रजनीच्याही आधी साऊथच्या अनेक सुपरस्टारनी इथल्या राजकारणावर राज्य केलंय

अख्या साऊथमध्ये सध्या चर्चाय ती रजनीकांतच्या राजकारणाची. दोन वर्षापुर्वी पक्ष स्थापन केल्यानंतर आता थलैवा आणि त्याचा पक्ष सक्रिय राजकारणात एन्ट्री करत आहे. त्यात त्याला इतर नेत्यांसारखं यश मिळणार की नाही तो पुढचा प्रश्न पण यामुळे पुन्हा एक गोष्ट प्रकर्षाने सिद्ध झाली की साऊथच्या या राजकीय पटलावर सिनेसृष्टीचा बोलबाला होता आणि तो अजूनही आहे.

इतिहासात म्हणजे अगदी स्वातंत्र्या पुर्वी पासून साऊथच्या राजकारणात चित्रपटांचे महत्व अबाधित आहे. याची सुरुवात कधी आणि कशी झाली यावरती ‘बोल भिडू’ने कालच दि. १ डिसेंबर रोजी लेख पब्लिश केला आहे.
‘येथे क्लिक करा’

तमिळनाडूमध्ये अण्णादुराई यांच्यापासून सुरु झालेली ही प्रथा आज अलिकडच्या काळात कमल हसन आणि रजनीकांत यांच्या पर्यंत आणून ठेवली आहे. या सगळ्यांनी अक्षरशः साऊथचे राजकारण छोट्या – मोठ्या प्रमाणावर ढवळून काढलं.

कोण कोण होते असे नेते ?

सी. एन. अण्णादुराई

तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक. नाटक लिहीण्यासाठी त्यांची विषेश ओळख होती. त्यांची काही नाटकांवर चित्रपट देखील बनले आहेत. सोबतच ते आपल्या भाषण शैलीसाठी देखील प्रसिद्ध होते.

पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. पण त्यांचा मुख्य ओढा हा चित्रपटांकडे होता. त्यांनीच सर्वप्रथम चित्रपट राजकारणासाठी वापरण्याचा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला.

अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियार यांच्या द्रविड कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार यांच्यामधील मतभेद वाढीस
लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती. परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.

त्यातुनच १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुन्नेत्र कळघम ह्या नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते.

परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडूची मागणी मागे पडली.

वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तेथील सत्ता संपुष्टात आणली.

एम.जी. रामचंद्रन

मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम. जी. रामचंद्रन किंवा एमजीआर. तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते ते आणि तामिळनाडूचे तीन वेळचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा प्रवास.

तरुणपणी एम. जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम. जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटक मंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले.

१९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला.

दरम्यानच्या काळात ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाटय़ाने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला.

१९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वत:चा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली. १९७७ साली ते पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. पुढे १९८७ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे संभाळली.

भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती.

एम. करूणानिधी

देशाच्या राजकारणातही खूप कमी लोकांचे योगदान आणि यश एम. करुणानिधीं एवढे मोठे आहे. ते १९५७ ते २०१६ अशी जवळपास ६० वर्षं लोकप्रतिनिधी राहिले. तब्बल ५ वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री भुषवलेले सिने सृष्टीतील लेखक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

लहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या प्रभावामुळे ते राजकारणाकडे ओढले गेले. आणि वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ‘तामिळ स्टुडंट्स फोरम’ची स्थापना केली.

त्याचवर्षी एक हस्तलिखित मासिकही सुरू केले. याच दरम्यान १९४० च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.

अण्णा दुराई यांनी द्रविड मु्न्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केल्यानंतर २५ वर्षांचे करुणानिधी त्यांच्या अधिकच जवळचे झाले होते. म्हणून इतक्या कमी वयात करुणानिधी यांची निवड पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रचार समितीवर करण्यात आली.

त्याच दरम्यान तामिळ सिनेसृष्टीत संवादलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. ‘राजकुमारी’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा डायलॉग लिहिले. त्यांना या कामात यश मिळू लागलं. १९५२ ला ‘परासख्ती’ या सिनेमासाठी त्यांनी लिहिलेले डायलॉग प्रचंड गाजले.

१९६७ साली जेव्हा DMK पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आलं, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्यमंत्री अण्णादुराई आणि नेडुचेळियन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री होते. १९६९ साली C. N. अण्णादुराई यांचं निधनानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले आणि तामिळनाडूच्या राजकारणात ही एक नवी सुरुवात होती.

करुणानिधी यांनी १९४७ ते २०११ पर्यंत सिनेमांसाठी संवाद लेखन केले. त्यांनी टीव्ही मालिकांसाठीही लिखाण केले आहे. अंथरुणाला खिळेपर्यंत ते ‘रामानुजम’ या टीव्ही मालिकेसाठी संवाद लिहीत होते.

जयललिता

जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत ‘अम्मा’ या एकमेव वलयाभोवती अख्खे तामिळनाडूचे राजकारण फिरत होते. ज्या ज्या क्षेत्रांत त्यांनी पाऊल ठेवले त्या त्या क्षेत्रांत त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या.

लहानपणी अभ्यासामध्ये त्या हुशार होत्या. यांना नोकरी करायची होती. खूप शिकायचं होते पण आईच्या तगाद्यामुळे त्यांनी सिनेमाची ऑफर स्विकारली. नाईलाजाने जरी या सृष्टीत आल्या असल्या तरी त्यांचे चित्रपट हिट ठरत होते.

त्याच दरम्यान जयललिता यांची गाठ तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी पडली. १२५ पैकी तब्बल ४० पेक्षा जास्त सिनेमे जयललिता यांनी एमजीआर त्यांच्याबरोबर केले आहेत.

सिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचे होते पण, एमजीआर यांनी त्यांना कधीच अधिकृत पत्नीचा दर्जा दिला नाही. मात्र तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.

पुढे एमजीआर राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हते. पण एमजीआर यांच्या मृत्युनंतर पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.

यानंतर त्या एक-दोन आणि तर तब्बल पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. जयललिता यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तान्सी घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरण शेवटपर्यंत सोबत होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना क्लिनचीट दिल्यानंतर त्या पुन्हा एकदा सत्तेत आल्या.

एन. टी. रामा राव

अभिनेता, निर्मात, दिग्दर्शक, एडिटर असं सगळचं काही असलेले आंध्र प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री एन. टी. रामा राव १९८३ ते १९९४ च्या दरम्यान ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिले.

एन.टी.आर यांनी 1949 साली तेलुगू सिनेमा मना देसम सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आपल्या सिनेकारकिर्दीत त्यांनी बहुतांशी धार्मिक आणि पौराणिक सिनेमांमध्ये काम केलं.

हिंदू देवतांच्या भूमिका त्यांनी साकारल्या. 1961 साली एनटीआर यांनी सीतारमा कल्याणा या सिनेमापासून दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू केली. यानंतर एनटीआर यांनी अनेक दर्जेदार सिनेमा दिग्दर्शित केले. सम्राट अशोक हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा सिनेमा होता.

यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली. 1982 साली एनटीआर यांनी तेलुगू देसम पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1983, 1985 आणि 1994 साली मुख्यमंत्रीपद भूषवलं.

चिरंजीवी

आंध्रप्रदेशमधील दुसरे सगळ्यात फेमस अभिनेते चिरंजीवी. त्यांच्या फॅन्सचा उत्साह बघण्यासारखा असतो. त्यामुळेच जेव्हा ते राजकारणाकडे वळले तेव्हा तिथे देखील फॅन्सनी त्यांना डोक्यावर घेतले. वयाच्या ६५ मध्ये असलेले अजून ही ते फिल्म आणि अभिनय क्षेत्रात ॲक्टिव्ह आहेत.

चिरंजीवी यांच खरं नाव कोणिदेल शिव शंकर वर प्रसाद. लहानपणापासूनच अभिनयाची आवड. त्यामुळे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मद्रास फिल्म इंस्टिट्यूट  प्रवेश घेतला. अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर चिरंजीवी ने पुनाधिरल्लू  या चित्रपटातुन करिअरची सुरुवात केली.

पण प्रणाम खरीदू या हा त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक बापू यांचा चित्रपट मना पूरी पंडावुलू  याने चिरंजीवीला ओळख मिळवून दिली. १९७९ मध्ये आठ आणि १९८० मध्ये चौदा मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. २००२ मध्ये प्रदर्शित झालेला इन्द्रा या चित्रपटाने त्यांच्या यशाचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले.

राजकारणात येण्यापुर्वी त्यांचा शेवटचा चित्रपट शंकर दादा जिंदाबाद असा होता.

२००८ मध्ये चिरंजीवीने राजकारणात प्रवेश केला. आंध्रामधील सगळ्या वर्गांना सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने प्रजा राज्यम पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली. २००९ मध्ये झालेल्ये विधानसभा निवडणूकीत प्रजा राज्यम पक्षाने अठरा जागांवर विजय मिळवला.

२०११ मध्ये त्यांच्या पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. २०१२ मध्ये यूपीए-2 सरकार मध्ये ते केंद्रीय पर्यटन मंत्री बनले. २०१४ मध्ये आंध्रप्रेशच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चीरंजीवीना मुख्यमंत्री बनविण्याच्या चर्चा चालू होत्या. पण केंद्र सरकारने आंध्र प्रदेश विभाजनाचा अध्यादेश काढल्यामुळे त्यांनी विरोध करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

पवण कल्याण 

पवन कल्याणला टॉलिवूडमध्ये पावर स्टार म्हटले जाते. तो चीरंजीवचा मोठा भाऊ. तेलुगु चित्रपटाचा अॅक्टर असलेला पवन कल्याण फिल्म डायरेक्टर, सिंगर, कोरियोग्राफर आणि स्क्रीन रायटर आहे. सोबतच तो एक ट्रेंड मार्शल आर्टिस्ट आणि ब्लॅक बेल्ट चॅम्पियन देखील आहे.

पवनने खुशी, जलसा, गब्बर सिंग, अतरिनकिती दरेदी, गोपाला गोपाला यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१३ मध्ये तो फोर्ब्सच्या लिस्टमध्ये भारताच्या १०० सेलिब्रिटीमध्ये आला होता.

पवन कल्याण मार्च २०१४ मध्ये राजकारणात आला आणि त्याने जनसेवा पार्टीची स्थापना केली.

२०१४ ला आंध्र – प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर भाजपशी आघाडी केली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पक्षाला केवळ १ जागा मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा भाजपशी फारकत घेतली. मात्र आता पुन्हा याच मुद्द्यावर ते भाजपसोबत गेले आहेत.

या सगळ्या मान्यवरांनंतर आता कमल हसन आणि रजनीकांत ही या निवडणूकीच्या आखाड्यात उतरत आहेत.

तस तर दोघांनी पण आपल्या आपल्या पक्षाची स्थापना २०१८ मध्येच केली आहे. पण येणाऱ्या २०२१ ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे अलिकडेच जाहिर केले आहे. त्यामुळे ते कसा आणि काय परफॉर्मन्स देणार हे लवकरच कळेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.