बोनी कपूरच्याही आधी श्रीदेवीने एक सिक्रेट लग्न केलं होतं.

तमिळनाडूच्या शिवकाशी जवळ मिनामपट्टी येथे १३ ऑगस्ट १९६३ रोजी श्री अम्मा यंगर अयप्पन उर्फ श्रीदेवी चा जन्म झाला. तिची आई राजेश्वरी एकेकाळची तेलगु अभिनेत्री होती. वडील शिवकाशी मध्ये मोठे वकील होते.

लहानपणापासून श्रीदेवी मोठी चुणचुणीत होती. तिचे डोळे मोठे बोलके होते. नाचायची देखील छान. तिची आई राजेश्वरी खूप महत्वाकांक्षी होती. तिने अवघ्या तिसऱ्या वर्षी श्रीदेवीला अभिनय क्षेत्रात उतरवल.

श्रीदेवीने बालकलाकार म्हणून तामिळ व तेलगु सिनेमात खूप नाव कमावल.

तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. बालकलाकार म्हणून काम करत असतानाच श्रीदेवीला एका मोठ्या फिल्ममध्ये लीड हिरोईनची ऑफर मिळाली. के बालाचंद्र यांचे दिग्दर्शक होते. त्यावेळचा टॉपचा सुपरस्टार कमल हसन हिरो असणार होता तर रजनीकांत व्हिलन.

राजेश्वरीने ही संधी हातची जाऊ दिली नाही.

फक्त १३ वर्षांची असलेली श्रीदेवी मुन्दरू मुदिचू या सिनेमात कमल हसनची हिरोईन आणि रजनीकांतची सावत्र आई बनली.

हा सिनेमा हिट झाला. इथून श्रीदेवीची गाडी सुसाट सुटली. कमल हसनसोबत तिची जोडी चांगली जमली होती. मात्र याच बरोबर रजनीकांत, एनटी रामाराव, शिवाजी गणेशन अशा अनेक दिग्गजांसोबत तिने काम केले.

दक्षिणेतल्याचा रिमेक असलेल्या हिंमतवाला मधून श्रीदेवीने बॉलीवूडला धडक दिली. नैनो मे सपना, ताकी ओ ताकी सारखी गाणी भारतभरात सुपरहिट झाली. हिंमतवालाने सगळे रेकोर्ड ब्रेक करत तुफान कमाई केली. जितेंद्रबरोबरच श्रीदेवीची ओळख घराघरात पोहचली.

रेखाचा वारसा चालवण्यासाठी नवीन साऊथची हिरोईन हिंदी सिनेमासृष्टीत आली होती.

हिंमतवालाच्या यशामुळे श्रीदेवीला एकापाठोपाठ एक  अनेक सिनेमाचे ऑफर येत गेले. श्रीदेवीने देखील ते सगळे साईन केले. तिचा डान्स, तिचा अभिनय, तिची कॉमेडीची टायमिंग अफलातून होती. जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी जमली होती. तोहफा, मवाली, सुहागन, औलाद हे खास दक्षिण स्टाईलचे या दोघांचे सिनेमे तिकीटबारीवर धूम उडवून देत होते.

अशातच श्रीदेवीने जाग उठा इन्सान नावाचा एक नवीन सिनेमा साईन केला.

जाग उठा इन्सान हा देखील एका तेलगु सिनेमाचा रिमेक होता. त्याचे दिग्दर्शक के.विश्वनाथ हेच हा हिंदी सिनेमा बनवत होते. सिनेमात हिरो होते मिथुन चक्रवर्ती आणि राकेश रोशन. एक दलित मुलगा आणि ब्राम्हण मुलगी प्रेमात पडतात अशी काहीशी स्टोरी होती.

हिम्मतवाला प्रमाणे नुकताच मिथुनचा डिस्को डान्सर सुपरहिट झाला होता. भारताबाहेर रशिया वगैरे देशात देखील त्याची हवा झाली होती. या सिनेमाने त्याकाळी १०० कोटी कमवले होते.

एकूणच मिथुन तेव्हा भारतातल्या सर्वात मोठ्या कलाकारामध्ये गणला जात होता.

