साऊथमध्ये मेगास्टार असलेला चिरंजीवी राजकारणात मात्र सुपरफ्लॉप ठरला…..

सिनेमातले हिरो आणि राजकारण यांचा एक वेगळाच विषय आहे. सिनेमे चालत नसल्यावर राजकारणात येणे आणि राजकारणात सपाटून मार खाल्ल्यावर पुन्हा सिनेमात सुपरफ्लॉप होणे हे आपण बऱ्याच अभिनेत्यांच्या बाबतीत बघितलं आहे. पण काही हिरोंनी राजकारणात उडी घेतली आणि ते यशस्वी झाल्याचे उदाहरणंसुद्धा आहेत. साऊथमध्ये राजकारणाचा तडका इतरांच्या तुलनेत जास्तच आहे.

एनटीआर, एएनआर, कृष्णा, शोभन बाबू आणि कृष्णम राजू यांसारख्या पॉलिटिकल बॅकग्राउंड नसणाऱ्या लोकांनी यात यशस्वी होऊन दाखवलं. २००८ साली साऊथचा मेगा स्टार चिरंजीवी यात उतरला. हा तो काळ होता जेव्हा दिग्दर्शक निर्माते चिरंजीवीच्या घराबाहेर सिनेमाला होकार मिळावा म्हणून वाट पाहत बसलेले असायचे. पण मग इतकी सारी प्रसिद्धी असलेला चिरंजीवी अपयशी कसा ठरला ते आपण पाहूया. 

२००८ मध्ये चिरंजीवीने राजकारणात आगमन केलं. आंध्र प्रदेशात स्वतःचा पक्ष चिरंजीवीने तयार केला नाव ठेवलं, प्रजा राज्यम. आता चिरंजीवीकडून हे खूप मोठं पाऊल उचललं गेलं होतं. पक्ष ज्यावेळी लोकांसमोर येत होता तेव्हा पार्टीचं ब्रीद होतं कि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे. हि पार्टी सुरवातीला चांगलीच गाजली.

तेलगू सिनेमातला मेगा स्टार असलेला चिरंजीवी तिथल्या लोकांसाठी अमिताभ बच्चनपेक्षा कमी नव्हता. २००९ साली राज्य विधानसभा निवडणुकीत तिरुपतीमध्ये चिरंजीवी निवडून आले आणि आमदार बनले. २०११ साली चिरंजीवीने प्रजा राज्यम काँग्रेसमध्ये विलीन केली आणि २०१२ साली युपीए २ च्या अंतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्री म्हणून त्याची निवड झाली.

२०१० सालची हि घटना चिरंजीवीच्या आयुष्यातली मोठी घटना घडली, पोलावरम प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी डॉ.मनमोहनसिंग यांना जाऊन तो भेटला तेव्हा पंतप्रधानांनी चिरंजीवीला ऑटोग्राफ मागितला होता, भले मनमोहनसिंग यांनी त्याचा एकही सिनेमा बघितला नसावा पण हि घटना तेव्हा चांगलीच गाजली होती. आणि लगेचच २०११ मध्ये सोनिया गांधींच्या आग्रहास्तव चिरंजीविने प्रजा राज्यम काँग्रेसमध्ये विलीन केली. 

नंतर मात्र राजकारण पूर्णवेळ करणं हे चिरंजीवीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली. आपला वैयक्तिक १५० वा सिनेमा शूट करण्यावर चिरंजीवीने लक्ष केंद्रित केलं यामुळे राजकारणाकडे त्याच दुर्लक्ष होऊ लागलं. महिन्यातून २० दिवस राजकारण आणि १० दिवस सिनेमाचं शूटिंग याचा मेळ बसवणे अशक्य होऊन बसलं. याच काळात काँग्रेस अध्यक्षपदी चिरंजीवीचं नाव सुचवण्यात आलं होतं. पण अंतर्गत विरोध जास्त असल्याने काम सांभाळण्यासाठी राजकीयदृष्ट्या चिरंजीवी सक्षम नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.

यामुळे चिरंजीवीचं मोठं पद हुकलं. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशात विभाजन झालं आणि इथून मोठी कलाटणी आंध्र प्रदेशाच्या राजकारणाला मिळाली. या विभाजनामुळे अनेक काँग्रेस नेते नाराज झाले. चिरंजीवी सुद्धा या घटनेमुळे नाराज झाला होता आणि त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षातर्फे राज्यात निवडणूक प्रचार समितीचा प्रमुख असूनही चिरंजीवीने स्वतःला निवडणूक प्रचारातून दूर ठेवलं. 

हळूहळू राजकारणातून स्वतःला दूर ठेवून चिरंजीवी पुन्हा सिनेमाकडे शिफ्ट झाला. पण आज घडीला चिरंजीवी आंध्र प्रदेशाच्या कायदा प्रणालीत महत्वाच्या पदावर कार्यरत आहे. अशा प्रवासानंतर चिरंजीवी परत कधी पूर्णवेळ राजकारणाच्या वाट्याला गेला नाही. पण त्याचा फॅनबेस अजूनही टिकून आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.