मंत्र्यांना वाटायचं, “थेरड्याला काय कळतं.” पण राज्यपालांच्या एका अहवालामुळे महाराष्ट्र बनला..

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ. स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्यासारखे काँग्रेस नेते चंद्र सूर्य आहे तो पर्यंत कधीच महाराष्ट्राची निर्मिती होणार नाही असं म्हणायचे. पण मराठी माणसाचा आवाज बंद करणे शक्य नव्हते.

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि महाराष्ट्राच्या आंदोलनाला वेग आला. मुख्यमंत्री मोरारजींनी हे आंदोलन दडपशाहीने मोडून काढण्याचा प्रयत्न देखील केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं पण आंदोलनातून मागे हटले नाहीत. तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचे अनेक उमेदवार पडले.

संयुक्त महाराष्ट्राचा वाढता जोर शांत करण्यासाठी नेहरूंनी गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्य बनवलं आणि यशवंतराव चव्हाणांच्या रूपात मराठी माणसाला मुख्यमंत्रीपदी संधी दिली.

मोरारजींच्या मानाने यशवंतरावांचा कारभार अधिक लोकाभिमुख होता. त्यामुळे काँग्रेस विरोधातला असंतोष दूर होण्यास मदत होईल असा नेहरूंचा कयास होता. यशवंतराव देखील केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात जाणारे नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राची मागणी मागे पडेल असं सगळ्यांना वाटू लागलं होतं.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे त्यावेळी भारतव्यापी पदयात्रेला निघाले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने ठरवले की विनोबाजींच्या भारतव्यापी पदयात्रेत त्यांचे पाय ज्या ठिकाणी मराठी भूमीवर पडणार होते, त्याच ठिकाणी त्यांना गाठून संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचा पाठिंबा मिळवायचा.

एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली समितीचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तेथे पोहोचले. विनोबाजी त्यांना म्हणाले,

 ‘तुमची मागणी अखेर फेटाळली गेली तर तुम्ही काय कराल? देशातून फुटून निघाल?’ 

या अनपेक्षित प्रश्नाने सर्वजण सुन्नच झाले पण ‘एस.एम.’ हजरजबाबीपणे म्हणाले, 

‘हो. फुटून निघू.’

झाले. बैठक संपली. विनोबाजींनी सर्वाना बसल्या जागीच निरोपाचा नमस्कार केला.

संयुक्त महाराष्ट्र समिती बरोबरच जेष्ठ पत्रकार महेश जोशी देखील सोबत होते. पुढे मुंबईला परतल्यावर एक दिवस अचानक  जोशी यांना राज्यपाल श्रीप्रकाश यांनी बोलावून घेतलं.

श्री प्रकाश हे मोठे स्वातंत्र्य सेनानी होते. छोडो भारत आंदोलनात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. मुंबई प्रांताचा राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी भारताचा पाकिस्तानमधील हाय कमिशनर, आसामचे राज्यपाल , मद्रासचे गव्हर्नर हि पदे भूषवली होती. पंतप्रधान नेहरूंचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. म्हणूनच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुंबई प्रांताचे राज्यपाल पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

श्रीप्रकाश ही जबाबदारी चोखपणे पार पाडत होते. त्यांनी समाजातील सर्व थरातील व्यक्तींशी संपर्क ठेवला होता. यात पत्रकार महेश जोशी यांचा देखील समावेश होता. मध्यप्रदेशच्या काळापासूनच त्यांची आणि जोशी यांची दाट ओळख झाली होती. ते महिन्या दीड महिन्याला निरोप पाठवायचे आणि राज भवनात गप्पा मारण्यासाठी बोलवून परिस्थितीचा आढावा घ्यायचे.

त्यावेळी मात्र राज्यपालांनी अचानक बोलावलं याबद्दल जोशींना प्रचंड आश्चर्य वाटलं. ते गडबडीने राजभवनात गेले. इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्यावर राज्यपालांनी थेट विनोबा भावे आणि एस एम जोशी यांच्या भेटीचा विषय काढला आणि थेट महाराष्ट्र फुटून बाहेर पडणार आहे का असं विचारलं.

महेश जोशी यांनी सांगितलं  ‘जे आपल्याला कळले आहे ते सर्व खरे आहे.

राज्यपालांनी विचारलं, ‘हे घडू शकेल? तुम्हाला काय वाटते?’

जोशी म्हणाले,

‘आज तर तसे वाटत नाही. कारण, प्रश्नाचे अंतिम उत्तर मिळायचे आहे. ते जर अन्यायकारक असेल तर काहीही होऊ शकते. कारण, अशा फुटीरपणाचा फायदा घ्यायला जगातील अधिसत्ता उत्सुकच आहेत.

