दहावीत 100 टक्के गुण मिळवणाऱ्या 151 पैकी 108 मुलं लातूरची: असा जन्मला लातूर पॅटर्न

आज दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला. दहावीच्या परिक्षेत राज्यातल्या 151 मुलांना 100 टक्के अर्थात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. यातले 108 विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत. त्यानंतर दूसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर विभागातील 22 मुलं आहेत.

पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या लातूर विभागात 108 मुलांना पैकीच्या पैकी गुण, त्यानंतर दोन नंबरवर असणारा आकडा 22, तर ज्या विभागाला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं त्या पुणे विभागातून फक्त 5 मुलं पैकीच्या पैकी गुण वाली..

साहजिकच पुन्हा एकदा, लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली. ही गोष्ट आहे लातूर पॅटर्न कसा जन्माला आला त्याची…

विलासराव देशमुख राज्याचे शिक्षणमंत्री होते त्यावेळेचा किस्सा. एकामागून एक राज्याच्या १० वीच्या गुणवत्ता यादीत लातूरची मुलं पहिल्या नंबराने पास होत होती. राज्यातच नाही तर देशात लातूरची चर्चा रंगात येवू लागलेली. पुण्या मुंबईची गुणवत्ता यादी लातूरकडे शिफ्ट झाल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 

यातच काही लोकांनी टिका सुरू केली. विलासराव देशमुख लातूरचे असल्याने इथली मुलं गुणवत्ता यादीत येतायत. तेव्हा विलासरावांनी उत्तर दिलं नाही. 

पण पुढे जेव्हा विलासरावांच मंत्रालय बदललं तेव्हाही लातूरची मुलं गुणवत्ता यादीत चमकू लागली. तेव्हा मात्र विलासराव एक भाषणात गर्वाने म्हणाले, लातूर पॅटर्न हे बावन्नकशी सोनं आहे सोनं…

एक काळ होता जेव्हा लातूर पॅटर्नचा आवाज महाराष्ट्राच्या गावखेड्यात होता. पुण्या- मुंबईसारख्या शहरातून हुशार मुलं गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी लातूरमध्ये यायची. पण हळुहळु हाच लातूर पॅटर्न एका रक्तरंजित राजकारणात बदलत गेला. लातूर पॅटर्नला खूनापासून ते जीवघेण्यास्पर्धेचा शाप लागला.

साधारण १९८९ पासून लातूर पॅटर्नचा बोलबाला सुरू झाला. १९८९ ते १९९५-९६ पर्यन्तचा काळ हा लातूर पॅटर्नचा सुवर्णकाळ होता. आपल्या शाळेतली मुलं गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी एका विद्यालयाने सुरू केलेला हा पॅटर्न, म्हणजेच लातूर पॅटर्न..

सुरवातीला लातूर पॅटर्न ओळखला गेला तो शाहू पॅटर्न या नावाने. त्याला कारण होतं लातूरचं राजर्षी शाहू महाविद्यालय. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे.एम. वाघमारे यांच्यासोबत माजी कुलगुरू शिवराज नाकाडे, कन्हैय्यालाल पुरोहित, ना.य डोळे, प्रभुदेव स्वामी, व्ही. व्ही ढोबळे, व्यंकटराव देशपांडे, दिगंबरराव होळीकर अशा अनेक शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर पॅटर्नचा पाया बांधला गेला व तो भक्कम करण्यात आला. 

सुरवातीच्या काळात राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये १० वी ची गुणवत्ता यादी डोळ्यासमोर ठेवून मुलांवर लक्ष्य केंद्रित करण्याचं ठरवण्यात आलं. यासाठी शिक्षणाची एक पद्धत विकसित करण्यात आली. 

१० वी चा अभ्यासक्रम दिवाळीपुर्वीच संपवणे, उत्तरपत्रिका लिहण्याचा सराव करायला लावणे, स्कॉलर मुलांना वेगळे काढून त्यांच्याकडून अधिक सराव करुन घेणे, शाळेय शिक्षणाचे ठरलेले पाच ते सात तास वाढवून अतिरिक्त तास घेणं अशा अनेक गोष्टी या महाविद्यालयांमार्फत करण्यात आल्या.

सोबतच लातूर शहरात अगदी १० ते २० रुपयांच्या फीमध्ये शिकवणी घेणारे खाजगी क्लासेस देखील होते. या गोष्टींचा फायदा होवू लागला व लातूरची मुलं राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकू लागली. साधारणं १९८९ ते १९९२  च्या काळात लातूर पॅटर्न जन्माला आला व त्याचं नाव झालं.

