पटणार नाय… पण भारतातला हा किडा जपानमध्ये ५० ते ६० लाखांना विकला जातो..

कालचीच गोष्ट. आम्ही दोघं-तिघं चुपचाप आपलं काम करत बसलो होतो. तितक्यात एक भिडू म्हणाला, “आई शप्पत, कम्माल.” त्याचं हे अचानक भयानक आलेलं वाक्य ऐकून आम्ही जरा दचकूनच गेलो. आणि एकसाथ त्याच्याकडे कटाक्ष टाकला.

फोनमधून त्याचं लक्ष जेव्हा आमच्याकडे गेलं तेव्हा मग “सॉरी, सॉरी” म्हणाला. पण त्याची उत्सुकता काय लपत नव्हती आणि त्याच उत्सुकतेने त्याने न राहावत आम्हाला सांगितलं की, असं त्याने काय बघितलं मोबाईलमध्ये की, आमची लिंक तोडली कामाची.

भावाच्या मित्राने कुत्र्याचं पिल्लू विकत घेतलं होतं, जे आपल्या भावाचं आवडतीचं होतं. आणि तेही २ लाख देऊन!

हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा म्हटलं, “काय? इतके पैसे कुणी कुत्र्याच्या पिल्लासाठी देतात?” यावर तर त्याने अख्खी गाथा ऐकवायला सुरुवात केली. तेव्हा त्याला थांबवत मी सांगितलं, “अरे, आता हे पिल्लू घ्यायला इतके पैसे गेले. त्याचं खाणंपिणं आणि चोचले राखण्यात परत कोटींचा दंडा आहे. पण तुम्हाला माहितीये का? यापेक्षा एक असा किडा आहे जो पाळणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. कारण हा छोटासा किडा तुम्हाला करोडपती बनवू शकतो.”

शिवाय याच किड्याची भारतातून मोठ्या प्रमाणात तस्करी देखील केली जाते.

मग काय हे ऐकल्यावर त्यांनी सुरु केलं त्या किड्याबद्दल विचारणं. तेव्हा त्यांना जे सांगितलं तेच तुम्हाला देखील माहित असावं, म्हणून सांगतोय…

या किड्याचं नाव आहे –  स्टॅग बीटल

आता जगात खूप वेगवेगळे लोक राहतात. जसं आपल्या भावाला कुत्रा पाळायला आवडतो तसं काही लोकांना किडे पाळायला देखील आवडतं. असंच काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने एक स्टॅग बीटल पळाला होता आणि जेव्हा त्याने या किड्याला विकलं तेव्हा त्याला याचे ८९,००० डॉलर म्हणजेच आजच्या किमतीनुसार सुमारे ६७ लाख रुपये मिळाले होते.

आता आपल्यातील अनेकांना वाटेल की, असं काय आहे या किड्यात की त्याचे इतके पैसे मिळतात? तर…

स्टॅग बीटल हा खूप क्वचित मिळणारा, दुर्मिळ जातीचा  किडा आहे. असे म्हटले जाते की स्टॅग बीटल्स त्यांचे बहुतेक आयुष्य जमिनीच्या आत राहण्यात घालवतात, म्हणून ते सहज दिसत नाहीत. याचे वैशिष्ट्य म्हणजे स्टॅग बीटल ही पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वात मोठ्या आकाराच्या बीटल प्रजाती आहे.  हे सामान्य बीटलपेक्षा खूप मोठे असतात. त्याचा आकार २ ते ३ इंचापर्यंत असतो. 

त्याची प्रमुख ओळख म्हणजे त्याच्या ब्लॅकहेडमधून बाहेर पडणारी शिंगे. याचा सरासरी आकार २ ते ४.८ इंच दरम्यान असतो. म्हणजे थोडाथोडा खेकड्यासारखा हा किडा दिसतो. पण खेकड्यासारखा तो डंक मारत नाही. हा किडा अजिबात चावत नाही. आपल्या कामाशी काम ठेवणं, हे या किड्याचं गुणधर्म आहे. स्टॅग बीटल ही पृथ्वीवर आढळणाऱ्या लहान आणि विचित्र कीटकांच्या प्रजातींपैकी एक प्रजाती आहे.

