जिंकलात तर देशप्रेमी, हरला तर देशद्रोही !!

‘चक दे इंडिया’ मधला कबीर खान. भारतीय हॉकी संघाचा कॅप्टन. ज्याला फक्त त्याची टीमचं नाही तर राहत घर देखील सोडावं लागलं होत, कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने गोल करायची संधी गमावली होती. आपलं सगळं आयुष्य ज्या खेळासाठी, ज्या संघासाठी महत्वाचं म्हणजे ज्या देशासाठी खेळण्यात घालवलं त्याच देशवासीयांकडून शेवटी त्याच्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचे आरोप केले गेले.

कबीर खानने गोल केला नाही ही त्याची चूक नव्हती तर त्याने ‘पाकिस्तान’ विरुद्ध गोल केला नाही म्हणून त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं.

शेवटी हा बॉलिवूडचा सिनेमा होता, काही वर्षानंतर कबीर खानने देशाला हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं आणि झालं गेलं सगळंच विसरून तो पुन्हा लोकांसाठी  ‘भारतीय ‘ झाला. सिनेमा म्हणून हे सगळं ठीक. कबीर खानचा ‘देशद्रोही ते देशप्रेमी’ प्रवास आपल्याला  सिनेमा म्हणून बघायला प्रेरणादायी वगैरे वाटला.

हे सर्व सांगण्याच कारण अस की सध्या आपल्या खऱ्या आयुष्यात असाच आरोप झालेल्या एका खेळाडूचं नांव चर्चेत आहे. ज्याच्यावर तो ज्या देशात  लहानाचा मोठा झाला त्याच देशाने त्याच्या देशप्रेमावर शंका घेतलीये. देशद्रोहाचे आरोप झाले आणि संघातून राजीनामा द्यावा लागला. सध्यातरी त्याच्या आयुष्यात कबीर खान सारखी ‘हॅप्पी एंडिंग ‘ दिसत नाही. विशेष म्हणजे एवढं सगळं रामायण घडायला कारण काय ठरावे, तर एका चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीबरोबर काढलेला फोटो.

मेसुत ओझील.

जर्मन फुटबॉल संघाचा मिडफिल्डर. सध्या इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अर्सेनलकडून खेळतो. ओझील आतापर्यंत जर्मन, स्पॅनिश तसेच इंग्लिश लिगमध्ये खेळलेला आहे. प्रत्येक लीगच्या एका तरी सिजनमध्ये तो सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू राहिला आहे. (‘असिस्ट’ म्हणजे गोल करणाऱ्या खेळाडूला शेवटचा पास देणारा खेळाडू. ज्याच्या पासनंतर गोल होतो) इतर वेळी कमीत-कमी पहिल्या तीनात तर तो असेलच.

सध्या जगातले पाच सर्वोत्तम मिडफिल्डर काढले तर त्यामध्ये ओझीलचं नांव नक्कीच असणार. शिवाय ‘क्लब करिअर’च्या तूलनेत जर्मनीकडून खेळताना त्याचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिलेला आहे.

२००९ पासून जर्मन संघात असणाऱ्या ओझीलच्या नावावर आतापर्यंतच्या ९२ सामन्यात २३ गोल आणि ४० असिस्ट आहेत. २०१० च्या ‘वर्ल्ड कप’मध्ये सर्वात जास्त असिस्ट ओझीलचेच होते. २०१२ च्या युरो स्पर्धेत तो ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. जर्मन संघाकडूनच्या फक्त ९ वर्षाच्या कारकिर्दीत त्याला तब्बल पाच वेळा ‘जर्मन फुटबॉलर ऑफ द इयर’ म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. पाठीशी एवढ्या असामान्य कारकिर्दीची पुण्याई आणि अंगात अजून बराच फुटबॉल बाकी असताना मागच्याच आठवड्यात ओझीलने जर्मन संघातून निवृत्ती जाहीर केली.

ते सुद्धा फक्त एका वादग्रस्त फोटोमुळे.