पुढे राज्यपालांची आणि जोशींची अशीच दोनदा भेट झाली पण, हा विषय त्यांनी काढला नाही. पण पुन्हा एके दिवशी अचानक जोशींना त्यांचे बोलावणे आले. महेश जोशी राजभवनावर गेले. चहा होईपर्यंत इतरच गोष्टी झाल्या, पण ते निरोप घ्यायला उठलो तर राज्यपाल म्हणाले,

‘इट इज नॉट अ डय़ुरेबल कमॉडिटी!’ (हे द्विभाषिक काही टिकाऊ संस्थान नाही !)

महेश जोशी सांगतात,

राज्यपालांनी असा निर्वाळा अचानकपणे माझ्या माथी मारल्यामुळे माझे विचारचक्र वेगाने धावू लागले. याचा अर्थ उघड उघड ‘हे द्विभाषिक मोडीत काढा’ असाच होत होता- आणि हा सल्ला ते फक्त भारत सरकारलाच देऊ शकतात! अवघ्या पाच-सात मिनिटात माझ्या अंत:करणात लख्ख प्रकाश पडला.

महेश जोशी राजभवनातून पायीच मुख्यमंत्री निवास असलेल्या  ‘सह्य़ाद्री’कडे आले. पण, यशवंतराव विधीमंडळातून अजून घरी परत आलेले नव्हते. म्हणून जोशी तसेच पुढे शेषराव वानखेडेंच्या बंगल्यावर पोहोचले. यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री असलेले शेषराव नुकतेच विधानसभेचं कामकाज आटपून घरी परतले होते. ’

चहा पिता पिता  दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. महेश जोशी त्यांना सहजपणे म्हणाले,

‘मला असं कळलंय की, हे राज्य फार काळ टिकू शकणार नाही, असा राज्यपालांचा ‘रिपोर्ट’ दिल्लीला गेला आहे.’

शेषराव वानखेडे म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व. ते कोणाचा मुलाहिजा न ठेवता थेट बोलायचे. वानखेडे जोशींना म्हणाले,

‘तू म्हणतोस म्हणून विश्वास ठेवतो, पण त्या थेरडय़ाला काय कळते? त्याचा रिपोर्ट केराच्या टोपलीत गेला असेल.’

इकड-तिकडच्या गोष्टी करत तिथे अर्धा तास घालवला आणि महेश जोशी पुन्हा सह्य़ाद्रीवर आले. तोवर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण घरी परतले होते. पण तिथे गर्दी होती. चारपाच जणांशी बोलल्यावर यशवंतराव जोशींना म्हणाले, ‘बोल आता’

महेश जोशी यांनी वानखेडे यांना जेवढे सांगितले तेवढेच त्यांनाही सांगितले. दोन चार मिनिटे स्तब्ध राहून यशवंतराव म्हणाले,

‘मला हे खरं वाटत नाही पण, म्हातारा फार घाग आहे. तुझी बातमी कुठची?

जोशींनी बातमी दिल्लीची असल्याचं सांगितलं. यशवंतराव त्यावर म्हणाले, 

‘मी अंदाज घेतो. नंतर बोलू’

पुढे आठ दिवसांनी यशवंतरावांनी जोशींना परत बोलावून घेतलं आणि सांगितले की,

‘तुझी बातमी खरी आहे पण, ती ‘माय डिअर जवाहर’ आणि ‘युवर्स श्रीप्रकाश’ अशा खाजगी स्वरूपातली आहे! काही लक्ष देऊ नकोस. द्विभाषिक आणखी दहा वर्षे तरी चांगले चालेल.’

पण यशवंतरावांचा अंदाज चुकीचा ठरला. खरोखरच दिल्लीतून वेगाने घटना घडू लागल्या. पंतप्रधानांच्या सुकन्या इंदिरा गांधी यांचा महाराष्ट्र दौरा (पश्चिम महाराष्ट्र) ठरला आणि पार पडला यशस्वीपणे. महाराष्ट्र झाला तर काँग्रेसला पुन्हा बरे दिवस येतील, असे वातावरण दिल्लीत तयार झाले.

श्रीप्रकाश यांच्याच अहवालाचा आधार घेऊन पंतप्रधान नेहरूंनी मोरारजी देसाई व प्रभूतींचा विरोध असून महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली आणि यशवंतरावांना त्याचा मुख्यमंत्री बनवलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.