श्रीदेवीचं नाव ऐकल्यावर अफगाण अतिरेकी गोळीबार बंद करायचे..
बुझगाशी माहितीय? अफगाणिस्तानमधले अँग्री यंग पठाण घोड्याची शर्यत लावतात आणि आपल्या भाल्यावर शेळी मारतात. तसं बघायला गेलं तर हा खुंखार खेळ. जीवावर उदार होऊन खेळल्या जाणाऱ्या बुझगाशीची माहिती आपल्याला असायचं कारण नाही. पण अखंड भारताला हा शब्द एका हिंदी सिनेमाने शिकवला. खुदा गवाह.
एक प्रॉपर अफगाणी सिनेमा म्हणावा असा हा पिक्चर. आपल्या दिलेल्या वचनासाठी प्राण पणाला लावणारा जाँबाज बादशहा खान बनलेला बच्चन, तू ना जा मेरे बादशाह वगैरे गाणी म्हणून त्याला अडवणारी श्रीदेवी, बच्चनचा बेस्ट फ्रेंड डॅनी, त्याला अटक करणारा प्रामाणिक इंस्न्पेक्टर विक्रम गोखले वगैरे वगैरे स्टार कास्ट. मुकुल आनंद याचे दिग्दर्शक होते.
अग्निपथ, हम सारखे सिनेमा बनवणारे मुकुल आनंद त्याकाळचे आघाडीचे दिग्दर्शक होते. खुदा गवाह हा त्यांचा महत्वाकांक्षी सिनेमा होता. फिरोझ खानच्या धर्मात्मा वगैरे सिनेमा नंतर अफगाणिस्तानमध्ये शूटिंग होणारा हा पहिलाच सिनेमा. बच्चन श्रीदेवी सारखे सुपरस्टार कलाकार पहिल्यांदाच तिकडे शूटिंग साठी येणार होते.
१९९०-९१ सालची हि गोष्ट. सोव्हिएत रशियन सैन्याने माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानमधली परिस्थिती चिघळत चालली होती. कट्टर पंथीय मुजाहिद्दीन अतिरेकी शिरजोर होऊ लागले होते. अमेरिकेने त्यांना रशियाच्या विरुद्ध म्हणून त्यांना शस्त्रास्त्रे पुरवली आता त्याचा फटका संपूर्ण जगाला बसू लागला होता. रस्त्या रस्त्यावर देखील हातात बंदुका घेऊन फिरणारे अतिरेकी दिसायचे. सरकार व अतिरेकी यांच्यात संघर्ष सुरु झाला होता.
अशातच खुदा गवाहची टीम शूटिंग करायला काबुलला येऊन पोहचली. बच्चन व इतर कलाकारांच्या मनात थोडी धाकधूकच होती. पण गंमत म्हणजे या सिनेमाच्या क्रूच काबुल मध्ये जोरदार स्वागतच झालं.
याला कारण होते तिथले राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला. तिथल्या राजकरणात सांड म्हणून ओळखले जाणारे नजीबुल्ला हे अमिताभ बच्चनचे सर्वात मोठे फॅन होते. खुद्द बच्चन आपल्या देशात येतोय म्हणून ते प्रचंड खुश झाले होते. खुदा गवाहच्या शूटिंगसाठी लागेल ती मदत देण्याचं आश्वासन त्यांनी मुकुल आनंदला दिलं होतं.
नुसता आश्वासन दिल नाही तर अफगाण एअरफोर्स पासून निम्मे सैन्यदल या सर्वाना या फिल्मस्टार्सच्या सुरक्षिततेसाठी कामाला लावलं.
