भारतातभर घुमणारा फटाक्यांचा आवाज या गावात तयार होतो

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधःकारमय दुनियेत प्रकाशमय वातावरणाने प्रफुल्लित होण्याचा तो एक दीपमय सण. आणि त्याला फटाक्यांची आतिषबाजीची जोड. त्यामुळे दिवाळी आणि फटाके हे अनेक वर्षापासुनचे चालत आलेले समीकरण बनले आहे.

यंदा मात्र अनेक ठिकाणी ध्वनी प्रदुषण, हवा प्रदुषण आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राजस्थान, नवी दिल्ली या राज्यांमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घातली आहे. तर काहींनी स्वयंस्फुर्तीने फटाके न उडवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे फटाके वाजवण्यावर बंदी असली तरी तरी फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी नाही. त्यामुळे भारत फटाके फोडण्यासोबतच फटाके बनवण्यावर देखील आघाडीवर आहे. चीन नंतर फटाके उत्पादन आणि निर्यात करणारा भारत जगातील २ नंबरचा देश आहे. आणि भारतातील हे एवढे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते तमिळनाडूमधील फटाक्यांचा कारखाना या नावाने ओळख असलेल्या गावात.

तामिळनाडूतील मदुराई – कन्याकुमारी मार्गावर वसलेले शिवकाशी गाव.

देशातील फटाके निर्मितीचे हे सर्वात मोठे केंद्र आहे. भारतातील ९०% फटाके एकट्या शिवकाशीत तयार केले जातात. इथे जवळपास १०७० परवाना धारक आणि इतर असे २ हजार फटाके निर्माते आहेत. त्यातून ३ लाख जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

पण हे शिवकाशी गावं फटाक्यांचे हब बनले कसे?

या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला १०० वर्ष मागे जाव लागेल. १९२२-२३ च्या दरम्यानची गोष्ट. शिवकाशीचे षण्मुगम नाडर आणि अय्या नाडर हे दोन व्यापारी बंधू कोलकाता येथील दास गुप्तांच्या काडेपेटी कारखान्यात कामाला होते. त्या दरम्यान त्यांनी काडेपेटी बनवण्याचे ज्ञान हस्तगत केले आणि शिवकाशीला येऊन स्वतःचा काडेपेटीचा कारखाना सुरु केला. त्यासाठी जर्मनीवरुन आधुनिक यंत्रसामुग्री आणली.

काडेपेटी निर्मितीच्या व्यवसायाचा जम बसल्यानंतर १९२६ मध्ये दोघांनी वेगवेगळे होवून व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. १९४२ मध्ये षण्मुगम नाडर यांनी स्टॅंडर्ड तर अय्या नाडर यांनी कालेश्वरी फायरवर्क्स या ब्रँड नावाने फटाके निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

दुसरे महायुद्धा दरम्यानचा हा काळात नाडर बंधूंच्या स्टॅंडर्ड फायरवर्क्स आणि कालेश्वरी फायरवर्क्स व्यवसायाने जम बसवायला सुरुवात केली. फटाके तयार करताना कोणतीही लाईट लावून चालत नाही, हे संपूर्ण काम सूर्योदय आणि सूर्यास्तावर अवलंबून असते. त्यामुळे सुर्यप्रकाश स्वच्छ लागतो.

नेमके हेच वातावरण शिवकाशीत होते. तिथे असणारा कमी पाऊस आणि कोरडे वातावरण हे फटाके निर्मितीसाठी लागणारे पोषक वातावरण होते. त्यामुळे बघता बघता शिवकाशी भारताचे फटाका हब बनले.

१९८० पर्यंत शिवकाशीमुळे फटाके निर्मितीतील चीनची दहशत मोडून निघाली आणि भारताला फटाका निर्यातदार देश बनला. ३० वर्षानंतर आज त्यांचे शिवकाशी फायरवर्क्स, अनिल, गिलहरी, मुर्ग, मोर, स्टॅंडर्ड अशा अनेक प्रकारच्या ब्रँडचे फटाके भारतात आणि भारताबाहेर निर्यात केले जातात.

फटाके सोबतच माचीस बनविण्याचे काम इथे आजही मोठ्या प्रमाणात केले जाते.