ओझील मूळचा तुर्कस्तानी मुसलमान वंशाचा. तुर्कस्तानी गृहयुद्धाच्या काळात ओझीलचे आजोबा जर्मनीमध्ये स्थलांतरित झाले. ओझील जन्मला आणि वाढला देखील जर्मनीमध्येच. तुर्कस्तानकडून खेळण्याची संधी असताना देखील त्याने जर्मनीकडून खेळण्याचा निर्णय घेतला, कारण तो स्वतःला अभिमानाने जर्मन म्हणवून घेतो.

मात्र जर्मन म्हणून अभिमान बाळगताना त्याने स्वतःचा धर्म किंवा वंश अजिबात दडवला नव्हता. तशी गरज त्याला कधीच वाटली नव्हती.  मॅच संपल्यानंतर मैदानावरच प्रार्थना करणारा, द्वेषाने मैदानावर फेकलेला पावाचा तुकडा उचलून ‘माझ्या धर्मात अन्नाची नासाडी करणं निषिद्ध आहे’ असं सांगत तो तुकडा मैदानाबाहेर ठेवणारा ओझील नेहमीच जर्मन माध्यमांसाठी  ‘पोस्टर बॉय’ राहिलेला आहे. जर्मन लोकांवर वर्षभरात सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिंना दरवर्षी जर्मन माध्यमांकडून  ‘BAMBI’ पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचा २०१० सालचा मानकरी होता ओझील. तो देखील जर्मन लोकांना एकसंध बांधून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणून.

असं असताना २०१० ते २०१८ या कालावधीत नेमकं असं काय घडलं की माध्यमांचा ‘पोस्टर बॉय’ असलेल्या ओझीलला माध्यमांमुळेच फुटबॉल संघाचा राजीनामा द्यावा लागला ?

तर यामागचं कारण दडलंय या आठ वर्षातील जर्मनीतील बदलत्या राजकारणात. युरोपियन राजकारणात सामाजिकदृष्ट्या अतिशय पुढारलेलं, पोलादी कणखरता असलेलं राष्ट्र म्हणून जगाने आपल्याला ओळखावं ही जर्मनीची इच्छा राहिलेली आहे.

त्यामुळेच २००९ सालचा ओझीलचा जर्मन संघातील समावेश जर्मन राजकारणासाठी देखील तितकाच महत्वाचा होता. ओझील तुर्कस्तानी मुसलमान वंशाचा पहिला खेळाडू होता, ज्याची राष्ट्रीय संघात निवड झाली होती. यामुळे जर्मन राजकारणाचा उदारतावादी चेहरा जगासमोर सादर करण्याची चांगली संधी जर्मन माध्यमे आणि राजकारण्यांना मिळाली होती. जी संधी त्यांनी पुरेपूर साधली. २०१२ च्या तुर्कस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये जाऊन ओझीलबरोबर फोटो काढले होते. देशातील कट्टर उजव्या विचारसारणीच्या राजकारण्यांना उत्तर देताना या फोटोचा भरपूर वापर करण्यात आला होता.

२०१६ नंतर मात्र युरोपमधलं राजकारण बदलायला लागलं.

सीरियातील निर्वासितांना अँजेला मर्केल यांनी जर्मनीची दारे उघडली आणि वर्षभरातच जवळपास १० ते १२ लाख निर्वासितांनी जर्मनीत प्रवेश केला. मूळ जर्मन लोकांना हा बदल पटला नाही. देशभरातून निर्वासितांना बाहेर काढण्याची मागणी होऊ लागली. या परिस्थितीचा नेमका फायदा कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी घ्यायला सुरुवात केली. फक्त निर्वासितच नाही तर जर्मनीमध्ये राहणाऱ्या इतर वंशीय लोकांना सुद्धा देशाच्या बाहेर हाकलण्याची मागणी जोर धरू लागली. हळूहळू जनतेचा मूड कट्टरतेकडे झुकू लागला. जर्मनीतील राजकारण वंशवादाच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिल.

