शंभर वर्षापूर्वी आलेल्या या रोगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा बदलून टाकली.

आज नॉव्हेल कोरोना या रोगाने जगभरात थैमान घातलंय. हजारो जणांचा मृत्यू झालाय. वैद्यकीय तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली तरीही आपल्याला या रोगावर नियंत्रण मिळवणे अवघड जातय.

असाच एक रोग शंभर वर्षांपूर्वी आला होता आणि त्याने कोट्यावधी लोकांना गिळून टाकलं होत.

“स्पॅनिश फ्ल्यू”

वर्ष १९१८. पहिल्या महायुद्धाचा काळ. प्रत्येक देशातील सैनिक जगभर पसरले होते.

विशेषतः युरोपात युद्धज्वर टिपेला पोहचला होता. लाखो लोकांची कत्तल चालली होती. कोणाच कोणाला भान राहिलं नव्हतं. मानवी जीवनाची किंमत उरली नव्हती.

अशातच हा स्पॅनिश फ्ल्यू रोग आला. हा एक संसर्गजन्य रोग होता. शिंकेतून यांचे विषाणू पसरत होते. आजारामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट होते आणि थोड्याच दिवसात मृत्यू होतो. फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या अस्वच्छ परिस्थितीमुळे हा रोग जास्त वेगात पसरला.

अस म्हणतात कि अमेरिकेतल्या सैनिकांनी युरोपात हा रोग आणला.

महायुद्धात सामील झालेल्या सैनिकांनी आपआपल्या देशात हे विषाणू नेले. महायुद्धातील रक्तपात सर्वत्र सडलेली प्रेते, बॉम्बस्फोटातून उध्वस्त झालेली गावे यामुळे अस्वच्छता माजली होती. यातून स्पॅनिश फ्ल्यूचे प्रमाण प्रचंड वाढले.

सुरवातीला युद्धामुळे इंग्लंड अमेरिकेतील मिडियाने या रोगाची बातमी दाबली.

यामुळे खबरदारी काय घ्यायची याची कल्पनाच कोणाला नव्हती. पाहता पाहता जगभरात हा रोग पसरला. पहिली बातमी स्पेन मधून आली म्हणून या रोगाला स्पॅनिश फ्ल्यू असे नाव मिळाले.

अस म्हणतात की जगभरातून एकूण ५० कोटी जणांना या रोगाची लागण झाली होती व त्यातील  १० कोटी जणांचा मृत्यू झाला. जगाच्या इतिहासातील आत्ता पर्यन्तचाहा सर्वात घातक रोग ठरला.

हा आकडा युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्यापेक्षाही दुप्पट आहे. 

तरी इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या देशांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांनी लवकर या रोगावर नियंत्रण आणले. पण भारतासारख्या गुलामीत असणाऱ्या देशाकडे लक्ष द्यायला देखील कोणाला वेळ नव्हता.

भारतावर तेव्हा राज्य होत इंग्रजांच. खर सांगायचं झाल तर विसाव्या शतकाच्या सुरवाती पर्यंत म्हणावं तेवढा जोर लावून स्वातंत्र्याची मागणी भारतातून होत नव्हती.

याला एक कारण म्हणजे या पूर्वी राज्य केलेल्या राजांनी बादशहाने केलेला जुलूम इंग्रजांच्या पेक्षाही टोकाचा होता. त्यांनी स्वतःच्या सोयी साठी का होईना भारतात रेल्वे वगैरे आधुनिक विकास केला होता.

त्यामुळे काही सशस्त्र क्रांतिकारक आणि टिळक, गोखले, फिरोजशहा मेहता असे सुशिक्षित नेते सोडले तर तळागाळातील आंदोलने अभावाने दिसत होती.

पण स्पॅनिश फ्ल्यूने भारताला मोठा झटका दिला. 

पहिले रुग्ण मुंबई शहरात सापडले. बंदरावर तैनात असलेल्या ७ शिपायांना हा रोग आढळून आला. काही दिवसात स्पॅनिश फ्ल्यूने भारतातही आपला विळखा पसरवला. डॉक्टर

६ ऑक्टोबर १९१८ रोजी एका दिवसात जवळपास ८०० जण मृत्यूमुखी पडले. विशेषतः उत्तर भारतात या रोगाने हाहाकर माजवला. गंगानदीच्या पात्रात लाखो मृतदेह तरंगत होते. जनतेमध्ये आक्रोश पसरला होता. पण भारतात डॉक्टरच नव्हते. अनेक डॉक्टर युद्धक्षेत्रावर युरोपात गेले होते.

कोणतीही वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे २ कोटी ते ५ कोटी भारतीयांचा मृत्यू झाला. जगभरात स्पॅनिश फ्ल्यूने  मरणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त भारतीय होते. 

एकतर या महायुद्धाचा भारताशी काहीही संबंध नव्हता. तरीही आपले शूर सैनिक हे युद्ध प्राणपणाने लढले. तिथे रक्त सांडल, वरून या रोगामुळे देखील जीव गेला.

पण इंग्रजांनी त्याकडे थेट दुर्लक्ष केले. त्यांना भारतीय सैनिक युद्धात इंग्लंडच्या बाजूने लढायला हवे होते मात्र युद्धानंतर त्यांच्या आरोग्यावर खर्च करायला पैसा नव्हता. ज्या नेत्यांचा, सैनिकांचा ब्रिटीशांच्या न्यायवृत्तीवर विश्वास होता त्यांचा भ्रमनिरास व्हायला सुरवात याच स्पॅनिश फ्ल्यूमुळे झाली.

खुद्द महात्मा गांधींना या रोगाची लागण झाली होती. गांधीजी सुदैवाने या रोगातून सहीसलामत बरे झाले मात्र तेव्हा पाहिलेला नरसंहार त्यांच्या मनावर आघात करून गेला.

१९१८ नंतर भारतात उभारलेल्या स्वातंत्र्यलढयाला देशाच्या कानाकोपऱ्यातून पाठींबा मिळायला लागला. आपल्यावर अन्याय करणाऱ्या इंग्रजांना देशातून घालवल्या बिगर राहायचे नाही हा जोश सगळ्या देशभर पसरला. गांधीजींच्या असहकार आंदोलनात अबाल वृद्ध बायापुरुष सगळे जण सामील झाले. प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रवाद जागा झाला.

अनेक पाश्चात्य इतिहासकार मानतात भारतात स्वातंत्र्यलढा तळागाळाशी पोहचला याला अनेक कारणे होती मात्र त्याचबरोबर १९१८ च स्पॅनिश फ्ल्यूसुद्धा एक प्रमुख कारण ठरले.

संदर्भ – Pale Rider: The Spanish Flu of 1918 and how it changed the world

हे ही वाच भिडू.