सत्यजित रेंची स्क्रिप्ट चोरून स्पीलबर्गने त्याकाळी करोडो रुपये कमावले होते.

हॉलीवूडचा महान दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हा जगातल्या सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. हॉलिवूडमध्ये बरीचशी उलाढाल हि केवळ स्पीलबर्गच्या चित्रपटांमुळे होते. त्याने बनवलेले चित्रपट अगदी आवडीने आणि आवर्जून लोक पाहतात. मात्र याच स्पीलबर्गने भारताचे महान दिग्दर्शक सत्यजित रे यांची एक स्क्रिप चोरली आणि त्यावर चित्रपट बनवला यावरून मोठा गदारोळ झालेला. नक्की काय होता आहे किस्सा बघूया-

स्टिव्हन स्पीलबर्गला त्याने दिग्दर्शित केलेल्या ई. टी. द एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल ( १९८२ ) या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटाने पुढची अनेक वर्ष अमेरिकेत बक्कळ कमाई केली. या चित्रपटात इलियट नावाचा छोटा मुलगा आणि दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या एका एलियनची गोष्ट सांगितली होती.

पण स्पीलबर्गचा हा चित्रपट पूर्णतः सत्यजित रे यांच्या द एलियन या स्क्रिप्टवर आधारित होता.

१९६२ साली सत्यजित रे हे लहान मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या संदेश या मासिकात लघुकथा लिहीत असत. या मासिकात त्यांनी बांकुबाबुर बंधू  नावाची एक लघुकथा लिहिली होती. या गोष्टीचा सार होता कि बंगाल मधल्या एका छोट्याश्या गावात तलावाजवळ एक परग्रहावरून आलेलं विमान प्रकट होतं. या विमानाच्या आगमनानंतर अचानक तांदुळाची शेती पिकते आणि लोक याला चमत्कार समजतात आणि स्पेसशिपला मंदिर समजून त्याची पूजा करू लागतात.

या परग्रही विमानात एक एलियन आलेला असतो. जो मस्ती आणि विनोद करणारा असतो. मग तो गावातल्याच हबा नावाच्या भोळ्या स्वभावाच्या मुलाला भेटतो. अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. या लघुकथेचं रूपांतर सत्यजित रे यांनी १९६७ साली चित्रपटात करण्याचा निर्णय घेतला होता आणि ते स्क्रिप्ट बनवण्याच्या कामालाही लागले होते.

द एलियन नावाने हा सायन्स फिक्शन चित्रपट हॉलिवूड स्टुडिओ कोलंबिया प्रोड्युस करणार होते. मार्लन ब्रॅंडो आणि पीटर सेलर्स सारखे आघाडीचे नायक या चित्रपटात काम करण्यास उत्सुक होते. पण सत्यजित रे यांच्यासोबत अमेरिकेमध्ये त्यांच्या एजेंटने माईक विल्सनने त्यांना धोका दिला.

सत्यजित रे यांनी कोलकात्यामध्ये या चित्रपटाची स्क्रिप्ट रजिस्टर केली नव्हती आणि अमेरिकेमध्ये विल्सनने गुपचूप या स्क्रिप्टचे मालकी हक्क स्वतःच्या नावावर करून घेतले जी मूळ स्क्रिप्ट सत्यजित रे यांची होती.

माईक विल्सनने स्वतःला असोसिएट प्रोड्युसर घोषित केलं आणि सत्यजित रे यांची संमतीसुद्धा घेतली नाही. कोलंबिया स्टुडिओकडून पैसे घेतले यातला एक रुपयाही सत्यजित रे याना पाहायला मिळाला नाही. या घडलेल्या प्रकारामुळे सत्यजित रे जास्तच दुःखी झाले आणि नाराज मानाने ते भारतात परत निघून आले.

नंतर सत्यजित रे यांनी सांगितलं कि ,

जर त्या माणसाने मला धोका दिला नसता तर मी हॉलिवूडमध्ये माझ्या पद्धतीची पहिली सायन्स फिक्शन फिल्म बनवली असती.

पण त्यांच्या मूळ स्क्रिप्टची चर्चा त्याकाळात भयंकर रंगली होती. अनेक ठिकाणी तिच्या प्रति फिरत राहिल्या.

पुढे काही वर्षांनी स्पीलबर्गने दिग्दर्शित केलेला ई. टी. हा चित्रपट रिलीज झाला . कोलंबिया स्टुडिओने हा चित्रपट वितरित केला. या चित्रपटात सत्यजित रे यांच्या स्क्रिप्ट्शी साम्य असणाऱ्या जवळपास बऱ्याच गोष्टी होत्या. सत्यजित रे यांनी प्रकरण जास्त वाढवलं नाही  केली नाही. त्यांनी नम्रपणे सांगितलं कि

स्पीलबर्गने हा पिच्चर बनवणे शक्यच नसते जर का माझ्या मूळ स्क्रिप्टच्या प्रति अमेरिकेत सगळीकडे उपलब्ध नसत्या.

स्पीलबर्गचा यामुळे अहंकार दुखावला गेला आणि सत्यजित रेंना प्रत्युत्तर म्हणून तो म्हणाला,

ज्यावेळी रे यांची स्क्रिप्ट अमेरिकेत चर्चिली जात होती त्यावेळी मी शाळेत होतो.

पण स्पीलबर्ग खोटं बोलला होता. कारण ज्यावेळी सत्यजित रे हे अमेरिकेत या चित्रपटासंबंधी आलेले त्यावेळी स्पीलबर्ग शॉर्ट फिल्म बनवून प्रसिद्ध होत होता.

सत्यजित रे यांच्या स्क्रिप्टच्या आधी हॉलिवूडमध्ये एलियन्स कायम आक्रमक आणि विध्वंसक म्हणून दाखवले गेले पण रेंच्या स्क्रिप्टमधे एलियन्स प्रेमळ दाखवले गेले जे आजवर कधीही घडलेलं नव्हतं. स्पीलबर्गच्या चित्रपटात आणि रेंच्या स्क्रिप्टमधे असलेल्या साम्यावरून अनेक वाद झाले.

अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी रेंच्या स्क्रिप्टचं समर्थन केलं आणि स्पीलबर्गचं पितळ उघडं पाडलं.

पण सत्यजित रे यांनी स्पीलबर्गचं उलट कौतुक केलं आणि सांगितलं कि तो एक चांगला दिग्दर्शक आहे, माझ्या पेक्षा त्याने चांगली फिल्म बनवली. पुढे रे यांच्या स्क्रिप्टवर आधारित डायरेक्टर राकेश रोशन यांनी कोई मिल गया हा २००३ साली चित्रपट आणला ज्यात ह्रितिक रोशन आणि प्रीती झिंटा होते.

सगळ्यांना वाटत होतं कि तो स्पीलबर्गच्या चित्रपटावरून प्रेरित आहे पण खरं तस काही नव्हतं उलट स्पीलबर्ग आणि राकेश रोशन  या दोघांनी सत्यजित रे यांची कॉपी केली आणि करोडो रुपये कमावले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.