शाळेत असतानाच त्या दोघांनी एकत्र स्वप्न बघितलेलं, “बच्चन बनायचं !!”

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. गोडगुलाबी रोमांटिक राजेश खन्नाला हटवून अँग्री यंग मॅन अमिताभ सुपरस्टार बनला होता. एका पाठोपाठ एक त्याचे पिक्चर हिट होत होते. अख्ख्या देशातली पब्लिक त्याच्यावर फिदा होती. आणीबाणीचा काळा कालखंड सुरु होता. रोजगाराचा प्रश्न  गंभीर झाला होता. प्रत्येक गोष्टीला रेशनसाठी रांग लागलेली असायची.

रोटी कपडा मकान च्या टेन्शन पासून दूर न्यायला प्रत्येकाला बच्चनचा पिक्चर हवाहवासा वाटायचा. त्याच्यासारखी फायटिंग, त्याच्यासारखी डायलॉग, त्याच्यासारख चालण, आग ओकणारे डोळे हे आत्तापर्यंत कधीच हिंदी सिनेमात कोणी पाहिले नव्हते.

बच्चनचा शोले पन्नास पन्नास वेळा पाहणारे महाभागही भारतात होते.

दिल्लीच्या राजेंद्रनगर मध्ये राहणारा एक छोटा मुलगासुद्धा असाच बच्चनचा खूप मोठा फॅन होता. शाळेतून घरी आला की मला सिनेमाला न्या असा रोज हट्ट करायचा. घरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. आईच्या हातापाया पडून तिने दिलेला अभ्यास पूर्ण करून मग स्वारी १ रुपयाच नाणं घेऊन सिनेमा बघायला पळायची.

त्याच नाव शाहरुख खान.

त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म पाकिस्तानचा पण फाळणीनंतर ते हट्टाने भारतात राहीले. इथे त्यांनी अनेक उद्योगधंदे करून पाहिले होते पण एकातही यश मिळाल नव्हत. एकेकाळी हिरो व्हायचं म्हणून मुंबईला गेले होते पण तिथेही त्यांची काही तिथे डाळ शिजली नव्हती. आता एक रेस्टॉरंट चालवायला घेतलं होतं.

शाहरुखची आई फातिमा मात्र समाजकार्यात सक्रीय होती. तिची आणि संजय गांधीच्या खास वर्तुळातल्या समजल्या जाणाऱ्या रुक्साना सुलतानाशी चांगली मैत्री होती. दिल्लीमध्ये मुस्लीम स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्व समजावून सांगण्यासाठी रुक्साना सोबत ती अनेकदा प्रचारफेरीमध्ये सहभागी व्हायची.

अशावेळी रुक्सानाची मुलगी अमृता फातिमाच्या घरी खेळायला यायची. हो तिचं अमृता सिंग जी पुढे जाऊन सैफची बायको आणि सारा खानची मम्मी बनली.

शाहरुखची मोठी बहीण शहनाझ आणि अमृता एकाच वर्गात शिकायच्या. ते तिघेही एकदम खास दोस्त बनले होते. शाहरुखला पोहायला देखील अमृतानेच शिकवलं होतं. एकदा तर तिच्यामुळे शाहरुख बुडता बुडता वाचला होता.

शाहरुख आणि अमृताला जोडणारा समान धागा म्हणजे बच्चन!!

त्या दोघानाही बच्चन खूप आवडायचा. शाहरुख तर कायम न्हाव्याकडे गेला की बच्चनसारखी हेअरस्टाईल करून यायचा. प्रत्येक गोष्टीत त्याची नक्कल करायचा. नववीमध्ये असताना अमिताभच्या कालिया मधला डायलॉग मारून शिक्षिकेला पटवून दिलेलं की घरचे आपल्यावर अन्याय करत आहेत, आपली मानसिक स्थिती थिक नाही आणि क्लास टेस्टमधून सुट मिळवून घेतली होती.

अमृतासुद्धा त्याच्यासारखीच बच्चन साठी वेडी होती. शाहरुख आणि त्याची बहिण शाळा सुटल्यावर अमृताच्या बंगल्यावर जायचे, आणि तिथे तासनतास अमिताभबद्दल गप्पा मारत बसायचे. शाहरुख आणि अमृता एकमेकाला अमिताभच्या सिनेमातला एखादा सीन करून दाखवयाचे.  एकदा शाहरुख सत्तेपे सत्ता मधला अमिताभची नक्कल करण्यासाठी केसात पावडर मारून आला होता.

अमृतामुळे शाहरुखला आणि त्याच्या बहिणीला बरेच सिनेमे देखील बघायला मिळायचे. एकदा असाच सिनेमा चालू असताना अमिताभच्या अभिनयाने भारावून गेलेली छोटी अमृता म्हणाली,

“मुझे बडी होके अमिताभकी हिरोईन बनना है.”

शाहरुख तिच्या शेजारीच बसला होता. तोही अनिमिष नजरेने पडद्याकडे पहात होता. त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,

“मै बडा होके अमिताभ बच्चन बंनुंगा”

पुढे काही वर्षांनी अमृता सिंगला खरोखर अमिताभची हिरोईन बनायचा चान्स मिळाला.

हे दोघेही मर्द, जादूगर अशा अनेक सिनेमात एकत्र दिसले. एकदा तर अमृता आणि अमिताभच्या अफेअरची अफवा सुद्धा पसरली होती, पण पुढे ती आपल्या पेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या छोटे नवाब सैफ बरोबर लग्न करून सिनेमातून बाजूला गेली.

इकडे शाहरुखसुद्धा अमिताभ होण्यासाठी मुंबईत आला. अमृतासोबतच राजू बन गया जंटलमन मधून त्याने पदार्पण केलं. अमिताभप्रमाणेच त्याचंही इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नव्हत तरी त्याने स्वतःच स्थान निर्माण केलं. फक्त इतकच नव्हे अमिताभ नंतर सुपरस्टार कोण याच उत्तर शाहरुखपाशीच येऊन थांबायचं.

शोलेचा जास्त काळ सिनेमा थिएटर मध्ये राहण्याचा विक्रम शाहरुखच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने मोडला. 

शाहरुखने बर्याच सिनेमात अमिताभ सोबत काम केलं. फक्त अमिताभ बनायचं या इच्छेखातर त्याने डॉनच्या रिमेकमध्ये काम केलं. पण त्याला कधी बच्चनची उंची गाठता आली नाही पण त्यांच्या पावलावर पाउल टाकण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला.

हे ही बोल भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.