मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे…

मांढरदेवी दुर्घटनेला आज १७ वर्ष झाली. २५ जानेवारी २००५ मांढरदेवी येथे झालेल्या दुर्घटनेत ३०० च्या दरम्यान भक्तांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. याबद्दल अधिकची माहिती घेत असताना आम्हाला पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर लिहलेल्या आठवणी मिळाल्या.

पत्रकार चंद्रकांत पाटील लिहतात, 

बारा वर्षापूर्वी मी सातारा तरूण भारतसाठी पत्रकारिता करत होतो. त्या कालावधीत म्हणजेच २५ जानेवारी २००५ रोजी नाशिकच्या फरशीवाल्या बाबाचा आशिर्वाद घेण्यासाठीची साताऱ्यात झुंबड उडाली होती. बाबाने डोक्यावर फरशीचा तुकडा ठेवला की आजार बरा होतो, अशी बाबाची ख्याती होती.

याच बाबाची भोंदूगिरी चव्हाट्यावर आणण्यासाठी पत्रकारांचीही त्या गर्दीत जाण्यासाठीची धडपड चालली होती. त्या गर्दीत जीवन चव्हाण या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. त्याच्या निषेधार्थ तत्कालिन जिल्हाधिकारी सुबराव पाटील यानां निवेदन देण्यासाठी सगळेच पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते.

१५-२० मिनिटात सुबराव पाटील कार्यालयात दाखल झाले,

पण त्यांनी निवेदन स्विकारण्याएेवजी मला बाजूला बोलावून घेवून कानांत एक धक्कादायक माहिती दिली. काही क्षण मी तर बधीरच झालो. ती माहिती मी सर्व पत्रकारानां दिली. त्यांनतर आम्ही पत्रकाराला झालेली धक्काबुक्की विसरूनच गेलो. सगळेच पळायला लागले. काही कळायच्या आत आम्ही आपापल्या कार्यालयात गेलो. अवघ्या तासाभरात मांढरगडावर पोहचलोसुद्धा.

तिथलं दृश्य भयानक होतं. तब्बल २९३ जणांचा बळी गेला होता. शेकडो जखमी झाले होते. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. सगळीकडे आक्रोश ऐकायला येत होता. खरंतर मृतांची संख्या किती याचा अंदाज येत नव्हता. कोणी ५०० हून अधिक तर कोणी १००० पर्यंत मृतांची संख्या नेवून ठेवली होती. आजूबाजूला सिलेंडरचे मोठमोठ्या आवाजात होणारे स्फोट सुरू होते.

मी माझे सहकारी स्वरूप जानकर, दिपक प्रभावळकर, प्रविण जाधव आणि फोटग्राफऱ संजय कारंडे यांच्यासह मांढरदेवला सर्वात आधी पोहचलो होतो. त्यामुळे तरूण भारतकडे सर्वात जास्त घटनास्थळाचे लाईव्ह फोटो होते. मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे. एक एक प्रसंग आठवला कि अंगावर शहारे येतात.

ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तो मंदीर परिसर एका टेकडीवर आहे. यात्रा काळात मंदिराच्या कमानीतून प्रवेश करून दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग होता. यात्रा आठवडाभर चालत असली तरी अमावस्येच्या दिवशी सर्वात जास्त गर्दी असते. त्या दिवशी सुमारे पाच लाखाच्या आसपास हि गर्दी होती. संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेलेला. जोरजोरात वाजणारा हालगी आणि ताशांचा गजर आणि त्या एका विशिष्ट तालावर अंगात काढून घुमणाऱ्या बायका…

हे वेगळच दृश्य होतं. तिथच नवस फेडण्यासाठी आणलेल्या बकऱ्यांच्या कत्तली. रक्ताचे वाहणारे पाट. नारळाच्या शेंडीचा ढिग. आणि परतीच्या मार्गावर फोडलेल्या नारळाचे पाणी वहात असल्यामुळे झालेली घसरण. हीच २९३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.

एकावर एक थर रचावेत अशी माणसं एकमेकांच्या अंगावर पडत गेली आणि प्रेतांचा खच पडत गेला. त्याचदरम्यान पांगलेली गर्दी आजूबाजूच्या दुकानात घूसली त्यामुळे पत्र्याची दुकाने कोलमडून पडली. त्याच दुकानांमध्ये शार्टसर्किट झाले आणि त्याचा अनेकानां शाॅक बसू लागला. त्यातही अनेकांचा जीव गमवावा लागला. त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे मंदीर परिसरातील दुकानानां आगी लागल्या आणि लूटमार सुरू झाली. सगळ्या दुकानांतला माल तसाच जळून खाक झाला पण त्यावेळी अनेकांनी मोठी लूटमार केली. कांही दुकानांमध्ये सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. संपूर्ण परिसरात पळापळ सुरू झाली.