अशातच तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगन मे २०१८ मध्ये लंडनमध्ये आले होते. त्यांनी लंडनमधीलच ‘अर्सेनल क्लब’ कडून खेळणारा ओझील आणि जर्मनीतील अजून एक तुर्कस्तानी खेळाडू गुंडग्वान या दोघांना भेटीचे आमंत्रण दिले. लंडनमधील एका हॉटेलमध्ये ही अनौपचारिक भेट झाली. फोटो वगैरे काढण्यात आले. पण या  एका  फोटोमुळे आपल्या देशभक्तीवर शंका घेतली जाईल आणि फुटबॉल कारकीर्द पणाला लागेल अंदाज त्यावेळी ओझीलला असण्याचं काहीच कारण नव्हतं.

मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप असलेल्या एर्दोगन यांची ओझीलने घेतलेली भेट जर्मन लोकांना विशेषतः जर्मन माध्यमांना अजिबात आवडली नाही. माध्यमांनी ओझील आणि गुंडग्वान या दोघांवरही सदर भेटीबद्दल जर्मन लोकांची माफी मागण्यासाठी  दबाव आणायला  सुरुवात केली. गुंडग्वानने माध्यमांसमोर स्पष्टीकरण देऊन प्रकरण मिटवून टाकलं. परंतु अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या ओझीलने मात्र “या भेटीसाठी मला कुणालाही, कसलंही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही” असं सांगितलं.

ozil4
twitter

“माझे पूर्वज ज्या देशातून आले, त्या देशाच्या प्रमुखांनी जर मला भेटायला बोलावलं तर ती भेट नाकारण्याचं काहीही कारण मला दिसत नाही. मी कुणी राजकारणी नाही, आजी – आजोबांच्या आदराखातर मी एर्दोगन यांची भेट घेतली. या बाबतीत माध्यमांच्या टीकेला मी उत्तरदायी नाही” असंही ओझीलने सांगितलं आणि इथेच तो माध्यमांसाठी  ‘व्हिलन’ बनला.

एर्दोगन आणि ओझील त्यापूर्वीही भेटले होते. इतकंच काय तर जर्मनीच्या चॅन्सलर मर्केल आणि एर्दोगन यांनी एकत्र बसून  फुटबॉलची मॅच बघितली होती. पण त्यावेळी या भेटींबद्दल कोणालाही आक्षेप नव्हता. पण आताची परस्थिती वेगळी होती. वंशवादाच्या मुद्द्याने जर्मनीत जोर धरला होता. त्यातच ओझीलने माध्यमांच्या समोर येण्यास नकार देत त्यांचा ‘इगो’ दुखावला होता त्यामुळे अचानकच माध्यमांमध्ये ओझीलविषयी नकारात्मक बातम्या छापून यायला लागल्या.

तो ‘फुटबॉलर’ असण्यापेक्षा, तो ‘स्थलांतरित’ कसा आहे याबद्दलच्या चर्चा वाढू लागल्या.

त्याच्या खेळातील घसरलेल्या कामगिरीची आकडेवारी छापून येऊ लागली. त्यामुळे गेली ७-८ वर्ष ओझीलला डोक्यावर घेणारे जर्मन प्रेक्षक मैदानावरच ओझील विरुद्ध घोषणा देऊ लागले. कारण आता तो ‘तुर्कस्तान वंशाचा फुटबॉलर’ बनला होता. २०१८ च्या ‘फुटबॉल वर्ल्ड कप’ स्पर्धेत ओझीलला जर्मनीच्या  संघात स्थान देऊ नये, अशी मागणी करण्यात येऊ लागली. पण या सगळ्या घडामोडी घडत असताना ओझील मात्र शांत होता.

वर्ल्ड कप सुरु झाला आणि विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जाणारा जर्मन संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडला. परत एकदा माध्यमांमध्ये ओझील विरोधी वातावरण जोर धरू लागलं. सांघिक खेळ असणाऱ्या फुटबॉलमधील जर्मनीच्या पराभवास एकट्या ओझीलला दोषी धरण्यात येऊ लागलं. ‘अटॅक’ आणि ‘डिफेन्स’ या दोन्ही पातळ्यांवर जर्मन संघ अपयशी ठरलेला असताना मिडफिल्डर म्हणून खेळणारा ओझील दोषी कसा..? उलट साखळी सामन्यांमध्ये जर्मनीतर्फे गोल करण्याच्या सर्वात जास्त संधी ओझीलनेच निर्माण केल्या होत्या. हे कुणीच लक्षात घेत नव्हतं.

