्रिकन टीम चेस करण्यासाठी मैदानात उतरली. कॅप्टन स्मिथसोबत ओपनिंगला आलेला डीपेन्नार दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर पॅव्हेलीअनमध्ये परतला. एवढ्या वाईट सुरुवातीनंतर ४३४ रन्सचं टार्गेट आफ्रिकेला हिमालायाएवढं भासलं नसतं तर नवलंच. आता हर्षल गिब्ज ग्राउंडवर आला होता, ज्याचा आदल्या रात्रीचा हँगओव्हर अजून उतरायचा होता. तो हँगओव्हर ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर उतरवायचा असंच बहुधा तो ठरवून आला होता. ‘स्मिथ-गिब्ज’ जोडीने फटकेबाजी करायला सुरुवात केली. १९ ओव्हर्समध्ये १५० रन्स. आफ्रिकन्स सहजासहजी हार मानणार नाहीत हे इथचं क्लिअर झालं होतं. ऑस्ट्रेलियन बॉलर्सची चौफेर धुलाई सुरु असतानाच क्लार्कनं टाकलेल्या  २३व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर स्मिथची उडालेली कॅच हसीने पकडली आणि आफ्रिकन फॅन्सचे चेहरे पडले. स्मिथ ५५ बॉल्समध्ये ९० रन्सची कॅप्टन्स इनिंग खेळून परतला होता. बहुधा ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम इनिंग होती.

harshal gibs
Youtube

स्मिथच्या जाण्याचा गिब्जवर काहीही परिणाम होणार नव्हता. कारण त्याच ओव्हरमध्ये क्लार्कला खणखणीत सिक्सर ठोकून गिब्जनं आपल्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु असल्याचे संकेत दिले होतेच. ७९ बॉल्समध्ये आपलं शतक साजरं केल्यानंतर तर गिब्जनं रुद्रावतार धारण केला होता. तो प्रचंड तोडफोड करत असताना १३० रन्सवर लेविसच्या बॉलिंगवर त्याचा एक कॅच ब्रॅकनने सोडला. जो ऑस्ट्रेलियाला प्रचंड महागात पडला. आफ्रिकन इनिंगची ३०वी ओव्हर परत लेविसने टाकली. त्यात ३ फोर आणि १ सिक्स वसूल करत गिब्जनं १०० बॉल्समध्ये दीडशतक साजरं केलं. तोपर्यंत डीव्हीलीअर्स परतला होता. मॅचच्या ३२ व्या ओव्हरमध्ये गिब्जनं सायमंडसला २ टोलेजंग सिक्सर्स ठोकले. आता गिब्ज वन-डे च्या इतिहासातील पाहिलंवहिलं द्विशतक ठोकणार की काय असं वाटत असतानाच सायमंडसच्या पुढच्याच बॉलला फटकवायच्या नादात तो ब्रेट ली च्या हातात कॅच देऊन बसला. तोपर्यंत गिब्ज नावाच्या वादळाने १११ बॉल्समध्ये १७५ रन्स काढल्या होत्या. त्यात त्याच्या २१ फोर आणि ७ सिक्सर्सचा समावेश होता. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम इनिंग्जपैकी एक इनिंग खेळून गिब्ज परतत होता. वॉडरसवरील प्रेक्षक आणि आफ्रिकन ड्रेसिंग रूम गिब्जला स्टॅडिंग ओव्हेशन देत होती. आफ्रिकन संघाचा स्कोअर ३२ ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून २९९ रन्स.

झुंजार मार्क बाउचर

गिब्ज आउट झाल्यानंतर मात्र आफ्रिकन रन-रेट मंदावला. कॅलिस आणि केम्प फार काही न करता परतले. ४० बॉल्समध्ये जिंकण्यासाठी ८७ रन्स हवे असताना मॅच आफ्रिकेच्या हातातून निसटतोय असं वाटायला लागलं होतं. मात्र मार्क बाउचर एक बाजू टिकवून खेळत होता. त्याला ८ व्या स्थानावर बॅटिंगसाठी आलेल्या व्हॅन-डर-वॅथ चीही  साथ मिळाली. वॅथनं १८ बॉल्समध्ये ३५ रन्सची इनिंग खेळून समीकरण आफ्रिकेच्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. वॅथ आउट झाला त्यावेळी आफ्रिकेला २१ बॉल्समध्ये ३६ रन्सची आवश्यकता. एक  बाजू लाऊन धरलेल्या बाउचरनं मग पुन्हा लेविसवर हल्ला चढवला आणि ३ फोर वसूल करत मॅच आफ्रिकेच्या बाजूने झुकवला. आता १२ बॉल्समध्ये १३ रन्स आणि ३ विकेट्स हातात. ४९ व्या ओव्हरमध्ये ब्रॅकनने ६ रन्स दिल्या आणि टेलीमॅक्सला पॅव्हेलीअनमध्ये पाठवलं. ६ बॉल्स ७ रन्स २ विकेट्स हातात.

शेवटच्या ओव्हरमधील थरार

६ बॉल्स ७ रन्स- मार्क बाउचरने मारलेला फटका ब्रेट ली ने अप्रतिम फिल्डिंग करत अडवला. बाउचरला सिंगल मिळाला.

५ बॉल्स ६ रन्स- ब्रेट ली ने टाकलेल्या या बॉलवर  हॉलने बाउंड्री वसूल केली. आता आफ्रिका सहज जिंकेल असं वाटू लागलं होतं पण मॅचमध्ये अजून बरंच काही शिल्लक होतं.

४ बॉल्स २ रन्स – ब्रेट लीने टाकलेला बॉल हॉलने टोलवला तो थेट क्लार्कच्या हातात जाऊन विसावला.

३  बॉल्स २ रन्स- अकराव्या स्थानावर बॅटिंगला आलेल्या मखाया एन्टिनीनं कसाबसा १ रन मिळवला. स्कोअर लेव्हल.

२ बॉल्स १ रन- ब्रेट ली नं टाकलेला हा बॉल मार्क बाउचरनं मिड ऑनच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला आणि आफ्रिकन संघाने ऐतिहासिक विजयासह सिरीजही जिंकली.

या मॅचमध्ये अनेक विक्रम रचले गेले. अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. अॅवार्ड सिरेमनीमध्ये पॉटिंग आणि गिब्ज दोघांनाही संयुक्तपणे ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.