WhatsApp Image 2022 04 17 at 7.08.15 PM

नॅशनल हिस्ट्री म्युझियमच्या मते, प्रौढ स्टॅग बीटल्स काहीच खात नाहीत. ते फक्त झाडाचा रस आणि कुजलेल्या फळांमधून बाहेर येणारे द्रव पदार्थ पिऊन जगतात. त्यांनी एनर्जीचा स्रोत म्हणून तयार केलेल्या लार्व्हावर अवलंबून असतात. शिवाय अजून एक म्हणजे त्यांचं आयुष्य जवळपास ७ वर्ष असतं. बाकी किडे काय एखाद्या महिन्यात मारतात.

तस्करी नक्की का केली जाते?

एक गणित आपल्याला माहीतच आहे, जास्त मागणी असेल आणि तेच विकण्यासाठी धडपड केली जाते. त्यात वस्तूचा पुरवठा कमी असेल, तर बोली आभाळाला खेटेल अशी लावली जाते. असंच या किड्याचं आहे.

एकतर हा खूप दुर्मिळ किडा आहे. लोंकाना त्याला पाळण्याचा शौक असल्याने या बीटलसाठी, लोक कोट्यवधी पैसे खर्च करण्यास तयार असतात. लोक याला पाळतात कारण तो दिसायला सुंदर असतो. आणि दुसरं कारण म्हणजे ब्रिटिश लोककथा.

कथेनुसार, स्टॅग बीटल्सने मेघगर्जना आणि विजांच्या वादळांना पाचारण केलं होतं. ही प्रजाती विजेचा देवता’ थॉर’ याच्याशी निगडित आहे आणि जर तुम्ही त्यांना तुमच्या डोक्यावर ठेवलं तर तुम्हाला विजेचा धक्का बसण्यापासून ते वाचवतात. ही एक दंतकथा होतीपण तरीही अनेक लोक यावर विश्वास ठेवून त्यांना पाळतात. 

यासोबतच हा किडा पाळण्यापेक्षा त्याचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी जास्त केला जातो. 

WhatsApp Image 2022 04 17 at 7.24.53 PM

मात्र मुख्य कारण आहे ‘जपान’.

हे दुर्मिळ बीटल जपानी लोकांमुळे आणखी दुर्मिळ होत आहेत. आतापर्यंत जपानी लोक व्हेल माशांच्या नाशासाठी ओळखले जात होते. आता ते जगातल्या बीटल्सच्या, विशेषत: स्टॅग बीटल्सच्या नाशाचा एकल स्रोत म्हणून उदयास आले आहेत.

जपानी लोक त्यांच्या स्वत:च्या मूळ प्रजातीला कंटाळले आणि १९९० च्या दशकापर्यंत, लोक बेकायदेशीरपणे ७००  हून अधिक प्रजाती आयात करू लागले. स्टॅग बीटल्समधील व्यापार वार्षिक १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आणि कीटक व्यापाऱ्यांचा एक पूर्णपणे नवीन माफिया जन्माला आला आहे. जपानच्या दुकानांमध्ये १२०० प्रकारच्या बीटल्सच्या प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त ३५ जपानी आहेत.

जपानने बीटल तस्करी सोपी केली आहे. जपान सरकारने १९ मध्ये कायद्यात सुधारणा केली आणि विदेशी बीटल प्रजातीच्या आयातीला कायदेशीर मान्यता दिली. १९९९ मध्ये ३४ परदेशी प्रजातींना कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि २००३ मध्ये ५०५ प्रजातींना.