काबुल मजार ए शरीफ अशा विविध ठिकाणी खुदा गवाहच शूटिंग झालं. प्रत्येक ठिकाणी त्यांचं शाही पद्धतीने जोरदार स्वागत झालं. अमिताभ बच्चन एकेक ठिकाणी आपल्या आठवणींमध्ये सांगतो कि,
जिथे जाऊ तिथे सर्वत्र रणगाडे आणि सुरक्षा दले तैनात होते. हे सर्व असूनही, ती माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय सहल होती. आम्हाला एका ठिकाणाहून फोन आला, म्हणून डॅनी डेन्जोंगप्पा, मुकुल आणि मी तिथून हेलिकॉप्टरने निघालो. मी सहज खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा आमच्या हेलिकॉप्टरसह इतर ५ हेलिकॉप्टर उडत होते. हवाई दृश्य इतके नेत्रदीपक होते की विचारू नका, पर्वत कधी गुलाबी तर कधी जांभळे होते, कारण हंगामी फुले चहूबाजूंनी बहरलेली होती.
जेव्हा हेलिकॉप्टर दरीत उतरले तेव्हा असे वाटले की वेळ काही क्षणांसाठी थांबली आहे. आम्ही आलेलं पाहून तिथल्या सरदाराने आम्हाला खांद्यावर उचलले, कारण त्यांची परंपरा आहे कि पाहुण्याचे पाय जमिनीवर पडू द्यायचे नाहीत.
आमची राहण्याची व्यवस्था एका किल्ल्यातल्या राजवाड्यात करण्यात आली होती. मला आपण एखाद्या खऱ्या राजेशाही सरदाराप्रमाणे वाटत होतं. त्या दिवशी आमच्यासाठी खऱ्या बूझगाशी खेळाच आयोजन करण्यात आलं होतं. खानपानाची रेलचेल, सभोवती हातात बंदुका व तलवारी घेऊन ते एन्जॉय करत असलेले शूरवीर योद्धे. मला तर अजूनही हि परीकथाच वाटते.
बच्चनच नाही तर श्रीदेवीची सुद्धा अफगाणिस्तानमध्ये प्रचंड क्रेझ होती. तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. श्रीदेवीची एक झलक दिसावी म्हणून जीव द्यायला देखील अफगाण तरुण तयार होते. खुदा गवाहच शूटिंग सुरु असलेल्या एरियात श्रीदेवीचं नाव ऐकल्यावर अफगाण अतिरेकी गोळीबार थांबवायचे.
श्रीदेवीला अफगाणिस्तानात शांतीचं प्रतीक समजलं जात होतं.
शूटिंग झाल्यावर शेवटच्या दिवशी त्यांच्यासाठी राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला यांनी खास डिनर साठी बोलावलं. सर्व कलाकारांवर गिफ्ट्सचा वर्षाव केला. त्यांना ऑर्डर ऑफ अफगाणिस्तानची उपाधी दिली. त्या रात्री नजीबुल्लाच्या काकांनी त्यांच्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीताची रागदारी गायली.
१९९२ साली खुदा गवाह रिलीज झाला. भारतात तो प्रचंड हिट झाला. या सिनेमाच्या संगीताने त्याकाळचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. अफगाणिस्तानमध्ये तर कित्येक दिवस हा सिनेमा खाली उतरलाच नाही. बघेल तिथे तरुण मंडळी तू मुझे कबूल सारखी हिंदी गाणी गुणगुणताना दिसत होती.
पुढे २००१ साली हा सिनेमा अफगाणिस्तान मध्ये पुन्हा रिलीज झाला तेव्हा देखील तो तुफान चालला. आजही अफगाणिस्तानमध्ये सर्वात सुपरहिट सिनेमा हा पश्तून भाषेतला नाही तर तो आहे खुदा गवाह.
हे हि वाच भिडू :
- २० वर्षात अमेरिकेने ६१ लाख कोटी खर्च केले, पण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या हातात गेले
- मोगलीचं टायटल सॉंग विशाल भारद्वाजला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देऊन गेलं..
- अमर अकबर अँथनीचा दिग्दर्शक कादर खानची स्क्रिप्ट फाडून गटारीत फेकणार होता..
- आईच्या नशिबी जे दुःख आलं तेच दुःख कादर खानच्या वाट्याला सुद्धा आलं होतं!!