एर्दोगन बरोबरच्या फोटोमुळे ‘सॉफ्ट टारगेट’ बनलेल्या ओझीलवरच जर्मनीच्या पराभवाचं खापर फोडण्यात आलं. त्याच्यावर चहू बाजूंनी टिका व्हायला सुरुवात झाली. एर्दोगन बरोबरच्या ‘फोटो’ चा मुद्दा नव्याने चर्चेत आणला जाऊ लागला. उघडपणे ओझीलच्या जर्मन असण्यावर शंका घेण्यात येऊ लागल्या. जर्मनीतले वर्तमानपत्रे, ‘बायर्न म्युनिक’सारख्या मोठ्या क्लबचे माजी अध्यक्ष आणि काही राजकारण्यांनी ओझील विरोधात स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली.  याकाळात कुठलीही मोठी व्यक्ती त्याच्या समर्थनात उतरली नाही. २०१२ साली ओझीलबरोबर फोटोसेशन करणाऱ्या मर्केल यांनीही मौन बाळगणंच पसंत केलं. कारण त्यांचेही हात दगडाखाली आहेत. शेवटी त्यांनाही आपला मतदार जपायचाय !

‘वर्ल्ड कप’नंतरच्या टीकेनंतर मात्र ओझीलची सहनशक्ती संपली.

शेवटी कोणावरही वैयक्तिक टिका न करता वर्ल्ड कप संपल्यानंतर पाचच दिवसात ओझीलने जर्मन संघाचा राजीनामा दिला. आपली बाजू मांडण्यासाठी मात्र त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला. सोशल मिडीयावरील तीन पानी पत्रात त्यानं लिहिलंय की “ज्यावेळी संघ जिंकतो, त्यावेळी मी जर्मन असतो. परंतू संघ हरल्यानंतर मात्र मी स्थलांतरित खेळाडू ठरतो” ओझिलच्या या एकाच वाक्यातून संपूर्ण जर्मनीची सध्याची असलेली मानसिकता लक्षात येते.

कदाचित ओझील चूकला असेलही. एर्दोगन यांच्याबरोबरच्या फोटोमुळे काही जणांच्या भावना दुखावल्या असतीलही. परंतु एका नकळत झालेल्या चुकीची खूप मोठी किंमत ओझीलला भोगायला लागलीये. ओझीलसारखा खेळाडू गमावल्याने जर्मन फुटबॉलचं देखील मोठं नुकसान झालंय. पण असेच प्रसंग जर वाढायला लागले तर मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम संपूर्ण जर्मनीला भोगायला लागतील. वंशवादाच्या अशाच छोट्या-छोट्या घटनांमधून नाझीवादाने जर्मनीमध्ये आपले हात पसरवले होते. फक्त जर्मनीच नाही नाही तर संपूर्ण युरोप या वंशवादाच्या आगीत होरपळून निघाला होता.

यूरोपमध्ये स्वतःला मोठ्या भावाच्या भूमिकेत बघणाऱ्या जर्मनीने आताच या वंशवादाला आळा घालायला सुरुवात केली पाहिजे. कारण जर का हा वंशवादाचा वणवा पेटला तर त्याची धग फक्त यूरोपमध्येच नाही तर जगाच्या एका टोकाला असणाऱ्या ट्रम्पसारख्या नेत्याच्या फोटोची पूजा फक्त तो जातीयवादाला समर्थन देतो म्हणून करणाऱ्या भारतापर्यंत  पोचायला अजिबात वेळ लागणार नाही. यावेळी मात्र जगाच होणारं नुकसान हे भरून काढायच्या पुढे गेलेलं असेल एवढं मात्र नक्की.

  • महेश जाधव 
Leave A Reply

Your email address will not be published.