तेरा वर्षाची असताना श्रीदेवीला सुपरस्टार रजनीकांतच्या आईचा रोल करायला लागला होता.

दक्षिणेत एक दिग्दर्शक आहेत के बालचंदर त्यांच नाव. कधी ऐकलं असेल तुम्ही. ऐकलं नसेल तर ऐका. एकूण ९ नशनल अवार्ड हायत त्यांच्या नावावर आणि तेरा फिल्मफेअर. बाकी दक्षिणेतले नंदी वगैरे अवार्ड असतील ते वेगळेच. त्याला वेगळी खोली केलेली त्यांनी. लेखक किंवा दिग्दर्शक या नात्याने जवळपास शंभरच्या वर पिक्चरच्या पाट्यामध्ये त्यांच नाव येत. फक्त पिक्चरचं नाही तर कमल हसन पासून ते चिरंजीवी पर्यंत आणि रजनीकांत पासून ते प्रकाश राज पर्यंत अनेकांना त्यांनी घडवल आहे.

असा हा बाप माणूस.

एकदा काय झालं ओ सीता कथा नावाच्या तेलगु पिक्चरचा ते रिमेक बनवणार होते. जयललिता यांचा फेमस थंगा गोपुरम या सिनेमाचा पुढचा पार्ट असणार होता. के बालचंदर यांनी आपल्या लाडक्या कमल हासनला हिरो म्हणून घेतलं होतं. तर या सिनेमाचा व्हिलन होता रजनीकांत. या दोघानाही त्यांनीच सिनेमात आणल होतं. तसं बघायला गेलं तर दोघेही नवीनच होते आणि विशेष म्हणजे बालाचंदर यांच्या उपकाराखाली दबलेले होते. त्यांना नाही म्हणणे शक्य नव्हतं.

रजनीकांतला येऊन एकच वर्ष झालेलं. बालाचंदर यांना सिनेमाची हिरोईन पाहिजे झाली होती. शोधलं भरपूर कोण सापडेना. स्टोरी जबरदस्त होती त्याला जस्टीस देणारी अक्टिंग येणारी नटी लागणार होती. बालाचंदर यांची खासियत म्हणजे त्यांची पारखी नजर. याच पारखी नजरेने एका बस कंडक्टरचा रजनीकांत आणि एका डान्स डायरेक्टरचा कमल हासन बनवलेलं.

ही नजर पडली एका पिक्चरमधल्या चाईल्ड आर्टीस्टवर. नाव श्री अम्मा यंगर अयप्पन उर्फ बेबी श्रीदेवी . बोलके डोळे, एकदम सहज जमणारी अक्टिंग, डान्ससुद्धा चांगलं करायची. तमिळ सिनेमाच्या मानानं परफेक्ट पॅकेज. बालकलाकार म्हणून भरपूर अवार्ड सुद्धा जिंकलेले. फेमस सुद्धा झाली होती. बालाचंदर यांना वाटलं आता मोठी झाली असेल बघू विचारून.

श्रीदेवीची आई खूप महत्वाकांक्षी होती. तिला आपल्या मुलीचं टॅलेंट ठाऊक होत. पोरगी पुढ जाऊन नाव काढणार हे सगळेच म्हणायचे. पण श्रीच्या आईला खूप गडबड होती. फॉर्मात असलेल्या कमल हसन बरोबर काम करायला मिळतंय म्हणून ती एकदम खुश होती. त्यात बालाचंदर विचारत आहेत म्हटल्यावर नाही म्हणण शक्य नव्हतं.

मग काय फायनल झालं, मुन्दरू मुदिचू नावाच्या बालाचंदरच्या पुढच्या सिनेमात हिरो कमल हसन, व्हिलन रजनीकांत आणि बारा वर्षांची श्रीदेवी हिरोईन.

पिक्चरची स्टोरी सांगतो.

कमल हसन आणि रजनीकांत दोघे दोस्त असत्यात. कमलचा आपल्या रजनीवर लई विश्वास असतोय पण ते लई बारा गावाचं पाणी प्यालेलं असतंय. कमलला श्रीदेवी आवडत असत्या. श्रीदेवीला पण कमल आवडत असतोय पण रजनीची तिच्यावर डोळा असतोय.

एकदा काय होतंय की कमल आणि श्रीदेवी डेटिंगवर जाणार असत्यात, रजनी पण त्यांच्यात कबाब मै हड्डी बनून येतंय. तर हे तिघे एका तळ्यात मस्त पैकी बोटिंग करत असतात. कमल हसन रोमांटीक गाण म्हणत असतोय. श्रीदेवी पण लाजत लाजत त्याच्याबरोबर गात असते. रजनी वल्हे मारत एन्जॉय करत असतो.

अचानक त्यांच तोल जातंय आणि रोमांटिक मोडमध्ये असलेलं बिचार आपला हिरो कमल पाण्यात पडतो. त्याला पोहायला येत नसत, श्रीदेवीला पण येत नसत. ती रजनीकांतला रिक्वेस्ट करते पण डेव्हिल डोक्याचा रजनी मला पण पोहायला येत नाही असं सांगतोय आणि बिचार कमल हसन मरतंय.

झालं. कहाणी मै ट्विस्ट. बिचारी श्रीदेवी उघड्यावर येते.

रजनीकांत एकदम सज्जनपणाचा आव आणतय आणि तिला घरी आणतंय. श्रीदेवीला नोकरानीचा जॉब देतात. त्याच्या घरात त्याचे वडील आणि लहान भावंड राहात असतात. आई वारलेली असते. तर आपलं रजनी तिच्याबरोबर चांगलं वागत असतंय. पुढ जाऊन तिच्याबरोबर लगीन करायचं त्याच्या डोक्यात असतंय. त्याचे वडील पण त्याच विचारात असतात.

आता वेळ येते श्रीदेवीच्या रिव्हेंजची.

एक दिवस रजनीकांत काही तरी कामासाठी म्हणून परगावी गेलेला असतोय. तेव्हा श्रीदेवी डाव साधते. आता तुम्ही म्हणाल काय करते? काय नाही त्याच्या बापाबरोबर लग्न करते. रजनीकांतची सावत्र आई बनते. तिला वाटत यातून रजनीभाऊला धक्का बसेल आणि ते शहाना होईल.

आणि पिक्चर संपतो.

पिक्चर रिलीज झाला तेव्हा वर्ष होत १९७६. श्रीदेवीचा जन्म १९६३ चा. बालांचंदर साहेबांनी १३ वर्षाच्या श्रीदेवीला २७ वर्षाच्या रजनीकांतची आई बनवलं. आता साउथच्या पिक्चरचं लॉजिक आपल्याला कधीच कळाल नाही. ते काहीही असो पिक्चर गाजला. त्यातली गाणी गाजली. कमल हसन ऑलरेडी स्टार होताच पण श्रीदेवी आणि रजनीकांतचं सुद्धा नाव गाजलं.

गंमत म्हणजे या पिक्चरमध्ये इंटरव्हल नंतर लगेच मरणाऱ्या कमल हसनला ३०,००० रुपये मिळाले होते, हिरोईन म्हणून पहिलाच पिक्चर असणाऱ्या श्रीदेवीला ५,००० रुपये मिळालेले आणि पुढे जाऊन मेगास्टार झालेल्या रजनीभाऊला या दोघांपेक्षा कमी म्हणजे फक्त २००० रुपये मिळाले होते आणि वर पिक्चरमध्ये हिरोईनबरोबर लग्न पण करायला मिळालं नाही.

हा किस्सा स्वतः श्रीदेवीनी तमिळ कौन बनेगा करोडपती मध्ये सांगितला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.