आकडेवारीने सिद्ध झालाय २०१४ पासून पक्ष सोडून सगळ्यात जास्त आमदार भाजपमध्येच गेलेत

‘‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे….आपल्याला काहीही कमी पडणार नाही.”  एकनाथ शिंदे आपल्याबरोबर जेव्हा बंडखोर आमदार गुवाहाटीला घेऊन गेले होते तेव्हा आमदारांना धीर देण्याच्या भाषणात त्यांनी असा उल्लेख केला.  

महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टी होती हे काय त्या वेळीसुद्धा लपून राहिलं नव्हतं. एकनाथ शिंदे गटाने अजूनतरी काय भाजपमध्ये प्रवेश केला नाही मात्र बाकी पक्ष सोडणाऱ्या आमदारांनी महाशक्तीला जॉईन होत भाजपचीच वाट धरल्याचं दिसतं.

आज देशभर कुठेही पक्ष फुटला,आमदारांनी बंड केलं अशा बातम्या येतात त्यामध्ये भाजपचं नाव येतंच असतं. 

शुक्रवारीच मणिपूरमध्ये जनता दल (युनायटेड) च्या पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती तोडल्यानंतर या आमदारांनी जनता दलमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील जनता दलाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

त्यामुळं २०१४ पासून  भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदार आणि खासदारांची  संख्या आता २११ आहे. 

२०२१ पर्यंत इतर पक्ष सोडून आमदारांनी आणि खासदारांनी भारतीय जनात पक्ष जॉईन करण्याचा आकडा होता १७३ आणि त्यानंतरही आमदार आणि खासदार भाजपमध्ये प्रवेश करतच गेले.

भाजपने आपली पैसा, पॉवर, तपास एजेंसीजचा वापर करून या लोकप्रतिनिधींना आपल्याकडे वळवल्याचा आरोप नेहमी करतं मात्र भाजपने मात्र पक्ष वाढवण्याचा कार्यक्रम बिनदिक्कीतपणे चालू ठेवल्याचं दिसतं. याचकाळात भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या मात्र अवघी ६० एवढी आहे. म्हणजे पक्षात इनकमिंग जोरात चालू होतं मात्र आऊटगोईंग अत्यंत कमी. 

मात्र त्याचवेळी अगदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस सोडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक आहे. 

 २०१४ ते २०२१ या काळात काँग्रेसने सर्वाधिक आमदार आणि खासदार गमावले. 2014 ते 2021 पर्यंत 177 आणि या वर्षीच्या  गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी 20 आमदार काँग्रेसने गमावले आहेत. असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालाचा डेटा बघितल्यानंतर ही माहिती मिळते.

काँग्रेस सोडून गेलेले सर्वाधिक ७४ आमदार हे भाजपमध्ये गेल्याचीही माहिती समोर येते. त्यानंतर सर्वाधिक आमदार मायावतींच्या बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेले होते. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसमधून १७ आणि समाजवादी पक्षातून ९ आमदार भाजपमध्ये आले होते.

जोपर्यंत नितीश कुमार भाजपसोबत होते तोपर्यंत त्यांच्या पक्षातून केवळ दोनच आमदार भाजपात आले होते मात्र त्यांनी युती तोडल्यानंतर मात्र भाजपने त्यांचे राज्याबाहेरील आमदार ओढण्यास सुरवात केली आहे.

भाजपकडे सत्ता आहे, देशातील बहुतांश भागात भाजप स्ट्रॉंग त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यास उत्तम भविष्य असेल अशी कारणं देउन आमदार भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतात. मात्र भाजपात फक्त निवडणुकीपूर्वीच प्रवेश करतात किंवा आमदार निवडणुकांपूर्वीच पक्ष सोडतात असं नाही.

उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षातून राजीनामा दिलेल्या २२ आमदारांनी २०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडून सामूहिक राजीनामा दिला.या बंडाचे नेतृत्व तत्कालीन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले होते, जे पुढे राज्यसभा सदस्य आणि नंतर नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.

कर्नाटकात, २०१९ मध्ये काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या तत्कालीन सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांनी एचडी कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  आणि त्यानंतरच्या 2020 च्या पोटनिवडणुकीत 16 पैकी 13 बंडखोर आमदार भाजपचे उमेदवार म्हणून निवडून देखील आले होते. 

द हिंदूने एका दिलेल्या वृत्तानुसार भाजपने गेल्या दशकात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ८३० बाहेरीच्या पक्षातून आलेले उमेदवार उभे केले आहेत आणि यातील  44 टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी झाले होते. 

दुसरीकडे असाही दिसून येतं की काँग्रेसमधून गेल्या 10 वर्षांत 806 उमेदवार पक्ष सोडून गेले आणि यातील 33 टक्के पक्षांतर करणाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. यातील बहुतांश पक्षांतर करणाऱ्यांना भाजपने उभे केले होते ज्यात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १३० त्यानंतर कर्नाटकमध्ये ८१ लोकप्रतिनिधी  होते. 

म्हणजे थोडक्यात लाइन सांगायची तर आमदार खासदारांची पक्षांतर जोरात होतायेत. भाजपात सगळ्यात जास्त पक्ष सोडणारे प्रवेश करतायेत आणि त्यातील मोठ्या संख्येने निवडूनही येत आहेत. आणि हा काँग्रेसमधून सर्वात जास्त आमदार खासदार पक्ष सोडून जात आहेत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.