२० शेळ्यांपासून सुरवात करून आज त्यांनी करोडो रुपयांची उलाढाल केली आहे

अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी भागात मोडतो, कमी पाण्याचं क्षेत्र असल्या कारणाने शेतीला जोडधंदा म्हणून इथल्या तरुणाने शेळी पालनाचा जोडधंदा सुरु करून कोटींची उलाढाल केली आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यातूनही चांगलं उत्पन्न घेता येऊ शकते याचा आदर्श या तरुणाने घालून दिला आहे. आज आपण याच तरुणाच्या प्रवासाची माहिती जाणून घेऊया.

शेळी पालनातून कशा प्रकारे उत्त्पन्न मिळते ? या व्यवसायाचा फायदा कसा होतो ? शेळीपालन व्यवसायाबद्दल लोकांचे असणारे गैरसमज अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या राहुल खामकर आणि सतीश एडके या दोन मित्रांनी शोधून काढली. राहुल खामकर हे कृषी विभागात सरकारी नोकरीवर होते मात्र नवीन काहीतरी करण्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. यातून त्यांनी २००९ साली  शेळी पालनाच्या व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. चांगली नोकरी सोडून त्यांनी या व्यवसायाची काहीच माहिती नसताना हा व्यवसाय करण्याचं नक्की केलं.

सुरवातीला देशी शेळ्यांपासून सुरवात केली. पुरेशी माहिती नसताना त्यांनी आपल्याच व्यवसायाचं बारकाईने निरीक्षण करत आपला व्यवसाय सुरु ठेवला. बाजारातून शेळ्या विकत आणायच्या आणि त्या गोठ्यात बांधून ठेवायच्या, शेळ्यांना मोकळ्या वातावरणात खेळायची सवय असते , बांधून ठेवल्यामुळे त्याचे दुष्परिणाम त्यांना जाणवू लागले. या सगळ्या गोष्टी शिकण्यात त्यांचे चार पाच वर्ष गेले.

राहुल खामकर यांना सतीश एडके हे पार्टनर म्हणून लाभले यातून या दोघा मित्रांनी मिळून एक्सेल ऍग्रो सर्व्हिस प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली.

हळूहळू मार्केटिंगची माहिती मिळत गेली. बाजारात कोणत्या शेळीला भाव जास्त आहे, मार्केटिंगपेक्षा शेळ्यांच्या वजनावर पैसे ठरतात अशा अनेक बारीकबारीक गोष्टी त्यांनी टिपून घेतल्या. त्यांनी त्यांच्या कंपनीत १४ जातींच्या शेळ्या सांभाळल्या होत्या. नंतर मार्केटिंगच्या दृष्टीने त्यांनी बाजारात बोअर जातीच्या शेळीला जास्त भाव आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी बोअर जातीच्या शेळ्यांची संख्या वाढवली. सुरवातीला २० शेळ्यांपासून त्यांनी हा त्यांचा व्यवसाय सुरू केला होता.

बोअर जातीचं ब्रीड निवडण्यामागे बरीच पॉझिटिव्ह कारणे होती, क्रॉस ब्रिडींगसाठी बोअर हि जात जगात एक नंबरला आहे. बोअर या ब्रीडचं रोजच वजन हे २५० ते ३०० ग्रॅम पर्यंत वाढत राहतं. वातावरणात हे ब्रीड तग धरू शकतं त्यामुळे या जातीच्या शेळ्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. बाजारपेठेचं चांगलं नॉलेज, मार्केटिंगचं तंत्र अशा सगळ्या गोष्टी त्यांनी माहिती करून घेतल्या.

चांगल्या मोठ्या शेडमध्ये शेळ्यांची चांगली व्यवस्था, वेळोवेळी चांगल्या दर्जाचा चारा तोही दिवसातून वेगवेगळ्या प्रकारचा, स्वच्छ पाणी अशा नीटनेटक्या व्यवस्थेतून त्यांनी शेळ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवली. शेळ्यांची जातीनुसार विभागणी, त्यांची देखभाल अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय चांगलाच वाढला.

यातून विक्रीतून त्यांना चांगला फायदा होऊ लागला, शेळी विक्रीतून बराच नफा त्यांना झाला, नंतर शेळ्यांच्या दुधातून लाखांचा नफा त्यांना मिळू लागला, शेतीत उपयुक्त असणाऱ्या लेंडीखताची मागणी आपल्याला ठाऊकच आहे, एक्सेल एग्रो फार्म मध्ये तयार होणाऱ्या लेंडीखतातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. हा इतका आर्थिक फायदा इतर शेतकऱ्यानाही मिळावा म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरु केलं.

या प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रभरातून शेतकरी त्यांच्या कडे शेळी पालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. शेतकऱ्यांना बोअर जातीचं ब्रीड विकून पुन्हा त्याची खरेदी करण्याची हमी त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात दिली जाते. १८ ते ३६ महिन्यांच्या करारावर ते शेतकऱ्यांना हे ब्रीड विकतात. शेतकऱ्यांनी कोणतं खाद्य वापरावं, शेळ्यांचे नियोजन कस असावं इथपासून ते थेट बाजारपेठेतल्या विक्रीपर्यंत ते शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणीत मार्गदर्शन करत असतात. विक्री करताना त्यांची अट असते कि त्यांनी जितकं वजन शैलीच सांगितलं आहे त्याच वजनी ब्रीडची ते खरेदी करतात.

शेळी पालनाच्या व्यवसायात नव्याने उतरणाऱ्या लोकांना ते पूर्णपणे सर्व्हिस देतात, त्यांच्या समस्यांवर उपाय काढून मार्गदर्शन करतात. सुरवातीपासून ते मार्केटिंग पर्यंतच सगळं मार्गदर्शन एक्सेल ऍग्रो कंपनी करते.

बोअर जातीच्या शेळ्यांच्या मटणाला बाजारपेठेत जास्त मागणी आहे. बोअर ब्रीड हे जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारं ब्रीड आहे. त्यामुळे या ब्रीडच्या उत्पादनावर जास्तीत जास्त भर देऊन त्यांनी कोटींची उलाढाल केली आहे. एक एकर जागेत ऑफिस ,शेड, गोडाऊन यांची योग्य अरेंजमेंट त्यांनी केली आहे.

२० शेळ्यांपासून सुरवात करून आज त्यांनी करोडो रुपयांची उलाढाल केली आहे, युवा शेतकऱ्यांनी बिनधास्त या व्यवसायात उतरावं अशी त्यांची इच्छा आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.