आज, परदेशी स्टॅग बीटल खरेदी करणे किराणा सामान खरेदी करण्याइतकंच सोपं आहे, कारण तिथे बीटलची दुकानं सामान्य आहेत. शिवाय क्रेडिट कार्डधारक इंटरनेटद्वारे ऑर्डर देऊ शकतात. बहुतेक पाळीव प्राण्यांच्या दुकानातील बीटल पाच डॉलर्सला विकतात. जास्त किंमतीचे लोक २,५०० डॉलर्सपर्यंत जातात. बीटलचा आकार जेवढा मोठा, तेवढाच मौल्यवान.

भारतातूनच मोठ्या प्रमाणात तस्करी का होते?

भारतात सापडणारे स्टॅग बीटल हे खूप मोठ्या आकाराचे असतात. त्यांना ‘जिराफ स्टॅग बीटल’ असं म्हणतात. भारतातील बीटलचे लांब आणि तीक्ष्ण जबडे असतात. जगातील सर्वात मोठे सॉ-टूथ स्टॅग बीटल भारतात सापडतात.

WhatsApp Image 2022 04 17 at 8.19.32 PM

१९९५ पासून ते २०१६ पर्यंत भारतात अशा २५ जप्ती करण्यात आल्या होत्या. जे कदाचित दररोज बाहेर जाणाऱ्या भरतीत स्टॅग बीटलच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कीटकांच्या प्रजातींना भारतीय परिसंस्थेत मोठे पर्यावरणीय मूल्य आहे. दुर्दैवाने, सरकार किंवा शैक्षणिक क्षेत्रातील कोणीही कीटकांच्या लोकसंख्येच्या ट्रेंडचा अभ्यास करीत नाही, म्हणून याकडे लक्ष जात नाही.

भारताचा पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट हे दुर्मिळ ऱ्हायनोसॉरस, लाँगहॉर्नेड आणि ज्वेल बीटल्सच्या तस्करांसाठी शिकारीची प्रमुख ठिकाणे आहेत. अलिकडच्या वर्षांत व्यापार वाढला आहे आणि जपानी लोक पश्चिम बंगालमध्ये बीटलसह पकडले गेले आहेत.

जपानला बीटल्स गमावत असलेल्या देशांमध्ये थायलंड, मलेशिया, लाओस, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, चीन, दक्षिण अमेरिका, फ्रान्स, भारत, नेपाळ, भूतान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

तस्करी कशी केली जाते?

एक सोपं लक्ष्य म्हणून भारताकडे पाहिलं जातं. या कीटकांची चोरी देशांतील मोठमोठ्या टोळ्यांकडून केली जाते.

या टोळ्या डोंगराळ भागात किंवा आदिवासी भागात जातात आणि स्थानिक लोकांना जिवंत कीटक गोळा करण्यासाठी तुटपुंजी रक्कम देतात. त्यात रेंजर्स अज्ञानी आणि लाचखोर असतात. तसंच पोलिसांना कीटकांच्या तस्करी हा महत्त्वाचा गुन्हा वाटत नाही, कारण तेवढी जागरूकता नाही. 

तस्करांना माहीत आहे की, बाहेर पडण्याच्या बंदरांवर सामान स्कॅन करणारे कस्टम आणि एअरलाइन्सचे अधिकारी कीटक आणि फुलपाखरांनी भरलेल्या पिशव्यांकडे दुर्लक्ष करतात. म्हणू कीटकांना पकडल्यानंतर त्यांना अंमली पदार्थ देऊन सुटकेसमध्ये टाकलं जातं. विमानतळावर खासगी सामान म्हणून तपासणीत दाखवलं जातं. किंवा पार्सल म्हणून आंतरराष्ट्रीय कुरिअरद्वारे पाठवले जाते.

अशाप्रकारे भारतातून स्टॅग बॅटल्सची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मात्र अवेअरनेस नसल्याने भारत इकॉलॉजिचा मोठा घटक गमावत चालला आहे. तेव्हा याकडे गंभीरतेने लक्ष देणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.