पावसाळ्यामध्ये २ ते ३ महिने आणि दिवाळीनंतर ३ ते ४ महिने फटाका कारखाने बंद असतात. त्यामुळे स्थानिक मजूर या ऑफसिझनच्या काळात शेतात वगैरे मजूरी काम देखील करतात.

आता हा झाला इतिहास. पण इथली सद्यस्थिती आणि वर्तमान काय आहे? 

शिवकाशीने मागच्या वर्षी  म्हणजे २०१९ मध्ये जवळपास ३ हजार कोटींच्या फटाके विक्रीचा व्यवसाय केला होता.

यावर्षी मात्र सद्यस्थितीमध्ये कोरोना आणि लॉकडाऊन नंतर आता हे कारखाने ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु झाले होते. पण फटाके निर्मितीच्या कामावर लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम झाला आहे.

जवळपास ७० टक्के उत्पादन या वर्षी कमी झाले आहे. तामिळनाडू फायर वर्क्स अँड अॅमोर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे(टीएएनएफएएमए) अध्यक्ष गणेशन एका माध्यमाशी बोलताना म्हणाले,

देशव्यापी लॉकडाऊनमुळे फटाके तयार करण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे १४०० कोटींचेच उत्पादन होऊ शकले. हे एकूण उत्पादनाच्या ७० टक्के आहे. या वेळी खूप कमी माल पुरवठा होईल, अशी शक्यता होती. मात्र, आता ५० टक्के ऑर्डर आल्या आहेत.

त्यातच विविध राज्यात फटाके उडवण्यावर बंदी घातली आहे. सध्या नवी दिल्ली, राजस्थान या या राज्यांनी बंदी घातली आहे तर महाराष्ट्र आणि कर्नाटका विचार करत आहेत. त्यामुळे या उत्पादनावर आणखी परिणाम होण्याची शंका असल्याचे देखील ते म्हणाले.

बालकामगार आणि वारंवार होणारे स्फोट या इथल्या दोन मोठ्या समस्या.

शिवकाशी येथे फटाके तयार करणाऱ्या फॅक्टरी बालकामगारांनाही दिवसाला अगदी तुटपुंज्या पैशांसाठी अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये कामाला ठेवले जाते.

तसेच फटाक्यांच्या घातक रसायनांच्या सानिध्यात दिवसाला १२ तास काम त्यांना करावे लागते. कधी दारुचा स्फोट होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे अशा असुरक्षित वातावरणामुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेक मुलांना आयुष्यभराचे अपंगत्व आले आहे. त्यांचा चेहरा विद्रुप झालेला आहे. या सर्वांवरील एक माहितीपट राकेश वंका या यूझरने Child Labour in the Sivakasi Fireworks Factories या नावाने यू-ट्युबवर टाकला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाच्या कारणामुळे फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सहा प्रकारच्या रसायनांवर बंदी घातली आहे. तसेच ग्रीन फटाका या अधुनिक संकल्पनेला आत्मसात करण्यासही इथल्या वृद्ध कामगारांना अवघड जात आहे. सोबतच नवीन साधन सामग्रीचा आभाव या सगळ्या कारणांमुळे तिथल्या व्यवसायात घट होत चालली आहे.

भारतात अशी काही गावं प्रसिद्ध आहेत जी त्यांच्या नावावरुन कमी आणि कामावरुन जास्त ओळखली जातात. यापैकीच एक शिवकाशी. अशा या शिवकाशीमध्ये मागील जवळपास एका दशकापासून फटाक्यांचे काम चालते आहे. धोकादायक आहे पण गरज आणि कला यामुळे हे काम आज ही चालू आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shubham malgatte says

    नमस्कार दादा
    मी कवठे एकंद(तालुका: तासगांव,जिल्हा:सांगली) मद्ये राहतो. महाराष्ट्राची शिवकशी म्हणून कवठे एकंद ला ओलखले जाते.
    माहिती हवी असेल तर सांगू शकतो आपला एक लेख आपल्या ह्या महाराष्ट्रतील शिवकाशिवर असावा असं वाटतं.

Leave A Reply

Your email address will not be published.