महाभारतावर ढिगानं मालिका आल्या पण पिक्चर काढण्याचं जिगर राजामौलींनीच दाखवलंय

काही लोकांचं नाव ऐकलं ना की फक्त राडा, कल्ला, धूर असल्याचं गोष्टी तोंडात येतात. ‘एस एस राजामौली’ हे त्यातीलच एक नाव. म्हणजे पहा ना… अजून RRR चं वारं शांत झालं पण नाहीये आणि राजामौली यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटाची अनाउन्समेंट केलीये. राजामौली आता ‘महाभारत’ चित्रपट घेऊन येत आहेत.

हो, भारताचा पौराणिक ग्रंथ महाभारत चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याची तयारी राजामौली यांनी केलीये असं त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे.

एकामागून एक जबरी चित्रपट आणायची सिरीजच राजामौली यांनी सुरु केल्याचं यावरून दिसतंय. पण खरं सांगायचं तर हे राजामौली सरांसाठी काय नवीन नाहीये. कारण राजामौली यांनी आजपर्यंत केवळ यशाची चवच चाखलीये.

कशी? बघुयात…

श्रीशैला श्री राजामौली असं पूर्ण नाव असणाऱ्या या दिग्दर्शकाचा जन्म एका तेलगू कुटुंबात १९७३ मध्ये झाला. वडिलांचं नाव व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि आई राजा नंदिनी. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचं? असं जेव्हा त्यांच्या वडिलांनी विचारलं तेव्हा राजामौली म्हणाले – मला दिग्दर्शक व्हायचंय. 

वडिलांना हे ऐकून लगेच होकार दिला कारण वडील स्वतःच सिनेसृष्टीशी जोडलेले होते. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी अनेक तेलुगू आणि हिंदी चित्रपटांच्या कथा लिहिलेल्या आहेत. पण सुरुवात कशी करू? हा प्रश्न राजामौली यांच्यासमोर होता. तेव्हा ‘आधी चित्रपट सृष्टीतील इतर विभागाचं ज्ञान घे’ असा सल्ला वडिलांनी दिला आणि त्यानुसार राजामौली यांनी एडिटिंगपासून सुरुवात केली. 

पुढे चित्रपटनिर्मितीच्या वेगवेगळ्या पैलूंवर पकड आल्यानंतर ते के. राघवेंद्र राव यांचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम बघू लागले. तेव्हा त्यांना पहिली मालिका दिग्दर्शित करण्याचा प्रस्ताव आला. ‘शांती निवासम’ या तेलुगू सिरियलच्या दिग्दर्शनापासून त्यांनी ऑफिशिअली स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली आणि पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा ब्रेक त्यांना मिळाला…

‘स्टुडंट नंबर.१’ या चित्रपटातून.

२००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात ज्युनिअर NTR लीड रोलमध्ये होता.  १.८५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला ज्याने १२.४ कोटींची कमाई केली होती आणि जवळपास ४२ चित्रपटगृहांमध्ये १०० दिवस चित्रपटाने स्क्रीन सोडली नव्हती. त्याकाळात ही खूपच मोठी गोष्ट होती.

त्यानंतर आपण एखादा मायथॉलॉजिकल चित्रपट बनवावा असं राजामौली यांना वाटलं पण ते शक्य झालं नाही. मग परत ते दुसरा चित्रपट घेऊन आले ‘सिम्हाद्री‘. त्यांच्या वडिलांनी याची कथा लिहिली होती. यात पण ज्युनिअर NTR आणि चित्रपट पण हिट. ८ कोटी प्रोडक्शन कॉस्ट आणि कमाई २६ कोटींच्याही पुढे. 

मग २००४ मध्ये त्यांनी नितीन रेड्डी सोबत ‘साय’ चित्रपट. २००५ मध्ये प्रभास सोबत ‘छत्रपती’ चित्रपट केला. तेव्हा प्रभासचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. पण जसा का राजामौली यांचा छत्रपती प्रभासने केला त्याच्या करियरने परत पिकअप घेतला. आपल्या चित्रपटांतून अभिनेत्यांना ब्रँड बनवण्याची सुरुवात तेव्हाच राजामौली यांनी केली होती.

