युपीच्या आकाशात UFO दिसले..तसं नाही हे कांड तर इलॉन मस्क करतोय…

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. उत्तर प्रदेशच्या लखनऊ मध्ये आकाशातून एक भली मोठी लाइटल्स ची रांग दिसून आली. यूपीत अनेक शहरांमध्ये याचे दर्शन झाले. अपेक्षित अशीच अफवा सुरु झाली. कोण म्हणलं जमिनीवर एलियन्स आले, कोण म्हणलं उल्कापात होतोय इत्यादी…पण नंतर कळलं हे एलियन्स वैगेरे काहीही नसून उपग्रहाची शृंखला आहे.

आकाशात दिसलेली हि शृंखला जवळपास ४६ उपग्रहांपेक्षा जास्त आहेत्याला स्टारलिंक सॅटेलाईट हे SpaceX च्या उपग्रह नेटवर्कचे असून त्याचे मालक इलॉन मस्क आहेत.  

पण नेमकं हे स्टार लिंक सॅटेलाईट चा प्रकार काय आहे 

इलॉन मस्क यांनी २०१५ मध्ये स्टारलिंकद्वारे इंटरनेट पुरवण्याचा प्रस्ताव मांडत पृथ्वीभोवती ४ हजार सॅटेलाईट प्लांट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियामकांकडून परवानगी मागितली होती. युएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडून SpaceX ला १२ हजार सॅटेलाईट्स पाठवण्याची परवानगी देऊ केली.

मिळालेल्या परवानगी नुसार SpaceX ने २०१८ मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीला दोनच सॅटेलाईट्स पाठवले, हे मिशन यशस्वी झाल्यानंतर कंपनीने मे २०१९ मध्ये एकूण ६० स्टारलिंक सॅटेलाईट्स अवकाशात पाठवले. तेंव्हापासून हे ६० सॅटेलाईट्स पृथ्वीपासून वरच्या कक्षेत फिरतांना दिसतात.

या सॅटेलाईट्स चे काम काय ?

तर पृथ्वीवरच्या प्रत्येक कोपऱ्यात कोणत्याही केबलशिवाय, टॉवरशिवाय इंटरनेट वापरता यावं. पण तुमच्याकडे डोंगल/वाय-फाय राउटर हवं हे राउटर थेट स्टारलिंक सॅटेलाईट्स ला जोडलं जातं आणि हायस्पीड इंटरनेट आपल्याला वापरता येतं. कंपनीच्या सांगण्यानुसार, सद्या स्टारलिंक ऑस्ट्रेलिया, चिली, यूके आणि यूएससह ४० देशांमध्ये इंटरनेट सर्व्हिस देते आणि ४ लाखांपेक्षा जास्त युजर्स आहेत.

इलॉन मस्कने रशियन आक्रमणानंतर लगेचच स्टारलिंक सुविधा युक्रेनमध्ये हलवली.

जेंव्हा युक्रेन रशिया युद्ध पेटलं होतं तेंव्हा उद्धस्त झालेल्या युक्रेनला इंटरनेटची गरज होती. नेमकं तेंव्हाच इलॉन मस्क यांनी स्टारलिंक कंपनींचं इंटरनेट पुरवलं होतं. युद्धात झालेल्या नुकसानीत युक्रेनचे मोबाईल, इंटरनेट टॉवर्स नष्ट झालेले. तेंव्हा एका अख्या देशाला स्टारलिंक च्या सॅटेलाईट्स च्या इंटरनेट सुविधांद्वारे जगाशी कनेक्ट करून दिलं होतं.

पण भारतात स्टारलिंक च्या इंटरनेट सुविधांना परवानगी नाही,

इलॉन मस्कच्या टेस्ला आणि स्टारलिंक या दोन्ही कंपन्या अद्याप भारतात आलेल्या नाहीत. भारतीय खूप दिवसांपासून स्टारलिंक इंटरनेटची वाट पाहत आहेत. ट्विटरवरील युजर्सने अनेकदा इलॉन मस्क यांना हा प्रश्न विचारला आहे, स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस सेवा भारतात कधी येणार आहे. त्यावर मस्क ने उत्तर दिले की, ‘आम्ही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत’.

भारत सरकारमधील दूरसंचार विभागाने (DoT)  इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेस या कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी परवाना अद्याप जारी करण्यात आलेला नाही. २०२१ दरम्यान भारत सरकारने स्टारलिंकच्या इंटरनेट सर्व्हिसेस ला रजिस्ट्रेशन करू नये अशी नोटीस काढली होती.

कंपनीने आधी परवाना घ्यावा आणि नंतर इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये उतरावे, कंपनीने परवान्याशिवाय आपल्या सर्व्हिस चा भारतात प्रचार करू नये असे दूरसंचार विभागाने म्हंटल्यावर स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेस भारत सरकारकडून आवश्यक मंजुरी घेण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती खुद्द इलॉन मस्क यांनी दिली होती.

सरकारला माहिती मिळाली आहे की कंपनीने नियामक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून भारतातील इंटरनेट सर्व्हिसेस साठी बुकिंग सुरू केले आहे.

स्टारलिंक सॅटेलाईट्स ला भारताच्या कक्षेत सेवा देण्याचा परवाना आणखी मिळालाच नाही मग भारताच्या आकाशात सॅटेलाईट्स कसं काय आढळून आले ?

जेंव्हा पृथ्वीपासून वरच्या दिशेने जात असतात तेंव्हा पृथ्वीच्या पलीकडून सॅटेलाईट्स वर सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे रात्रीच्या अंधारात हे सॅटेलाईट्स चमकतात, खूप उंचीवर असूनही ते आपल्याला दिसू शकतात. याआधी देखील स्टारलिंकचे सॅटेलाईट्स पंजाबमधील पठाणकोटमध्ये, गुजरातमधील जुनागढमध्ये दिसून आले, हे ऑब्जेक्ट उपग्रह आहेत, जे पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून गेल्यामुळे लोकांना हे दिसून आले.

आता स्टारलिंक ला परवानगी मिळते कि नाही? कधी मिळेल अशा प्रश्नांची उत्तरं सद्या तरी मिळत नाहीत.

स्टारलिंकने असा दावा केला होता की त्यांना भारतात त्यांच्या सेवांसाठी ५ हजाराहून जास्त प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. त्याच वेळी, Jio आणि Airtel देखील भारतात स्टारलिंक सारख्या उपग्रह आधारित इंटरनेट सेवांवर काम करत आहेत. त्यामुळे बाकी काही असो एलॉन मस्कनं आपल्या भारतात स्टारलिंकद्वारे इंटरनेट सेवा सुरु केली तर मार्केटमध्ये उतरल्यावर स्वस्तात इंटरनेट देऊन तो बाकीच्या कंपन्यांना आव्हान देणार हे तर नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.