चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक २

गेम ऑफ थ्रोनची सुरुवात होते विंटरफेल मधून. राजा आणि त्याची संपूर्ण फॅमिली म्हणजेच किंग रॉबर्ट, क्वीन सर्सी, सर्सीचे भाऊ जेमी आणि बुटका टिरीयन यांच्यासह प्रिन्स जोफ्री आणि बाकीची मुलं असा सर्व लवाजमा विंटरफेलला भेट देतात.

भेटीचं मुख्य कारण म्हणजे, राजाचा जिगरी दोस्त, ‘लॉर्ड ऑफ विंटरफेल’ नेड स्टार्क ला भेटणे आणि त्याला किंगचा ‘हँड ऑफ द किंग’ (राजाचा उजवा हात) बनवणे. नेड हो नाही करत शेवटी तयार होतो कारण, दोस्ती आणि राजाचा आधीच हँड याचा झालेला अनाकलनीय मृत्यू.

ह्या सगळ्या भेटी आणि उठाठेवी मध्ये नेडचा मधला मुलगा ब्रॅन ज्याला इकडून तिकडे कुठेही भिंती वैगेरे चढायची हौस आहे तो एक वेगळीच भानगड बघतो. विंटेफेल मधल्या एका वॉच टॉवरवर, सर्सी आणि तिचा जुळा भाऊ जेमी, विंटरफेलच्या थंडीत प्रणयराधनेत मश्गुल असतात आणि छोटा ब्रॅन तिथे पोचतो, ब्रॅन आपलं गुपित सर्वांना सांगेल ह्या भीतीने जेमीत्याला वॉच टॉवरवरून ढकलून देतो ज्यात तो पांगळा बनून जातो.

नेडची छोटी मुलगी आर्या आणि अतिशहाणा,खुनशी प्रिन्स जोफ्री यांच्यात प्रिन्सच्या माजोरड्यापणामुळे झटापट होते. यामध्ये भरीस भर, आर्याची डायरवुल्फ नायमेरिया प्रिन्सचा चावा घेऊन आर्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. हे डायरवूल्फ (स्टार्क घराण्याचं सिजील) म्हणजे एकदम आपल्या मालकाप्रती प्रामाणिक, जे नेडने आपल्या प्रत्येक मुलाला एक एक दिले आहेत.

मग आधीच झालेला ब्रॅन चा ‘सीन’, त्यात सर्सीला एकंदर स्टार्क घराणंच नावडतं असणं अशा कारणांमुळे बेरकी क्वीन सर्सी कांगावा करते. त्यात भरीसभर, मोठी सान्साला प्रिन्स जोफ्री आवडला असल्यामुळे सर्सी तिचा उपयोग करून
घेऊन सान्साला आपल्याच बहिणीच्या विरोधात राजा आणि वडिलांसमोर जबानी द्यायला लावते.

मग काय  बायकोच्या म्हणण्यापुढे हतबल किंग रॉबर्ट, एका डायरवूल्फला मारण्याचा आदेश देतो कारण नायमेरियाला
वाचवण्यासाठी आर्या ने तिला जंगलात पळवून लावलं आहे. यां प्रकरणानंतर नेड स्टार्क राजाच्या लवाजम्यासह
आपल्या दोन मुली सान्सा आणि आर्या यांना घेऊन किंग्स लँडिंगला निघून जातो.

जाण्याआधी नेड आपल्या ‘बास्टर्ड’ मुलाला (म्हणजेच अनैतिक अपत्य) जॉन स्नो ला ‘वॉल’ वर पाठवून देतो. जॉन, वॉलचं सैनिक ‘नाईट्स वॉच’ मध्ये भरती होऊन मरेपर्यंत वॉलची रक्षा करण्याची शपथ घेतो.

तिकडे ‘एसोस’ राज्यात रॉबर्टच्या आक्रमणानंतर पळून गेलेला टारगेरीयन, प्रिन्स विसेरिस त्याची बहीण
डेनिरीसचं भटक्या आदिवासी टाईप जमात डोथ्राकीचा राजा ‘खाल ड्रॉगो’शी (ऍक्वामॅन चा हिरो) लग्न ठरवतो.

नितळ सुंदर, कमनीय, चंदेरी केसांच्या आणि अगदीच नाजूक डेनिरीसचं अशा रानटी राजाशी लग्न ठरवण्याचं
कारण म्हणजे, विसेरिसला डोथ्राकी आर्मी घेऊन किंग्स लँडिंग वर अटॅक करून आपलं गेलेलं राज्य आणि राज्यमुकुट
परत मिळवायचा आहे.