२००६ मध्ये मग त्यांनी रवीतेजा सोबत ‘विक्रमारकुडू’ चित्रपट केला. हा चित्रपट तर असा फेमस झाला की ५ भाषांमध्ये त्याचे रिमेक निघाले. अक्षय कुमारचा रावडी राठोड चित्रपट आठवतोय? राजामौली यांच्या विक्रमारकुडूचा हा रिमेक आहे. २००७ मध्ये त्यांनी ‘यमडोंगा’ चित्रपट केला. लोक परलोक याचाच रिमेक आहे. 

हा चित्रपट देखील खूप गाजला पण २००९ मधल्या चित्रपटाने राजामौली यांना खऱ्या अर्थाने ब्रँड बनवलं.

मगधीरा

फक्त ३५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १५० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला. तोपर्यंतचा लॉंगेस्ट रनटाईम असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या चंद्रमुखी चित्रपटाला मागे टाकत १००० दिवसांचा रनटाईम सेट केला आणि सर्वात जास्त काळ चालणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणून नावलौकिक मिळवलं.

चित्रपटाने खपाखप पुरस्कार तर मिळवलेच मात्र राजामौली यांना देखील त्यांचा पाहिला फिल्मफेअर बेस्ट डायरेक्टरचा मान मिळवून दिला. 

इथून ‘कूछ नया’ आणण्याची चटक त्यांना लागली आणि त्यातून मक्खी चित्रपटाचा जन्म झाला. मख्खी मधून अशी VFX ची जादू त्यांनी दाखवली ज्याला बघून जागतिक पातळीवर कळलं भारतीय सिनेसृष्टीत देखील तंत्रज्ञान हाताळलं जाऊ लागलंय. आणि ते किती बाप लेव्हलवर हाताळलं जातंय याचा परिचय राजामौली यांनी करून दिला ‘बाहुबली’ आणून.

बाहुबलीबद्दल काय वेगळं सांगावं… लॉन्चिंग, टिजर, ट्रेलर, भाग पहिला, भाग दुसरा, त्यातले व्हिज्युअल इफेक्टस…  अगं आय आय आय… सगळं ग्रँड! या चित्रपटाने भारतीय रिजनल चित्रपटांची मर्यादाच तोडली… आणि मग आला RRR ज्याने भारतीय सिनेसृष्टीला जागतिक पातळीवर ट्रेंड सेटर अशी ओळख दिली.

राजामौली म्हणजे असे दिग्दर्शक ज्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचा चेहरामोहरा बदलला आहे. पण तरी इतके डाऊन टू अर्थ आहेत की त्यांचे चित्रपट कितीही हिट होवो त्यांची प्रतिक्रिया येते ‘मी आनंदी आहे’ आणि हा आनंद ते त्यांच्या कुटुंबासोबत साध्या सहलीला जाऊन मनवतात. त्यांचा बॉलिवूड, टॉलिवूड असं म्हणण्यात विश्वास नाही.

हिंदी चित्रपटसृष्टी, तेलुगू चित्रपटसृष्टी असं ते म्हणतात आणि भरतीय चित्रपट सृष्टी असं म्हणण्याचा त्यांना अभिमान आहे. याच अभिमानाला अजून वाढवण्यासाठी त्यांनी आता भारताचं महाकाव्य ‘महाभारत’ चित्रपटाची घोषणा केलीये. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं ते म्हणतात. दुसरा चित्रपट बनवतात त्यांना जो मायथॉलॉजिकल चित्रपट बनवायचा होता त्यालाच त्यांनी आता ‘महाभारताचं’ रूप दिल्याचं दिसतंय.

काही व्यक्तिमत्व लार्जर दॅन लाईफ असतात.. एस एस राजामौली त्यातीलच एक. आणि त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल ऐकून म्हणावसं वाटतंय.. एक ही तो दिल है जनाब कितनी बार जीतोगे!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.