सोयराबाई-ताराराणीच नाही तर छत्रपतींशी मोहिते घराण्याची सोयरीक अनेक पिढ्यापासून आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ महाराण्यांपैकी एक किंबहुना महाराजांच्या पट्टराणी , राजाराम महाराजांच्या मातोश्री अशी सोयराबाईंची ओळख आपल्याला माहीतच आहे. आपल्यापैकि काहीजणांना सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि सोयराबाई हे सख्खे बहीणभाऊ होते हे हि माहीत असेलच.

सोयराबाई या सातारा जिल्ह्यातील तळबीडच्या मोहिते घराण्यातील. या मोहिते घराण्याचे भोसले घराण्याशी फार जुने संबंध होते. सोयराबाईंचे पणजोबा रतोजी मोहिते हे अहमदनगरच्या निजामशाहीत लष्करी सेवा देत होते.

निजामाच्या दरबारात गाजवलेल्या पराक्रमासाठी रतोजी मोहित्यांना ‘बाजी’ हि पदवी देण्यात आली होती.

इथून पुढे आता मोहिते घराणे ‘बाजी मोहिते’ याच नावाने ओळखले जाऊ लागले . पुढे रतोजींचा मुलगा तुकोजी यांनी तळबीडची पाटीलकी मिळवली.

तुकोजींना संभाजी, धारोजी आणि कन्या तुकाई अशी तीन अपत्ये होती. आता संभाजी आणि धारोजी  यांनी अदिलशाहासाठी काम करायला सुरवात केली होती. याचवेळेस शाहजीराजेपण निजामशाहीवर नाराज होऊन आदिलशाहीत दाखल झाले होते . इथेच मोहितेबंधू आणि आणि शहाजीराजे खांद्याला खांदा लावून लढले.  लढाया लढताना झालेली ही जवळीक आता लग्नाच्या मंडपात मांडीला मांडी लावून बसण्यापर्यंत येऊन ठेपली होती.

 मोहितेबंधूंनी आता आपली बहीण तुकाई यांचा विवाह शहाजीराजेंशी घडवून आणला.

अश्याप्रकारे तळबीडचे मोहिते आणि भोसले घराणे यांच घट्ट नातं तयार झालं.

शिवरायांचा आणि सोयराबाईंचं लग्न काहींच्या मते १६४१ मध्ये तर काहींच्या मते १६५० मध्ये झालं. सोयराबाईंच्या लग्नाचाही असाच रंजक किस्सा सांगितला जातो. सईबाई आणि शिवरायांच्या लग्नाला शहाजीराजे उपस्थित राहू शकले नव्हते. पुढे लग्नानंतर जिजाऊ, शिवराय आणि सईबाई शहाजीमहाराज यांना भेटायला बंगलोरला गेले . 

शिवरायांच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्याची शहाजींच्या मनातील सल तुकाईबाईंनी बरोबर ओळखली . त्याचबरोबर आपली पुतणी म्हणजे संभाजीरावांची कन्या सोयराबाई यांचं सोयरिकही आणलं. 

शहाजींना हा प्रस्ताव आवडला आणि मग आपल्या लाडक्या शिवबाचा आपल्या डोळ्यादेखत लग्न लावून द्यायचं त्यांनी ठरवलं. अश्याप्रकारे सावत्र मामाच्या मुलीबरोबर शिवरायांचं अजून एक लग्न पार पडलं. सईबाईंच्या बहीण अनुबाई यांचं लग्न शिवाजीमहाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांच्याशी झालय. मामाच्या पोरीशी लग्न करण्याची परंपरा इथेही चालूच राहिली.

सईबाईंच्या मृत्यूनंतर सोयराबाई महाराजांच्या पट्टराणी झाल्या. राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या हयात राण्यांशी पुन्हा विवाह केला. त्यानुसार महाराजांनी सोयराबाईंशी पुन्हा विवाह केला याची नोंद शिवापूर शकावली, शिवचरित्रप्रदीप, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी (खंड १) आदी इतिहाससाधनांत आढळते. 

राज्याभिषेकप्रसंगी (६ जून १६७४) सोयराबाई यांना पट्टराणीपदाचा मान आणि छत्रपती  संभाजीराजे यांना युवराजपदाचा मान देण्यात आला होता.

मोहिते घराण्याशी सोयरीक करण्याची परंपरा सोयराबाईंनी पुढे चालूच ठेवली. आपला मुलगा राजाराम यांच्यासाठीही  वधू त्यांनी आपल्या माहेरवरूनच आणली होती. 

राजाराम महाराज यांचे सूत सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराबाई यांच्याशी जुळवण्यात आलं.  

ज्यांना आपण महाराणी ताराराणी म्हणून जाणतो. सेनापती हंबीररावांना जवळ करून राजाराम महाराजांना गादी  मिळवून देण्याचा सोयराबाईंचा हेतू होता असही म्हटलं जातं. मात्र हंबीररावांनी जावयाऐवजी गादिशी इमान राखत संभाजी महाराजांना पाठिंबा दिला होता. 

संभाजीमहाराज आणि सोयराबाई यांच्यात छत्रपतींची गादी मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षासंदर्भात आज अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत.

मात्र याच पार्श्वभूमीवर छत्रपति संभाजीराजांच्या २७ ऑगस्ट १६८० रोजी बाकरे नामक उपाध्यांना दिलेल्या दानपत्रात सोयराबाईंबद्दल काढलेले उद्गार लक्ष्यात घेणे गरजेचे आहे. 

“वैरभाव प्रविष्ट प्रधानादी -सापत्न रोषाक्रांत…..” असा उल्लेख महाराजांनी सोयराबायींबद्दल केला आहे.  त्याचा मतितार्थ असा, की ‘संभाजीराजांना युवराज्य अभिषेक झाल्यामुळे तत्कालीन पट्टराणी सोयराबाई यांचे हृदय दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्याने कलुषित झाले आहे. वस्तुतः मातोश्री निळ्या पिवळ्या पार्श्वभूमीत असलेल्या स्फटिकाप्रमाणे स्वच्छ हृदयाची, सौजन्ययुक्त आहे.’

तसेच मोहिते आणि भोसले घराण्याचे संभाजी महाराजांच्या आधी आणि नंतरही चालू राहिलेले या मायलेकांच्या संबंधांबद्दल बरच काही सांगून जातात. 

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.