लग्नात डेनिरीसला तीन ड्रॅगनची अंडी भेट मिळतात आणि डोथ्राकी ट्राइब च्या बऱ्याच ट्रायबल प्रथांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, घोड्याचं कच्चं मांस खाणं, ट्रायबल राजा खालच्या अमानवी संभोगाला सामोरं जाणं, इत्यादी गोष्टींना कंटाळलेली डेनिरीसला कळून चुकतं कि ह्याच्या शिवाय आपलं कोणी नाही आणि ह्याला जिंकलं कि आपलं आयुष्य सुखकर आहे.

ह्या प्रयत्नातच डेनिरीस ड्रोगोला माणसात तर आणतेच पण सोबत त्याच्या प्रेमात पडून त्याच्या मुलाची आई होणार असते. यानंतर डेनिरीसला डोथ्राकी ‘खलिसी’ म्हणजेच खालची बायको आणि डोथ्राकीची राणी म्हणून स्वीकार करतात.

हे सर्व बघून विसेरीस चवताळून उठतो, त्याला आपल्या बहिणीला प्यादं म्हणून वापरायचं असतं पण तेच हत्यार नसल्यामुळे तो ड्रोगोला ठरल्या कराराप्रमाणे मला माझं राजमुकुट आणून दे नाहीतर तुझ्या होणाऱ्या पोराला संपवेन अशी धमकी देतो. चिडलेला ड्रोगो उकळतं सोनं विसरीसच्या डोक्यावर ओतून त्याला संपवून टाकतो.

किंग्स लँडिंगमध्ये पोचल्यावर गडबडीने सान्सा आणि प्रिन्स जोफ्री यांचा साखरपुडा चतुर सर्सी लावून देते.

कॅटलीन स्टार्क हिला असं कळतं कि ब्रॅॅनला ढकलून देणं आणि नंतर त्यावर मारेकऱ्याने हल्ला करणे यात छोटू
टिरीयनचा हात असण्याची शक्यता आहे आणि हे किंग रॉबर्टला कळलं पाहिजे. नेड सोबत छुपी भेट घेऊन
परततांना कॅटलीनला टिरीयन सापडतो, त्याला कैदी करून कॅटलीन आपल्या बहिणीकडे ‘हाऊस एरीन’कडे निघून
जाते.

नशीब कायमच बलवत्तर असणारा टिरीयन तिकडून सुटतो आणि किंग्ज लँडिंगकडे निघून जातो. किंग्ज
लँडिंग मध्ये जेमी आणि नेड समोरासमोर येतात आणि भाऊ टिरीयन ला का कैद केलं म्हणून जेमी आणि नेड
यांच्या रक्षकांच्या लढाईत नेड जखमी होतो.

या दरम्यान नेडला कळून चुकतं कि, सर्सीची मुलं हि किंग रॉबर्ट कडून झालेली नाहीत तर ती जेमीसोबतच्या अनैतिक संबंधामधून जन्मलेली आहेत, आणि याचाच उलगडा झाल्यामुळे आधीचा हँड ऑफ द किंग ‘जॉन एरीन’ला मारून टाकण्यात आलेलं आहे.

हे राजाला सांगायला नेड निघतो पण त्याआधीच किंग रॉबर्ट शिकारीवर गेलेला असतो. नेडला वाटेत सर्सी भेटते आणि तिला भाबडेपणाने स्वतःला समजलेल्या गुपिताचा खुलासा करून आणि हे किंग समोर उघड करणार असल्याचा सांगून सर्सीला किंग रॉबर्ट परतण्याआधी किंग्स लँडिंग मधून निघून जाण्यास सांगतो. किंग राबर्ट शिकारीवरून जखमी होऊनच परततो.

जखमी असताना किंगला किंवा त्याहीपेक्षा आपला परममित्र असणाऱ्या राबर्टला सर्सी आणि मुलाबद्दलचं गुपित सांगणं नेड टाळतो.

तिकडे ‘द वॉल’ वर अशी बातमी आली आहे कि, व्हाईट वॉकर्स पुन्हा जागृत झाले आहेत आणि वॉलकडे चाल
करून येत आहेत. व्हाईट वॉकर्स म्हणजेच मुडद्द्यांची आर्मी खरंच उठून बसली आहे का हे बघायला गेलेले ‘फर्स्ट
रेंजर्स’ मधले जॉनचे ‘अंकल बेन्जन’ गायब आहेत आणि बाकीच्यांची प्रेतं सापडत आहेत.

अशातच एका रात्री, एक प्रेत ‘विट’ म्हणजेच भूत म्हणजेच व्हाईट वॉकर म्हणून जागृत होतं. जॉन त्याला आग लावून मारून टाकतो जे त्यांना संपवण्याचा पर्याय आहे.

