पुष्पाला श्रेयस, बाहुबलीला शरद केळकर असाच KGF च्या रॉकीला सचिन गोळेने आवाज दिलाय

गेल्या काही काळापासून साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय लेव्हलचा धुमाकुळ घालतायेत हे आपण पाहतोच. ‘बाहुबली’ पासून ते ‘केजीएफ’पर्यंत सर्वच चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे बॉलिवूड स्टार्सची झोप उडालीय हे मात्र नक्की.

आणि याच चित्रपटांना हिंदी भाषिक राज्यामध्ये हिट करण्यात वाटा असतो तो त्या हिरोच्या पात्रांना हिंदी आवाज देणाऱ्या डबिंग आर्टिस्टचा.

आपल्याला बाहुबली मधले प्रभासचे डायलॉग्स कळले ते फक्त मराठी अभिनेता शरद केळकरमुळे. पुष्पा मधले अल्लू अर्जुनाचे डायलॉग्स कळले ते फक्त श्रेयस तळपदेमुळे. 

आता विषय येतो ‘केजीएफ चॅप्टर २’ चा…

यात देखील एका मराठी भिडूने सुपरस्टार रॉकी ला आवाज दिला आहे. ज्यामुळे हिंदीमध्ये केजीएफ अक्षरशः धुमाकूळ घालतोय.

सुपरस्टार यशचे डायलॉग्स हिंदीत डब करणाऱ्या सचिन गोळे या कलाकाराचे नाव तुम्ही कधी ऐकलंही नसेल. त्याचं नाव आहे सचिन गोळे. सचिन हा डबिंग आर्टिस्ट आहे. गेल्या १४ वर्षांपासून सचिन गोळे डबींगचं काम करतो. बरं केजीएफ चॅप्टर २ मध्येच नाही तर केजीएफच्या पहिल्या पार्ट मध्ये देखील सचिनने यशला हिंदी आवाज दिला होता. हेच २ चित्रपट नाही तर त्याने शेकडो चित्रपटांना आवाज दिलाय.

खरं तर तेंव्हापासूनच सचिन प्रसिद्धीच्या झोतात आला. शरद केळकर, श्रेयस तळपदे आणि आता याच लिस्ट मध्ये सचिन गोळेचंही नाव सामील झालंय.

त्याची स्ट्रगल स्टोरी देखील एखादया सिनेमाच्या स्टोरीसारखीच आहे..

सचिन २००० साली हिरो बनण्याच्या इच्छेने मुंबईत आला होता. मुंबईत आल्यावर खूप धडपड केली, शेकडो ऑडिशन्स दिल्या, पण त्याला एकही संधी मिळाली नाही. रोजगार काहीच नव्हता. कधी कधी तर त्याच्याकडे खायलाही पैसे नसत.

नेमकी त्याची दोस्तीची दुनिया भारी निघाली. सचिनचा अनिल म्हात्रे नावाचा जिवलग मित्र त्याच्या मदतीला धावून आला. त्यानेच सचिनची ओळख प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट गणेश दिवेकर यांच्याशी करून दिली. त्यानंतर काही काळ साऊंड स्टुडिओत बसून डबिंगची टेक्निक समजून घेण्यात गेला. 

डबिंग शिकण्यासोबतच स्वतःचा खर्च भागवण्यासाठी गणेश बँकांमध्ये होम लोनची कामेही करायचा. ऑफिस संपलं की, लागलीच तो साऊंड स्टुडिओ गाठायचा. कधी कधी तर असं व्हायचं कि ऑफिसला फक्त हजेरी लावायचा अन गुपचूप तो स्टुडिओत जायचा. 

पण नेमकं एकदा त्याची चोरी पकडली गेली. पण त्याचा बॉस बिचारा चांगला निघाला. त्यानेच तर सचिनला ठणकावून सांगितले, तुला जे करायचे आहे तेच कर पण मनापासून कर. एकाच वेळी दोन जहाजांमध्ये पाय नसतोय ठेवायचा.

