‘स्पायकर जीन्स’ फॉरेनचा नाही तर अस्सल मराठी मातीतला ब्रँड आहे!

प्रसाद पाब्रेकर मुंबईचा एक मराठी मुलगा. अभ्यासात हुशार होता. सुप्रसिद्ध व्हिजेटीआय महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ला प्रवेश मिळाला होता.

पण घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांचा लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंगचा बिजनेस. प्रसाद कॉलेज करून वडिलांना ड्रायक्लिनिंगमध्ये मदत करायचा, शिवाय पॉकेटमनीसाठी ऑडियोकॅसेट असेंम्बलिंगचा उद्योग चालायचा.

साधारण १९९१ चा काळ. भारताने जागतिकीकरण स्वीकारल्याचं घोषित केलं होतं.

याचा अर्थ सरळ होता, येत्या काही वर्षात आपलं ब्लॅक अँड व्हाइट भविष्य कलरफुल होणार होतं.

अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे अनेक परदेशी कंपन्या भारतात येणार, त्यांचे प्रोडक्ट खपवणार होत्या. त्याचा आपल्या स्वदेशी उद्योगांवर परिणाम होणार हे देखील स्पष्ट होतं.

संकटातही काही जणांना संधी दिसते. अशीच संधी प्रसाद पाब्रेकरना जीन्स मध्ये दिसली.

जीन्सची फॅशन जागतिकीकरणाच्याही आधी भारतात आली होती. पण त्याकाळी मुंबईतील उच्चभ्रु कॉलेजमधील मुलंमुली फॉरेन मधून आणलेले जीन्स वापरायचे. इंग्लंड अमेरीकेला गेलेल्या प्रत्येकाच्या शॉपिंगच्या बॅगेत जीन्स हमखास असायची.

पूर्वीच्या काळी स्मगलर लोक जीन्सची देखील स्मगलिंग करायचे हे आज सांगून पटणार नाही.

एकूण काय भारतात चांगल्या दर्जाच्या जीन्स तयार होत नव्हत्या. अशातच ग्लोबलायझेशन आल्यामुळे आता फॉरेनला जाण्याची किंवा स्मगलिंगची आवश्यकता उरली नाही.

गल्ली बोळातल्या दुकानात जीन्स मिळू लागली.

तो काळ आमिर,सलमान,अक्षयकुमार अशा तरुण अभिनेत्याच्या उदयाचा होता. अंगात टीशर्ट डोळ्यावर गॉगल आणि पायात जीन्स घालून कॉलेजला जाणारे कॉलेजकुमार हा सिनेमात दिसणारे हमखास दृश्य होते.

लॉन्ड्रीमध्ये काम करून प्रसाद पाब्रेकर यांना डेनिम जीन्स, तिची फॅशन याचा चांगलाच अभ्यास झाला होता. त्यांनी स्वतःची जीन्स बनवणारी कंपनी सुरू करायचा निर्णय घेतला.

आणि निर्मिती झाली स्पायकर डेनिम ची!

ते वर्ष होतं १९९२. प्रसादनी कसेबसे १ लाख रुपये जमवले आणि ही जीन्स बनवायला सुरवात केली. आपल्या जीन्सची क्वालिटी आंतरराष्ट्रीय ठेवायची हे त्यांनी अगदी पहिल्यापासून क्लियर ठरवलं होत.

पण योग्य मार्केटिंग कस करायचं याचा अनुभव नसल्यामुळे पहिल्याच वर्षी दहा लाखाच नुकसान झालं. पण ते डगमगले नाहीत.

दुसरं कोणीतरी असत तर हा बिजनेस बंद करून साधी सरळ नोकरी पकडली असती पण प्रसाद यांनी चिकाटी सोडली नाही.

तरुण असल्यामुळे त्यांना फॅशनचा सेन्स होता.

इथल्या मुलांना काय आवडत त्यांची टेस्ट काय याचा एक्सपिरियन्स होता. युरोप अमेरिकेतील साईज भारतीय मार्केट मध्ये चालत नाहीत हे प्रसाद यांना परफेक्ट ठाऊक होतं.

हळूहळू स्पायकर जीन्सचं मार्केटिंग कस करायचं याच देखील कसब त्यांना अवगत झालं. पब्लिकला देखील ही जीन्स आवडू लागली. जीन्सचे सारखे ट्रेंड बदलत असतात.

स्पायकरने भविष्यात येणारे ट्रेंड ओळखलेच नाहीत तर अनेकदा नवीन ट्रेंड सेट देखील केले.

कोणतीही नवी जीन्स बनवायची असेल तर पुतळ्यावर ट्रायल करण्याऐवजी जिवंत माणसाला ती घालायला लावणे हे पाब्रेकर यांचे सूत्र 100% यशस्वी ठरले.

एकविसावे शतक उजाडले तसे स्पायकर ही भारतातली सर्वात मोठी डेनिम कंपनी बनली. लिव्हाईस सारख्या इंटरनॅशनल ब्रँडला आपल्या क्वालिटीच्या बळावर जोराची टक्कर देऊ लागली.

पुढे संजय वखरिया हे सीईओ बनल्यावर तर स्पायकर जीन्स जवळपास 550 कोटींची कंपनी बनली आहे.

एकदा स्पायकर वापरणारा मुलगा किंवा मुलगी त्याचा कम्फर्ट अनुभवल्यावर परत दुसऱ्या कुठल्या ब्रँडच्या जीन्सला हात देखील लावत नाही.

आज फक्त जीन्स नाही तर टीशर्ट व इतर गारमेंट क्षेत्रात स्पायकर हा मोठा ब्रँड आहे.

फक्त भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या मॉलमध्ये सर्वत्र स्पायकर जीन्स विकायला ठेवलेल्या असतात आणि त्या प्रचंड प्रमाणात खपतात देखील.

गंमत म्हणजे आजही अनेकांना स्पायकर हा फॉरेनचा ब्रँड वाटतो. खरं तर हेच प्रसाद पाब्रेकर यांच्या यशाचं गमक आहे.

मराठी माणूस बिजनेस मध्ये यशस्वी होऊ शकत नाही म्हणतात मात्र प्रसाद पाब्रेकर यांच्या स्पायकरने हे खोटं ठरवलं आहे.

अस म्हणतात की जीन्सचा जन्मच मुंबईच्या डोंगरीमध्ये झाला. आज याच मुंबईची मराठमोळी जीन्स जगभरातल्या मोठ्या ब्रँडना घाम फोडत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.