किंग्स लँडिंग मध्ये रॉबर्ट चा मृत्यू होतो. मृत्यू होण्याआधी त्याने नेडला ‘प्रोटेक्टर ऑफ द रिल्म’ म्हणजेच राज्याचा
संरक्षणकर्ता तू असशील असं पत्र दिलं आहे. रॉबर्टच्या मृत्यूनंतर नेड जेव्हा हे पत्र सर्सीला दाखवतो तेव्हा ती ते
फाडून आपल्या लाडक्या लेकाला प्रिन्स जोफ्रीला किंग बनवते.

किंग झाल्यांनतर लगेच माजोरडा जोफ्री, नेडला गद्दार ठरवून कैदी बनवतो. सान्साला सुद्धा बंदी बनवलं जातं पण चपळ आर्या पळून जाते. जोफ्रीला किंग आणि नेडला बंदी बनवल्याची बातमी ऐकून नेडचा मोठा मुलगा ‘रॉब’ उठाव करतो आणि सैन्याला किंग्स लँडिंगवर चाल करण्यासाठी जमा होण्याचे आदेश देतो. एरीन वरून परतणारी कॅटलीन रॉबचं समर्थन करून त्याच्या सोबत निघते.

जोफ्री आपल्या मामा/खऱ्या बाबाला जेमीला ‘किंग्सगार्ड’ म्हणजेच राजाचा प्रमुख रक्षक बनवतो आणि रॉबच्या आर्मी विरुद्ध लढण्यासाठी पाठवून देतो. रॉबची आर्मी जेमीला हरवून त्याला कैदी बनवून विंटरफेलमध्ये परत येते. किंग्स लँडिंग मध्ये उतावीळ किंग जोफ्री, नेडला प्रजेसमोर शिरच्छेद करून मारून टाकतो.

यावेळी सान्साला तो स्वतःच्या सोबत पकडून ठेवून हे पाहायला लावतो तर पळून गेलेली आर्या जमावामधून हे सर्व पाहात
असते. हे सर्व समजल्यावर कॅटलीन आणि रॉब संपूर्ण लॅनिस्टर्सना मारून टाकण्याची शपथ घेतात आणि रॉबला
‘किंग इन द नॉर्थ’ घोषित केले जाते.

या सगळ्या जोफ्रीने केलेल्या गोंधळाने, घाणीने, उठाठेवीने आजोबा टायवीन लॅनिस्टर ठरवतात कि नातवाचे प्रताप खूप झाले आणि परिस्थिती सांभाळली पाहिजे. टिरीयन ला तात्पुरता हँड ऑफ द किंग बनवून स्वतः युद्धाची बाजू सांभाळायचा निर्णय घेतात.

तिकडे ड्रोगो आणि डेनिरीस च्या सुखी संसारादरम्यान खाल ड्रोगोला डोथ्राकी सैन्यामधील एक कार्यकर्ता आव्हान
देतो. हे आव्हान ड्रोगो मोडून काढतो पण त्यात त्याला गंभीर जखम होते ज्यातून तो उठणार नाही हे ड्रोगोला
माहित असतं. आता आपला राजा असा जखमी त्यात त्याचं होणारं मूल जन्माला नाही तर हा आपला राजा राहू
शकत नाही म्हणून काही ठराविक सच्चे सोबती सोडून बाकीची डोथ्राकी सेना त्यांना सोडून निघून जाते.

पुढे काहीच भविष्य दिसत नसणारी निराश डेनिरीस, एक दिवस एका जादूगरणीला ड्रोगोला ठीक करण्यासाठी
बोलवते. पण जादूगारीन त्याला बरं करण्याऐवजी आपल्या काळ्या जादूने त्याला आणखीनच अशक्त तर बनवतेच
आणि सोबत डेनिरीसच्या पोटातलं बाळ सुद्धा संपवते.

हतबल डेनिरीस शेवटी उशीने तोंड दाबून ड्रोगोला मरणयातनेतून मुक्त करून टाकते. राहिलेल्या सोबत्यांनसोबत त्याला जाळण्यासाठी चिता रचताना त्यामध्ये लग्नात मिळालेली तीन ड्रॅगनची अंडी सुद्धा ठेवते. ड्रोगोला पेटवलेल्या चितेमध्ये ती सती चालून जाते.

झालं? एवढा कालवा केला ती डेनिरीस पण संपली? नाही, थांबा अजून काही संपलं नाही!

सकाळी जेव्हा चिता विझते, तेव्हा चितेमधून डेनिरीस उठते. फक्त कपडे जाळून जातात बाकी डेनिरीसला काहीही
झालेलं नसतं. अगदी तिच्या केसांनासुद्धा धक्का लागलेला नसतो.

आणि, आणि सोबत असतात तीन ‘ड्रॅगन’ची पिल्ले. समोर बसलेली प्रजा ‘मदर ऑफ ड्रॅगन्स’ असं संबोधून आगीतून ड्रॅगन्स सोबत उठलेल्या डेनिरीससमोर नतमस्तक होतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.