मग काय सचिन त्यानंतर सलग ७-८ महिने डबिंगवरच फुल व फोकस्ड होता.

एका स्टुडिओ मधून दुसऱ्या स्टुडिओ मध्ये जाऊ लागला, अनेक जागी त्याला टोमणे मिळत होते, “ टोन मराठी आहे, जीभ स्पष्ट नाही, तुम्ही हळू बोलता, तुमचे संवाद कलाकारांच्या ओठांशी जुळत नाहीत थोडक्यात लिप सिंक जमत नाही”. 

पण त्याला अशीही काही लोकं मिळालीत ज्यांनी उच्चार, बोलण्याचा लहेजा सुधारण्यात मदत केली. अनेक स्टुडिओला भेट दिल्यानंतर डबिंगच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या मिळू लागल्या.

आणि मग काय साऊथच्या चित्रपटांमुळे गाडी रुळावर आली. सचिनला हळूहळू दक्षिण भारतीय चित्रपटांचे डबिंग करण्याची संधी मिळू लागली. पण तेंव्हा म्हणजेच १० वर्षांपूर्वी साऊथ चित्रपटांच्या डबिंगला फारसे पैसे नसत मिळत. 

मग धनुषच्या चित्रपटांनी सचिनचं आयुष्य बदललं…

धनुषचा ‘ताकत मेरा फैसला’ हा त्याच्या डबिंग करिअरमधील पहिला मोठा ब्रेक होता. धनुषचा सुपरहिट चित्रपट ‘मारी’, ज्याचे नाव हिंदीमध्ये ‘राउडी हिरो’ होते. मारीसाठी धनुषच्या रोलसाठी सचिनने एक वेगळी शैली पडकडली होती. कारण त्यात धनुष एक मवाली पात्र असल्यामुळे टिपिकल ‘बंबया’ टच दिला गेला. प्रेक्षकांना शैली खूप आवडली. 

त्यानंतर हळूहळू धनुषचे जितके चित्रपट आले, तितके हिंदीत डब होत गेले. यानंतर ओटीटीचा जमाना सुरु झाला. अन मग अनेक वेब सिरीज आणि कार्टून पात्रांनाही सचिनचा आवाज दिला गेला.

पण या सगळ्यात KGF पार्ट १ हा करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.

KGF आधी देखील सचिनने यशच्या अनेक चित्रपटांचे हिंदी डबिंग केले होते, पण यशला याची कल्पनाच नव्हती. पण KGF च्या पहिल्या पार्टच्या वेळेला हिंदी डबिंगसाठी आवाज शोधण्याची वेळ आली तेव्हा निर्माते आणि यश यांनी सर्व YouTube वर साऊथचे हिंदी डब केलेले चित्रपट पाहिले. 

या सगळ्या आवाजांमध्ये सर्वांचं लक्ष सचिनच्या आवाजावर गेलं. ऑडिशनमध्ये सचिनने यशचा एक हिट डायलॉग बोलला तो असा… 

“ट्रिगर पे हाथ रखने वाला शूटर नहीं होता, लड़की पे हाथ डालने वाला मर्द नहीं होता और अपुन की औकात अपुन के चाहने वालों से ज्यादा और कोई समझ नहीं सकता’

बस्स….यशच्या रोल ला सूट होणारा भारदस्त आवाजातला हा डायलॉग ऐकून यशने KGF’ च्या डबिंग साठी सचिनलाच निवडलं.

KGF च्या हिंदी डबिंगनंतर काही दिवसांनी यश स्वतः सचिनसोबत स्टुडिओत बसू लागला.

सचिन गोळे हे आज डबिंग आर्टिस्टच्या जगात एक मोठे नाव बनले आहे. आता लोक त्याला ओळखू लागले आहेत. ज्यांना आधी समज दिली नाही ते आता आदराने बोलावून बसवतात. आज सचिनचा आवाज ही त्याची ओळख बनली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.