त्यामानाने श्रीदेवी अजून स्थिरस्थावर होत होती. रांगड्या मिथुनदाने जाग उठा इन्सानच्या सेटवर श्रीदेवीला फुल इम्प्रेस केले. त्याची डान्स करण्याची अदा, त्याचे डायलॉग, त्याची स्टाईल, त्याचा ड्रेसिंग सेन्स सगळच अनोख होतं. मिथुनदासुद्धा श्रीदेवीच्या डोळ्यानी दिवाना झाला.

त्याकाळी श्रीदेवीची आई तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सेटवर यायची. मात्र तिची नजर चुकवून मिथुनदा आणि श्रीदेवीच्या लीला रंगल्या. राकेश रोशन सिनेमाचा प्रोड्युसर देखील होता. त्याने या दोघांना त्यांची प्रेमकहाणी राजेश्वरी पासून लपवण्यास मदत केली.

पुढे जाग उठा इन्सान सिनेमा रिलीज झाला, फ्लॉप झाला पण या सिनेमामुळे मिथुन व श्रीदेवीची  दोघांची लव्हस्टोरी आकारास आली.

पण या लव्हस्टोरीला एक ट्विस्ट होता.

आपले मिथुनदा मॅरीड होते. योगीता बाली या अभिनेत्री बरोबर लग्न करून त्यांना पाच वर्षे झाली होती. नुकतच त्यांना एक पुत्ररत्न झाले होते. एवढ सगळ असूनही मिथुनदा श्रीदेवीच्या प्रेमात पागल झाले होते.

श्रीदेवीला त्याच्या लग्नाबद्दल ठाऊक होतं. पण प्रेमापुढे नाईलाज अशी तिची अवस्था झाली होती.

त्यातच या लव्हस्टोरीला तिसरा कोन होता. बोनी कपूर. हे महाशय सुद्धा विवाहित होते आणि श्रीदेवीच्या खास जवळच्या व्यक्तीमध्ये सामील होते. दोघांच्या मैत्रीमुळे मिथुनदा मात्र खूप नाराज असायचे. श्रीदेवीने मिथुनची खात्री पटावी म्हणून बोनी कपूरला राखी देखील बांधली होती अस म्हणतात.

ते काहीही असल तरी या दोघांच्या स्टोरीजमुळे गॉसिप मासिकांचा धंदा वाढला होता.

अशातच एक दिवस उटीला जाऊन मिथुन आणि श्रीदेवीने सिक्रेटली लग्न केलं. बॉलीवूडच्या शोधपत्रकारांना याचा पत्ता देखील लागला नाही. योगीता बालीला जेव्हा हे कळाल तेव्हा मात्र तिच्यावर आभाळ कोसळलं. एरव्ही ती कायम इंटरव्ह्यूमध्ये वगैरे म्हणायची की,

“मिथुनने मला सवत आणली तरी मला काही प्रॉब्लेम नाही.”

पण जेव्हा खरोखर मिथुनने दुसरे लग्न केले तेव्हा योगीता बालीला हा धक्का सहन झाला नाही.

तिने सरळ जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मिथुनदाने कसेबसे तिला वाचवले. त्याच्या लक्षात आले की हे असच चालू राहिलं तर आपलं काही खर नाही. श्रीदेवीच्या नादात आपला चांगला चाललेला संसार आणि करीयर दोन्हीपण संपून जाणार हे ओळखून मिथुनने श्रीदेवीपासून हळूहळू अंतर बनवायला सुरु केलं.

श्रीदेवीला पण कळाल की मिथुन आपल्या पहिल्या बायकोला सोडू शकत नाही. गप्प सन्मानाने वेगळे झालेले बरे.

दोघांनी समजुतीने लग्न रद्दबादल केले. या घटनेनंतर तीन वर्षांनी मिडियाला हे सगळ कळाल. पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. मिथुन आणि श्रीदेवीच्या लग्नाच गॉसिप संसदेपर्यंत सुद्धा पोहचलेल आणि तिथून श्रीदेवीला फोन पण आला होता अस सांगतात.

बाकी काही का असेना मिथुन आणि श्रीदेवीने आपलं ब्रेकअप व्यवस्थित हँडल केलं. पुढे एकमेकासोबत काम देखील केलं. १९९६ ला श्रीदेवीने बोनी कपूर बरोबर अधिकृतरीत्या लग्न केलं. त्यांना दोन गोड मुली देखील झाल्या.

प्रेमाच्या शोधात अनेक वेळा धोका खालेल्या श्रीदेवीचा संसार अखेर मार्गी लागला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.