अडीच वर्षातली सेना खासदारांची वक्तव्य हेच सांगतात, की आमदारांपेक्षा जास्त नाराज खासदार आहेत
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत काही आमदार घेऊन केलेलं बंड अजून शमण्याचं नाव घेत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसोबत संवाद साधताना लोकांना भावनिक आवाहन केलं.
मी मुख्यमंत्री पदावर राहावं, अशी आपल्या आमदारांची इच्छा नसेल तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो!
त्यात शिंदे यांनी आपल्या सोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केलाय आणि अजूनही काही आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आमदारांबाबत चर्चा आणि गणितं तर मांडली जात आहेत, पण जर शिवसेनेचे खासदार ठाकरेंना सोडून गेले तर पक्षाची अवस्था अजून वाईट होऊ शकते.
सध्या सेनेकडे एकूण १८ खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभेत सेना आणि भाजपनं युती करुन निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना केंद्रात भाजपसोबत सत्तेतही सामील झाली होती.
मुख्यमंत्र्यांनी २२ तारखेला मातोश्रीवर खासदारांची एक बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेनेचे बहुतेक खासदार उपस्थित होते. त्यांनी ‘आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहोत’ अशी भूमिका घेतलीये खरं, पण शिंदेंसोबत गेलेल्या निष्ठावंत आमदारांनी सुद्धा याआधी अशी कितीतरी आश्वासनं दिली होती.
त्यामुळे खासदार आता खरंच काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे…
सध्या तरी सगळे खासदार मुंबईतच आहेत. ज्या प्रमाणे आमदारांनी महाविकास आघाडीत होत असलेल्या अडचणींमुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलय, त्याच अडचणी खासदारांना सुद्धा होत होत्या, खासदार सुद्धा महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर नाराज होते. त्यांची नाराजी वेळोवेळी समोर आलीये.
स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आम्हाला काम करू देत नाहीत, निधी मिळत नाही, पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवर लक्ष देत नाहीत, या आणि अशा बर्याच प्रकारच्या अडचणी आणि तक्रारी ह्या खासदारांनी सांगितल्या होत्या.
शिरूर, मावळ, रायगड या लोकसभा मतदार संघांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून जास्तच पेटलाय.
शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये पार्थ पवार आणि अजित पवार यांचे समर्थक विरुद्ध खासदार श्रीरंग बारणे, रायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे, असे संघर्ष सतत सुरू असतात.
शिवसेनेच्या या वर्षांनुवर्ष निवडून येणार्या लोकसभेच्या फिक्स जागा आहेत, पण आज त्यातल्या २ जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. ही सल तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असल्याचं, सांगितलं जातं.
या स्थानिक वादात पक्षांचे वरिष्ठ नेतेही लक्ष घालत नाहीत म्हणून हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय.
म्हणून आता हे खासदार सुद्धा आघाडीतल्या कुरबुरींना वैतागून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार की उद्धव ठाकरे यांच्या सोबतच थांबणार? हा मोठा प्रश्न आहे.
त्यासाठी आपण महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून ते कालच्या प्रकरणापर्यंत शिवसेनेच्या लोकसभेच्या खासदारांनी काय विधाने केली आहेत ते पाहू..
महाविकास आघाडी सरकारमधील आपली होत असलेली घुसमट व्यक्त करताना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील डिसेंबर २०२१ मध्ये नांदेड येथे बोलताना असं म्हणाले होते की,
“राज्यातील या आघाडीमध्ये आमचा ‘वापर करून’ घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.”
मावळचे खासदार श्रीरंग बारणे मार्च २०२२ ला जालन्याच्या दौर्यावर गेले असताना, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना संबोधून असं बोलले होते की,
“जालन्याचे राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवणार आहे.”
ऑगस्ट २०२१ मध्ये परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद झाला होता, तेव्हा खासदार संजय जाधव वक्तव्य केलं होतं की,
“वेळ आल्यावर माकडीनही आपल्या पिल्लांना पायाखाली घालते, एकदिवस आम्ही ही राष्ट्रवादीला पायाखाली घालू.”
मे २०२१ मध्ये निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूच्या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला होता. तेव्हा नगरचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महाविकास आघडीतल्या मोठ्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की,
“आमच्याच मतदारसंघात कामे होत असताना आम्हालाच निमंत्रण दिले जात नाही. आम्ही कोणतेही कार्यक्रम घेताना अधिकारी कोरोनाचे नियम पुढे करतात. मंत्र्यांच्या कार्यक्रमात मात्र कितीही गर्दी झाली, तरीही तेथे नियम कुठे जातात?
त्यामुळे हा भेदभाव नको. आमदार, खासदार किंवा मंत्री असो, नियम सर्वांना सारखेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेदभाव करू नये. या प्रकाराची तातडीने चाैकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत”
खासदार भावना गवळी यांना ईडीने आत्तापर्यंत ३ वेळा चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांनी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ बुधवारी २२ जून ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे, या पत्रात त्या म्हणतात की,
“आपल्या पक्षातले मावळे आमदार हिंदुत्व या मुद्यावर आपणास निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. हे सगळे शिवसेनेचे शिलेदार, हाडामांसाचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन आपण त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये, कठीण असला तरी हा निर्णय घ्यावा.”
शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी श्रीकांत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सध्याच्या भूमिकेबद्दल बोलण्यास नकार दिला परंतु ते असं म्हणाले की..
“काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करणं योग्य नव्हतं, शिवसेना आणि भाजप अशी युती व्हावी अशी इच्छा आहे आणि बाबा कधीही शिवसेना सोडणार नाहीत.”
असं सगळं होत असताना काही खासदार आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत असं सांगतायेत. त्या खासदारांची काही विधाने पाहूयात…
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत म्हणतात..
“शिवसेना ही आमदारांमुळे नाहीये तर शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे. हा शिवसैनिक अजून जिवंत आहे आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे, आम्ही सगळे खासदार मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, आम्ही कुठेही जाणार नाही”.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने बुधवारी सकाळी मातोश्रीवर जाण्यासाठी मुंबईत आले होते, तेव्हा ते म्हणाले,
“सर्व खासदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले आहेत. खासदारांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला त्या अनुषंगाने सर्व खासदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, मुख्यमंत्र्यांच्या भावना सर्व खासदारांनी ऐकून घेतल्या आहेत. आम्ही सर्व खासदार मुख्यमंत्र्यांसोबतच आहोत.”
ज्यावेळी उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून चालले होते, त्यावेळी खासदार विनायक राऊत २२ जूनला रात्री वर्षा बंगल्याच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले…
“महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचं महत्व कायम राहणार आहे ते कधीही कोणीही पुसून टाकू शकत नाही, जे आज उद्धव साहेबांना सोडून गेलेत. त्यांना नक्कीच पश्चाताप होईल. आमच्या आमदारांना ज्यांनी फसवून नेलंय त्यांना धडा शिकवला जाईल”
त्यामुळे सध्या काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला असला, तरी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवरची त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळं त्यांनी बंड पुकारलं, तर आधीच अडचणीत असणाऱ्या शिवसेनेचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो.
हे ही वाच भिडू:
- एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे..?
- धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?
- धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडे राहू शकतं? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे..?