भेदरलेल्या अवस्थेतील रडणारी लहान मुलं आणि जखमी अवस्थेत तळमळणारी माणसं आजही आठवतात. अनेक प्रेतांच्या भोवती धायमोकलून ओरडणारी माणसं आठवली की अंगावार काटा येतो. त्यामध्ये गरीबांची संख्या मोठी होती. पत्रकारितेच्या भाषेतला सगळा बहुजन समाज होता.

Screen Shot 2019 01 25 at 1.54.14 PM

कसं झालं… कुणी केल… काही कळायला मार्ग नव्हता. पण प्रत्येकजण यात संधी साधून घेत होता.

काही बदमाश लोकानी प्रेतांच्या अंगावरचे दागिनेसुद्धा चोरले. तर काहीनी दुकानातला गल्ला लुटला. अशा भयानक वातावरणात काही दुकानदारानी प्रशासनाविरोधातला आपला राग काढायची संधी साधली. त्या जमावाने वाईचे तहसिलदार शिवाजीराव तळपे यांना पेटलेल्या नारळांच्या ढिकाऱ्यात फेकून देण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हाधिकारी सुबराव पाटील आणि तत्कालीन ॲडिशनल एसपी जय जाधव यांनी प्रसंगावधान राखून तळपे यांचा जीव वाचवला. हा प्रसंग सर्वात भयंकर होता.

एसपी चंद्रकांत कुभार जमाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच होणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटानी संपूर्ण परिसर हादरून जायचा. अंगाचा थरकाप उडायचा. सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत हे सत्र सुरूच होते. सुमारे चारच्या दरम्यान आम्हाला पण पत्रकारितेची आठवण झाली. मी माझ्या सहकाऱ्यानां एकत्र बोलावून घेतले. सर्वानी पाणी पिऊन घेतले. अत्यंत थंड डोक्याने कोणकोणत्या बातम्या करायच्या हे ठरवले.

तोपर्यंत सर्व संपत आलेलं होतं. २९३ लोकांचा मंदिर परिसरात बळी गेला होता. बकऱ्यां-कोंबड्यांचा बळी देवून आपलं नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तांचाच इथं बळी गेला होता. जगभरातल्या माध्यमांचा आठवडाभर माढरदेवला मुक्काम होता. अशातच दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला माढरदेवच्या मराठी शाळेतच आम्ही झेंडावंदनला उपस्थित राहिलो.

मला अजून आठवतय या सगळ्या प्रसंगात तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामगिरी कोणी विसरू नये. अशा प्रसंगी त्यांच्या कामाची दखल घेतलीच पाहिजे.

त्यांनी वाईच्या सरकारी आणि खासगी रूग्णालयात जखमींवर उपचार आणि मृतदेहांची ओळख पटवून संबधित नातेवाईकांच्या ताब्यात देवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत अँम्ब्युलन्सने पोहचवण्याची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्याबरोबर सर्व पक्षांचे स्थानिक नेतेसुद्धा मदतकार्यात योगदान देत होते. आठवडाभरानंतर आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं तो भाग वेगळा. पुढे न्यायमूर्ती राजन कोचर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांनी सरकारला अनेक चांगल्या शिफारशी केल्या आहेत. पण माहित नाही त्या शिफारशींच काय झालं.

दुर्घटनेनंतर काही काळ इथल्या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सुबराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण आता माहित नाही काय परिस्थिती आहे. घटनेच्या दुसऱ्यावर्षीच मागचा कित्ता गिरवण्याचा प्रकारही त्यावर्षी झाला होता. या देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असतात. २९३ माणसांचा बळी गेला तरी तिथली नवस फेडण्यासाठी बळींची प्रथा सुरूच होती. त्या ठिकाणी बकरी आणि कोंबडं कापण्याचा ठेका देणाऱ्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

आपल्याकडे अशा शेकडो घटना घडल्या तरी लोकांची मानसिकता मात्र तशीच कायम आहे. फारशी सुधारणा होतानां दिसत नाही. एवढ्या लोकांचा बळी गेला तरी देवाची भक्ती काही कमी होत नाही.

– चंद्रकांत पाटील ( पुर्वप्रकाशित : चंद्रकांत पाटील ब्लॉगस्पॉट.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.