एसटी आंदोलनाचा नक्की काय राडा झालाय?

राज्यातल्या एसटी कामगारांनी पुकारलेला संप आता आणखी चिघळत चाल्लाय. दिवाळी आधी सुरू झालेल्या या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही.

संप सुरू कधी झाला?

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी, एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीनं २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर. परिवहन मंत्री अनिल परब यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि काही मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हा संप मागं घेण्यात आला.

आत्महत्येमुळं प्रकरण चिघळलं

सरकारच्या या घोषणेला काही तासच उलटले असताना, शेवगाव आवारात एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. त्यानंतर, ४ नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना संपावर गेली आणि बोटावर मोजण्याइतके आगार सोडले, तर सर्वच आगारांमधली वाहतूक ठप्प झाली. ऐन दिवाळीत हा संप झाल्यानं सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला. आता या संपाचं स्वरूप आणखी तीव्र झालं असून, एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं करायला सुरुवात केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?

महागाई भत्ता वाढवावा, घरभाडं भत्ता मिळावा, पगारवाढ व्हावी यासोबतच सगळ्यात मुख्य मागणी म्हणजे एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण व्हावं.

यातल्या कुठल्या मागण्या शासनानं मान्य केल्या आहेत?

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून २८ टक्के करण्यात आला आहे. सोबतच घरभाडं भत्ता मिळणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात आली असून, इतर मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करू, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते.

तोट्यातला एसटीवर भार 

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशात संपूर्ण लॉकडाऊन लागलं आणि वाहतूक ठप्प झाली. त्यामुळं एसटी महामंडळाला जवळपास ९ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागलं. आता आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला, महागाई भत्त्यामुळं २८ कोटींचा, तर घरभाडं भत्त्यामुळं २ कोटींचा असा एकूण ३० कोटींचा भार सोसावा लागणार आहे.

शासनाची मदत

राज्य शासनानं एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२० मध्ये सहाशे पन्नास कोटी रूपयांचं पॅकेज दिलं, त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये एक हजार कोटी, तर २०२१ मध्ये आणखी सहाशे कोटी रुपयेही देण्यात आले.

उच्च न्यायालयाचा आदेश

या संपामुळं एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागं घ्यावा असा आदेश दिला. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवल्यानं, एसटी महामंडळानं राज्यभरातल्या ३७६ कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेली दुर्दैवी आत्महत्या, निलंबन आणि राजकीय नेत्यांनी संपाच्या विषयात घातलेलं लक्ष पाहता हा संप आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागं घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा देता यावा त्यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयातही आम्ही तुमची समस्या मांडली आहे. त्यासंदर्भात समिती स्थापन करून समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. परंतु प्रवाशांना वेठीस धरू नका. गेली दोन वर्ष आपण कोरोनाशी झुंजतोय. त्यामुळं तुम्ही हा संप मागं घ्या.’

अनिल परब काय म्हणाले?

‘उच्च न्यायालयानं या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली आहे. कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी समितीसमोर मांडावं. समिती त्यावर सारासार विचार करून राज्य सरकारकडे अहवाल सादर करेल आणि मग सरकार त्यावर निर्णय घेईल. या संपामुळं सामान्य प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी एसटी स्टॅन्डवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. ते एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करू शकतात,’ असं परब म्हणाले.

सामान्य माणसांचे हाल

दुर्दैवानं या सगळ्यात सामान्य माणसांचे हाल होत आहेत. दिवाळीनिमित्त आपापल्या गावी गेलेले नोकरदार, विद्यार्थी तिथंच अडकून बसले आहेत. शासनानं खासगी वाहतुकीला परवानगी दिली असली, तरी त्याचे फुगवलेले दर सामान्य जनतेला परवडणारे नाहीत.

आता हा संप कधी मागे घेतला जाणार? समितीला अहवाल देण्यासाठी मिळालेल्या १२ आठवड्यांच्या वेळात एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? याकडे सामान्य माणसांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.