श्रीशांत आपल्यासाठी आपल्या EX प्रमाणे आहे जिला आठवलं तर त्रास होतो पण विसरू शकत नाही.

नाव शांताकुमारन श्रीसंत. फक्त नावातच शांत बाकी उद्योग म्हणजे गावाला लाज आणणारे. एस. श्रीसंत भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त प्लेयर.

जगभरातील लोक एस. श्रीसंतचा त्याच्या आयुष्यभरापर्यंत चुकांबद्दल तिरस्कार करतात. काहीजण ते चुकण्यापेक्षा पाप मानतील. पण कबूल करूया, तो एकेकाळी आपला डार्लिंग होता.

केरळमध्ये शाळा कॉलेजमध्ये असताना डान्स शोचा विनर असलेला हा श्री पुढे जाऊन एक क्रिकेटर बनेल अस कुणाला वाटलं नव्हतं. एक लेग स्पिनर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आपल्या यॉर्कर टाकण्याच्या छंदापायी फास्ट बॉलर बनला. पहिले एमआरएफ पेस फौंडेशन आणि नंतर त्याचा सिनियर टिनू योहाननकडून प्रेरणा घेत नॅशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला.

२००२ मध्ये रणजी ट्रॉफी मधून क्रिकेट मध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्याने ७ मॅच्समध्ये २२ विकेट्स घेऊन आपली योग्यता सिद्ध केली. त्यानंतर तीनच वर्षात म्हणजे २००५ मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय वादग्रस्त करिअरला सुरुवात झाली.

चॅलेंजर सिरीज सुरु होती. श्रीसंत इंडिया ए की बी अशा कोणत्या तरी संघात होता. त्याकाळात सचिन थोडासा आउट ऑफ फॉर्म होता. श्रीसंतने त्याला दोन बाउन्सर टाकले आणि चक्क भारतीय क्रिकेटमधला देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या तोंडासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून काही तरी पुटपुटला.

ज्या खेळाडूला शोएब अख्तर, ब्रेट ली वगैरे स्लेज करायला जात नाहीत त्याला हा कालपरवाचा आलेला बॉलर शिव्या देत होता. असं कधीही घडलं नव्हतं.

सचिन काही बोलला नाही. पुढच्याचं बॉलला त्याने श्रीसंतला डोक्यावरून सिक्स मारला.

श्रीसंतच्या या आगावूपणावर देशभरातून टीका झाली होती. पण तारुण्याच्या जोशात असणऱ्या श्रीला काही फारसा फरक पडला नाही. याच चॅलेंजर सिरीज मध्ये श्रीसंतने ‛मॅन ऑफ द सिरीज’ अवॉर्ड जिंकला होता.

याच कामगिरीच्या जोरावर २००५ मध्ये त्याने टीम इंडिया मध्ये स्थान मिळवलं. त्याची आक्रमकता अंगावर येणारी होती. विरोधी टीमच्या खेळाडूना सोडा आपल्यासारख्या प्रेक्षकांनासुद्धा एक भारतीय फास्टर बॉलर इतका आक्रमक होऊ शकतो याची सवय नव्हती,

२००६ साली आफ्रिका दौऱ्यात श्रीसंतच्या आक्रमकते मुळेच आपण त्यांना पहिल्या कसोटीत ८४ धावावर ऑल आउट करण्याचा पराक्रम करू शकलो.

आणि बाकी काहीही असलं तरी २००७ सालाचा पहिला टी-२० वर्ल्डकप श्रीसंत जर नसता जिंकण्याची कल्पना करता येऊ शकत नाही.तेव्हाच्या सेमिफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ ओव्हर्स मध्ये फक्त १२ रन्स देऊन गिलख्रिस्ट आणि हेडन यांच्या घेतलेल्या विकेट्स आणि पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये पकडलेला शेवटच्या विकेटचा मॅच विनिंग कॅच भारतीय क्रिकेट प्रेमी कधीच विसरू शकत नाही.

याशिवाय आंद्रे नेलला मारलेल्या सिक्स नंतर मैदानावर दाखवलेलं डांस कौशल्य कायम लक्षात राहणार आहे.

