कोविडचा विषयही नव्हता, तेव्हा क्रिकेट मॅचमध्ये खेळाडू मास्क घालून उतरले होते…

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या आसमंतात एकच गाणं वाजतंय,

ते म्हणजे दाटले रेशमी आहे धुके धुके…

नाय म्हणजे हिवाळ्यात धुकं असतं? पण एवढं? ज्यांची घरं उंच टॉवरमध्ये आहेत त्यांना तर लई बाप व्ह्यू दिसत असेल. आता महाराष्ट्रातलं हे धुकं पडलंय ते कडाक्याची थंडी आणि त्यात सुरू असलेल्या पावसामुळं. पण हाताची बोटं सारखी नसतात, तसं सगळीकडचं धुकं पण सारखं नसतंय.

म्हणजे आता बघा आपल्याकडचं धुकं तसं रोमँटिक आहे आणि दिल्लीकडचं धुकं आहे जीवघेणं. दिल्लीत महाराष्ट्रापेक्षा जास्त थंडी आहे, त्यामुळं तिथं धुकं पडणं स्वाभाविक आहेच. पण दिल्लीतल्या प्रदूषणानं इतका कहर केलाय की मध्यंतरी तिथं लॉकडाऊनही करण्यात आलं होतं. दिल्लीकर एकवेळ कोविडला भिऊन मास्क घालणार नाहीत, पण प्रदूषण म्हणलं की त्यांच्या तोंडावर मास्क आलंच.

मास्कवरुन आठवलं, कोविड आल्यापासून मास्क न घालता जाता येतंय असं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं घर. बाकी सगळीकडे मास्क पाहिजे म्हणजे पाहिजेच. तसं आपल्याला उभ्या आयुष्यात वाटलं नव्हतं, की हॉस्पिटल सोडून कुठं मास्क घालावा लागेल, त्यातही क्रिकेटच्या ग्राऊंडवर तर मुळीच नाही.

जिथं गल्ली क्रिकेटमधली पोरं मास्क घालायचा विचार करत नव्हती, तिथं आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सचं काय घेऊन बसलात. एवढ्या कडकमध्ये दाढी वाढवलेली असते, सनस्क्रीम लावलेलं असतं, त्या सगळ्यावर मास्क घालून खेळायचं म्हणजे छातीचा पिंजरा होणार की भिडू. पण आपल्याला जे जे अशक्य वाटत असतं, तेच फिक्स होत असतं. उदाहरणार्थ आपल्याला आवडणाऱ्या पोरीनं आपल्यापेक्षा चम्या दिसणाऱ्या पोराशी लग्न करणं, खेळाडू मास्क घालून क्रिकेटच्या मैदानात येणं.

तर हा किस्सा झाला होता बरोब्बर चार वर्षांपूर्वी, म्हणजेच डिसेंबर २०१७ मध्ये. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना होता. थंडीचे दिवस होते, त्यामुळं दिल्लीत स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश दिसेल अशी अपेक्षाच नव्हती. राजधानीला धुक्याचा आणि त्यातच प्रदूषणाचा विळखा बसला होता. त्यामुळं समोर जे काय घडतंय, ते इंटरनेट गंडल्यावर युट्युबचे व्हिडीओज दिसतात तसं दिसत होतं. एकदम 144p…

अशातही टेस्ट मॅच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताची पहिली बॅटिंग होती. मुरली विजयनं कडक सेंच्युरी केलीच, पण आपल्या होम ग्राऊंडवर स्टार ठरला तो कॅप्टन विराट कोहली. त्यानं खणखणीत २४३ रन्स चोपले. गडी त्याकाळी फॉर्मात होता. रोहित शर्मानीपण फिफ्टी केली, त्यामुळं भारताचा स्कोअर झाला ५३६.

पाहुण्या लंकेला अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमलच्या शतकांनी थोडंफार तारलं, पण बाकी बॅटर्सची चांगलीच घसरगुंडी उडाली. त्यामुळं लंकेचा स्कोअर झाला, ३७३. भारतासाठी तसं सवयीचं वातावरण होतं, त्यामुळं दुसऱ्या डावातही कडक बॅटिंग केली आणि लंकेसमोर आव्हान ठेवलं ४१० रन्सचं.

भारताची बॅटिंग सुरू असताना लंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले. प्रदूषणाचा त्रास होत असल्यामुळं सामना बऱ्याचदा थांबवण्यातही आला. मॅचमध्ये भारताचं वर्चस्व दिसत होतं, तर लंकन खेळाडू भारताचे खुंखार बॅटर्स आणि प्रदूषण अशा दोन्ही गोष्टींचा सामना करत होते. साहजिकच त्यांची देहबोली काहीशी डाऊन होती.

हिंदीमध्ये कमेंट्री करणाऱ्या कार्यकर्त्यांना उगाच खोड्या काढायचं सुचलं. ‘पराभव होतोय म्हणून तोंड लपवण्यासाठी लंकन खेळाडू मास्क घालत आहेत’ असे बोलबच्चन त्यांनी टाकले. पाहुण्या लंकेच्या अनेक खेळाडूंना श्वास घ्यायलाही त्रास होत होता, याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.

भारताचा पेस बॉलर मोहम्मद शमी बॉलिंग करू लागला, तेव्हा त्यालाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि कमेंटेटर्स चांगलेच तोंडावर आपटले.

फिल्डिंग करतानाही मास्क तोंडावरच ठेऊन खेळत लंकेनं सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. या मास्कवाल्या सामन्याची चर्चा मात्र जगभर झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी, ‘हा सामना खेळायला परवानगी द्यायला नको होती,’ असं मत व्यक्त केलं. आयसीसीनंही प्रदूषणाबद्दल धोरण आखायला हवं अशी चर्चाही झाली. पुढं ही मॅच विस्मृतीत गेली.

कोविडचं थैमान सुरू झाल्यावर सगळ्यांच्या तोंडावर मास्क आले खरे, पण सगळी टीम मास्क लाऊन मैदानात उतरण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. कानपूर आणि मुंबईत झालेल्या टेस्ट मॅचेस दिल्लीत झाल्या असत्या, तर कदाचित केन विल्यम्सनचं हसू मास्कच्या मागे लपलं असतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.