श्रीलंका, क्रिकेट आणि दंगल यांच खूप जुनं नात आहे !!!

 

‘निदाहस’ या सिंहली शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य. श्रीलंकन स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून श्रीलंकेत निदाहस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. भारत व्हर्सेस श्रीलंका या पहिल्या मॅचने ट्रॉफीची सुरुवात झाली, ज्यात भारताचा पराभव झाल्याची कल्पना आपल्याला असेलच. तिसरा संघ बांगलादेशचा. स्वातंत्र्याच्या औचित्यावर एकीकडे उत्सव सुरु असताना दुसरीकडे बौद्ध आणि मुस्लीम धर्मीय समाजात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीलंकेतीलंच कॅन्डी या शहरात १० दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आलीये. त्यामुळे ही ट्रॉफी व्यवस्थितरीत्या पार पडणार का, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. श्रीलंकेतील अंतर्गत संघर्षाच्या परिस्थितीचा फटका नेहमीच क्रिकेटला बसलेला आहे, त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न…

 

  • १९९६ वर्ल्ड कप.

भारत-पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे १९९६ च्या वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं. त्यावेळी श्रीलंकेत राजकीय अस्थैर्याचं वातावरण होतं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. सुरक्षेचं पुरेसं आश्वासन देऊनही या संघांनी श्रीलंकेत न खेळण्याची आपली भूमिका बदलली नाहीच. सुरक्षेचा कुठलाही प्रश्न उपस्थित न होता, वर्ल्ड कप व्यवस्थित पार पडला तरी दोन्हीही संघ न खेळल्यामुळे त्यांच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचचे गुण श्रीलंकेला मिळाले.

  • २००६ – युनिटेक ट्राय सिरीज.

२००६ सालच्या सप्टेंबर महिन्यात श्रीलंका-भारत-द.आफ्रिका यांच्यादरम्यान ट्राय सिरीज खेळवली जाणार होती. परंतु स्पर्धेच्या तोंडावर लिट्टेच्या अतिरेक्यांनी कोलंबोतील ‘लिबर्टी प्लाझा’मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याने द.आफ्रिकेच्या संघाने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळण्यास नकार दिल्याने शेवटी ५ सामन्यांची ही सिरीज भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान ३ सामने खेळवून पार पडली.

 

 

  • २०१५ – पाकिस्तानचा श्रीलंका दौरा.

१९ जुलै २०१५. प्रेमदासा स्टेडीयम. भारताच्या दौऱ्यात जे काही घडलं होतं, तेच पाकिस्ताननेही श्रीलंकेसोबत केलं होतं. टेस्ट सिरीज श्रीलंकेने गमावली होती पण वन-डे सिरीजमध्ये कमबॅक करण्याची संधी श्रीलंकेला होतीच कारण सिरीज १-१ अशी लेव्हल होती. तिसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचं ३१७ रन्सचं लक्ष चेस करताना श्रीलंकन संघ संघर्ष करत होता तोच दोन ग्रुपमध्ये वादावादी झाली. या वादादरम्यान एकमेकांवर दगडफेकही झाली. एक दगड तर थेट मैदानात येऊन धडकला. मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांना मॅच थांबवावा लागला. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर अर्ध्या तासाने मॅच सुरु झाला, जो अर्थात पाकिस्तानने जिंकला.

  • २०१७ – भारताचा श्रीलंका दौरा.

२७ ऑगस्ट २०१७. पल्लेकल स्टेडीयम. ५ वन-डे मॅचच्या सिरीजमधील तिसरी मॅच. तीन सामन्यांची टेस्ट सिरीज तर भारताने ३-० अशी आधीच जिंकली होती. वन-डे सिरीजमध्येही भारताने २-० अशी आघाडी घेतलेली. प्रथम बॅटिंग करताना श्रीलंकेनं भारतासमोर २१८ रन्सचं टार्गेट ठेवलं. भारताने ते सहज चेस करून सिरीज जिंकली पण भारत जिंकायला फक्त ७ रन्स बाकी असताना श्रीलंकन संघाच्या प्रदर्शनामुळे नाराज प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घालायला सुरुवात केली. श्रीलंकन खेळाडूंच्या दिशेने बाटल्या फेकल्या गेल्या. मॅचनंतर आयसीसीचे रेफ्री अॅन्डी पायक्रोफ्ट यांनी उर्वरित सामन्यांसाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेची पुरेशी खात्री द्यावी अशी मागणी केली. कारण पहिल्या वन-डे मध्ये झालेल्या पराभवानंतरही नाराज प्रेक्षकांनी श्रीलंकन टीमची बस आडवली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.