पण सातत्याचा अभाव श्रीसंतला टीमच्या आतबाहेर करायला लावू लागला. मैदानावरची आक्रमकता त्याच्या रागात बदलत होती आणि याच रागातून त्याच्या हातून चुका होत गेल्या.

२००७ मध्येच एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुल म्हणून ओळखला जाणारा धोनीसुद्धा चिडून श्रीसंतला उद्देशून म्हणाला होता की,

“जर आपल्या रागाने टीमचे नुकसान होत असेल तर अशा स्थितीत आपण स्वतःवर ताबा ठेऊन शांत राहील पाहिजे.”

ही श्रीसंतला मिळालेली अखेरची वॉर्निंग होती. मात्र नेहमीप्रमाणे त्याकडे श्रीसंतने दुर्लक्ष केलं.

पुढे २००८ मध्ये आयपीएल सुरू झालं. श्रीसंतला पंजाबने विकत घेतलं. मुंबई विरुद्ध पंजाब मॅच चालली होती. श्रीसंतने हरभजनला झिरोवर आऊट केलं आणि आपल्या स्टाईलमध्ये त्याचं सेलिब्रेशन केलं. पण मॅच संपल्यावर जेव्हा श्रीसंत हरभजनला भेटायला ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा भज्जीने त्याच्या कानफटात लागून दिली.

याच घटनेपासून त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर तो बराच टीम इंडिया मधून बाहेर होता. २०११ च्या वर्ल्डकप मध्ये त्याला मिळालेली संधी शेवटची ठरली. त्यानंतर तो पुन्हा टीम इंडियात दिसला नाही.

पण आयपीएल मध्ये खेळणं चालू होतं तर २०१३ मध्ये त्यातही त्यानं कांड केलं. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना मॅच फिक्सिंग केली. फिक्सिंगचे आरोप सिद्ध झाल्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेट मध्ये खेळण्यास त्याच्यावर आजीवन बंदी घातली गेली.

क्रिकेट पासून दूर असताना डान्स शो मध्ये गेला मग  राजकारणात गेला. भाजप कडून निवडणूक लढली पण त्यातही फेल झाला आणि मग बिगबॉस मध्ये गेला. तिथं देखील त्यानं आपली खोडी करण्याची सवय काय सोडली नव्हती. बिगबॉसच्या घरातील इतर सदस्यांसाठी तो डोकेदुखी ठरला होता.

पण याच बिग बॉस मध्ये त्याने एक गोष्ट मान्य केली ज्या सचिनचा आपण अपमान केला त्यानेचं आपल्यावर माणुसकीच्या भावनेने वागवल.

२०११ सालच्या वर्ल्डकपवेळी त्याची कामगिरी सुमार झाली होती. जेव्हा आपण वर्ल्डकप जिंकलो तेव्हा अख्खा देश सेलिब्रेशन करत होता. पण त्यावेळी मिडिया पासून सहखेळाडूंपर्यत सगळ्यांनी श्रीसंतकडे वाळीत टाकल्याप्रमाणे केलं होतं. फक्त सचिन हा एकमेव खेळाडू होता ज्याने श्रीसंतचं नाव आपल्या मुलाखतीमध्ये घेतलं होतं.

मागच्या वर्षी बीसीसीआयने त्याच्यावर दया दाखवून त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याची घोषणा केली असून ती आता संपेल. पण आज त्याच वय ३७ झाल. त्याला मैदानात पाहता येईल का माहित नाही.

तो आम्हा भारतीयासाठी एखाद्या एक्स प्रमाणे आहे. एकेकाळी त्याच्यावर प्रचंड प्रेम केलं आणि आता तितकंच त्याला हेट करतो. पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरला आपण स्वीकारू शकतो पण आपल्या श्रीसंतला नाही कारण ब्रेकअपशी डील करणे जमतच नाही.

आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीशांत आपल्यासाठी आपल्या एक्स प्रमाणे आहे जिला आठवलं तर त्रास होतो पण विसरू शकत नाही.

  • भिडू प्रथमेश जोशी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.