सुपरहिरोंच्या बापाला सगळ्यांनी खुळ्यात काढलेलं तरी त्याने स्पायडरमॅनला जन्म दिला

स्पायडरमॅन बघून माझ्या मनात नेहमीच विचार यायचा की,

राव मला एखाद्या कोळ्याने डंख मारला तर माझ्यात पण स्पायडरमॅन सारखी ताकद येईल का ?

च्यायला लैदा तसं मी कोळ्याला हातावर पण चढवून घेतलं, पण कोळी काही चावला नाही आणि मी काय स्पायडरमॅन बनलो नाही. आणि मी काय बारका बिरका असताना असा विचार करायचो असं तुम्हाला वाटेल भिडू, पण आत्ता लगीन लावून दिलं तर पोरं जन्माला येतील एवढा कवळा आहे मी. (सेम स्पायडरमॅन सारखाच)

असो, पण एकुणात काय तर स्पायडरमॅनचा पिक्चर बघून हे असं वाटण म्हणजेच स्टॅन ली चं यश आहे भिडू !

एखादा भिडू भिंतीवर कोळ्यासारखा सरसर चढतो तर दुसरा एखादा भिडू राग आल्यावर हिरवा महाकाय सैतान बनतोय या गोष्टी मार्व्हलच्या जगात सुपरहिरो बनवायला काफी आहेत. सुपरहिरो असेच असतात हे लोकांना पटतं.

पण त्या पलिकडे जाऊन मी विचार केला की, हे सुपरहिरो प्रत्यक्ष जगात समजा असतील, तर त्यांनाही सर्वसामान्यांना सतावणारे प्रश्न पडतील असतील ना ? म्हणजे त्यांना रोज भूक लागत असेल, चुकून एखाद्या सुपरहीरोचा ब्रेकअप होत असेल, नाहीतर मग मला जस टेंशन येत तस एखाद्या सुपरहीरोच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतील…

हीच गोष्ट खरं तर मार्व्हल कॉमिक्सचं वैशिष्ट्य ठरली होती.

जॅक कर्बि आणि स्टीव डिटको सारख्या साथीदारांच्या मदतीने स्टॅन लीने सुपरहिरोजची लीग उभी केली. आपल्यासारख आयुष्य जगणारे सुपरहीरो आपल्यातलेच एक होऊन गेले होते. त्यामुळेच आज हे हिरो जगातल्या कोट्यवधी जनतेच्या मनावर राज्य करतात.

वयाच्या सतराव्या वर्षापासून कॉमिक्ससाठी चित्र चितारायला लागलेला स्टॅन तब्बल पंच्याण्णव वर्षं जगला.

आयर्न मॅन, स्पायडरमॅन, ब्लॅक विडो, कॅप्टन अमेरिका, हल्क आणि हॉक आय यांची टीम म्हणजे अॅव्हेंजर्स. या टीमला उणीपुरी पन्नास वर्षं झाली आहेत. पृथ्वीवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ही टीम सदैव सज्ज असते. सहसा पृथ्वीचा शत्रू अंतराळातून आलेला असतो.

या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे यातला प्रत्येक सुपर हिरो त्याच्यातल्या सुपर पॉवरला बाजूला ठेवलं तर माणूस म्हणून एक नमुना आहे. टोनी स्टार्क नावाचा प्रचंड श्रीमंत उद्योगपती आयर्नमॅन बनून अभेद्य चिलखत चढवतो. प्रचंड अहंकार आणि बेदरकार वागणं या स्वभावामुळे टोनीच्या सुपरपॉवरवर अनेकदा पाणी फिरतं.

स्टॅनली च्या प्रत्येक सुपरहिरो मागे एखादी तरी गोष्ट ही आहेच. त्यातल्या त्यात स्पायडरमॅन तर नुकतीच मिसरूड फुटलेला एक कॉलेजयुवक जो सगळ्यांची दिलाची धडकन आहे.

स्पायडरमॅनच्या निर्मितीचं श्रेय पूर्णपणे स्टॅनचं. स्पायडरमॅनच्या जन्माची गोष्ट एकदमच भारिय !

म्हणजे स्टॅन मार्व्हलसाठी एक नवा सुपरहीरो शोधत होता तेव्हा स्टॅनला भिंतीवर सरासरा चढणारा सुपरहिरो हवा होता. त्यानं फ्लाय मॅन, इन्सेक्टमॅन अशा बऱ्याच नावांचा विचार केला. पण कोणतंच नाव फारसं नाटकी असं वाटत नव्हतं. सगळीच्या सगळी नाव त्याला टुकार वाटली. मग त्याला नाव सुचलं,

स्पायडरमॅन

कोळ्यासारख्या किटकाची शक्ती असलेला हा कोवळा सुपरहीरो. पण स्टॅनला हा महानायक लोकांमध्ये वावरणारा हवा होता. स्वतःला मॅन म्हणत असला तरी प्रत्यक्षात हा कोवळा मुलगा. दिसायला असा काय हंक नाही, चेहऱ्यावर पिंपल्स, गर्लफ्रेंड जास्त काय भाव देत नाही, आई-वडलांविना पोरका, पण काका काकूंनी सांभाळलेला हा मुलगा.

या नव्या सुपरहिरोचं वर्णन ऐकून स्टॅनच्या प्रकाशकांनी त्याला वेड्यात काढलं. ते म्हंटले,

आपल्याला सुपरहिरो हवाय स्टॅन, कोवळा पोरगा नाही. लै लै तर त्याला साईड किक म्हणजे हिरोचा जोडीदार कर. मार्व्हलच्या रायव्हलरी डीसी कॉमिक्सच्या बॅटमॅनला असाच पोराटकी साईडकिक रॉबिन आहे. पण त्याला हिरो कशाला करतोस ? पण स्टॅन काय मागं हटला नाही आणि स्पायडरमॅन स्टॅनला जसा हवा होता, तसाच त्यानं तयार केला. फक्त तयारच केला नाही तर पोरा टोरांपासून थोरा मोठ्यांचा चहिता बनला.

आजपर्यंत मार्व्हलच्या सिरीज मधला कोणता सीन मला आवडला असेल तर तो अमेझिंग स्पायडरमॅन मधला.

त्यात लायब्ररियन लायब्ररीमध्ये हेडफोन लावून क्लासिकल सिंफनी ऐकतोय आणि मागं स्पायडरमॅन आणि लिझर्ड विषय हार्ड मारामारी करतायत. आपल्या मागे काय विषय चालूय याचा अंदाज नसलेला हा लायब्ररीयन शांतपणे हेडफोन लावून काम करतोय आणि मागे तुफान मारामारी चालूय. नुसता कल्ला !

अशा तुफान मारामारी करून जगाला वाचवणाऱ्या कित्येक सुपरहिरोजना जन्माला घालणारा स्टॅन स्वतः नशिबाला सगळ्यात मोठा सुपरहिरो मानायचा. तो म्हणायचा,

माझं नशीब माझ्या बरोबर होतं, म्हणून मी एवढं करू शकलो.

स्टॅन माझ्यासारखं पोरखेळ करत कोळ्यांना हातावर चढवून  सुपरहीरो व्हायची वाट बघत बसला नाही. नशीबाच्या जोडीला त्याची एक्स्ट्रीम थिंकिंग पॉवर नसती तर ना स्पायडरमॅन जन्माला आला असता ना मार्व्हलचा कोणता सुपरहीरो.

त्यामुळे भिडू स्टॅनच्या प्रवासातून आपण काय शिकल पाहिजे हे मी सांगायला नको तुम्ही सुज्ञ आहातच !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.