त्यानंतरच्या काळात राज्यभर लातूर पॅटर्न चर्चेत येवू लागला. त्यापुर्वी राज्याच्या गुणवत्ता यादीत पुण्या-मुंबईच्या मुलांचीच मक्तेदारी होती. महाराष्ट्रातला एक जिल्हा ही मक्तेदारी मोडून काढत आहे हे दिसू लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

इथे नेमकं काय चालतं हे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी-पालक-शिक्षक लातूरमध्ये येवू लागले.

राजर्षि शाहू महाविद्यालयातून सुरू झालेला हा पॅटर्न, दयानंद पॅटर्न, उदगीर पॅटर्न, अहमदपूर पॅटर्न अशा वेगवेगळ्या नावांनी स्थानिक पातळीवर चर्चेत आला व एकत्रितपणे लातूर पॅटर्न म्हणून गौरवला गेला. दहावीच्या पॅटर्नसोबतच बारावीचा पॅटर्न विकसित होत गेला. 

आपला मुलगा इंजिनियरिंगच्या उत्तम कॉलेजला घालवायचा असेल किंवा त्याने MBBS साठी ॲडमिशन मिळवायचच असेल तर त्यासाठी लातूर हे हमखास यश मिळवून देणारं शहर म्हणून डेव्हलप झालं.

लातूर पॅटर्न राज्यभर चर्चेत आल्यानंतर यावर संशय देखील घेतले जावू लागले. काहीवेळा लातूर परिक्षा मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बाहेर देखील पाठवण्यात येवू लागल्या. काहींनी शिक्षणमंत्री असणाऱ्या विलासराव देशमुखांवर देखील संशय घेतला. 

मात्र विलासराव देशमुखांनी शिक्षण मंत्रालयाचा कारभार सोडल्यानंतरही आणि उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बाहेर पाठवल्यानंतरही लातूरचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागल्याने लातूर पॅटर्नवर शिक्कामोर्तब झाले. ही सर्व परिस्थिती २००० सालापर्यन्त राहिली.

 २००० सालानंतर लातूर शहराची दूसरं कोटा फॅक्टरी होण्याकडे वाटचाल सुरू झाली. खाजगी क्लासेस वाढू लागले. पुण्या मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येवू लागले. 

विद्यार्थ्यांनी बऱ्याचदा खाजगी क्लासेसची निवड केली. विद्यार्थी वाढले आणि सोबत मागणी पुरवठ्याचा बाजारू नियम इथे लागू झाला. फी मध्ये वाढ होवू लागली. एका उद्गात्त हेतूसाठी मुलांना शिकवण्याचं, मुलांना गुणवत्ता यादीत आणायचं धोरण हळुहळु बाजारीकरणाकडे वाटचाल करू लागलं अन् इथेच लातूर पॅटर्नचा पाया ढासळू लागला..

२००० नंतरच्या काळात गुणवत्ता यादीत येणाऱ्या लातूर पॅटर्नमध्ये खाजगी क्लासेस होते, बाहेरून आलेल्या मुलांसाठी मोठ्या प्रमाणात रुम्स होत्या, झेरॉक्स सेंटर, नेट कॅफे अशा सर्व गोष्टी लातूरमध्ये जोरात चालू लागल्या. नंतरच्या काळात लातूर पॅटर्नमध्ये बाजारीकरण आलं.

विद्यार्थांच भविष्य म्हणजे धंदा झाला. दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात इथे शिक्षक आले. खाजगी क्लासेस वाल्यांनी अशा शिक्षकांची भरती चालवली.  गेस्ट लेक्चर्सची फी जास्त म्हणून विद्यार्थांची फी जास्त असं गणित जमलं. अन् ही व्यावसायिक स्पर्धा एकमेकांचा खून करण्यापर्यन्त गेली. लातूरमध्ये खाजगी क्लासेस चालवणाऱ्या अविनाश चव्हाण यांचा क्लासेसच्या इर्षेतून खून झाला आणि लातूर पॅटर्न वर रक्ताचा डाग लागला. 

त्यानंतर गुणवत्ता यादी गेली आणि सोबतच लातूरचं पहिलं आकर्षण मुलांना राहिलं नाही. तरिही मध्ये-अध्ये लातूर पॅटर्नच नाव होत राहिलं. 

२०१९ दहावीच्या परिक्षेत २० विद्यार्थांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले, त्यातले १४ विद्यार्थी लातूरचे विभागातले होते. तर २०२० साली दहावीच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थांची संख्या २५ इतकी झाली.

यंदा पैकीच्या पैकी गुण घेण्यात राज्यातल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या एकट्या लातूर विभागातली आहे. पुन्हा लातूर विभाग जोरदार चमकू लागला आहे. पण त्याची एक किनार बाजारपेठेची आहे हे देखील तितकचं खरं..

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.