ऑक्सिजन आणि कोरोनाची औषधं सप्लाय करणारा फ्रॉड आहे का हे कसं चेक करायचं ?
भारतात सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. रोज अनेक लोकं मृत्युमुखी पडत आहे तर काही या संकटाशी लढत आहे. भारताची आरोग्य यंत्रणा या महामारीचा नेटाने सामना करत आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडू न देणे याबाबत प्रशासन वेगाने हालचाली करत आहे.
भारतात आधीच ऑक्सिजनचा तुडवा निर्माण झाल्याने परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागत आहे. मात्र काही ठिकाणी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.
आज जिथं बघेल तिथं लोक ऑक्सिजन, कोरोना औषध शोधण्यात बिझी आहेत. आपली जवळची व्यक्ती जगवण्यासाठी लागेल ती रक्कम देण्यासाठी कित्येकजण तयार आहेत.
अशा या भयंकर संकटात सुद्धा ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार केला जातोय. अशी अनेक लोकं आहेत जी सध्या आपल्या आरोग्य यंत्रणेवर अशा प्रकारे ऑक्सिजनची अडवणूक करून आरोग्य यंत्रणेवर ताण आणू पाहत आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक लोकं ऑक्सिजन आणि औषधांची सोय असल्याचे मेसेज फिरवत आहेत. मात्र यातील काही सप्लायर अगोदर ग्राहकांकडून पैसे घेतात आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा मात्र करत नाही, यामुळे सामान्य लोकांची प्रचंड लूट केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
सप्लायर्सला आगाऊ पैसे दिल्याने अनेक लोकं फसवणुकीस बळी पडले आहेत आणि परिणामी रुग्णांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीवर उपचार म्हणून ऑक्सिजन सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे, बऱ्याच ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर न पोहचल्यामुळे रुग्ण दगावले सुद्धा आहेत. यात मधेच ऑक्सिजन सिलींडर चोरणाऱ्यांचं आणि सामान्य जनतेला फसवणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
सोशल मीडियावर ग्राहकांच्या लुटीसाठी अनेक फ्रॉड मेसेज फिरत असतात. कुठलीही खातरजमा न केल्यामुळे आणि आगाऊ रक्कम दिल्यामुळे ग्राहकांची होणारी आर्थिक फसवणूक या काळात गंभीर बाब आहे. नजीकच्या दवाखान्यात आणि आरोग्य केंद्रात सातत्याने चौकशी करत राहा.
सर्वसामान्य लोकांनी या फसवणुकीस बळी पडू नये म्हणून आपण काही गोष्टी आवर्जून लक्षात घेऊन पाळल्या पाहिजे. त्यापैकी महत्वाच्या गोष्टी नमूद करत आहोत-
१) सर्वप्रथम ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास कोणत्याही प्रकारचे आगाऊ पैसे देऊ नका त्याचबरोबर कुठलेही बिलही पाठवू नका.
२) तुमच्यापर्यंत आलेल्या क्रमांकावर फोन करून पत्ता विचारून घ्या. खात्रीलायक माहिती गोळा करा.
३) खात्री पटल्यानंतरचं दिलेल्या पत्त्यावर जा. आपल्या नावावर असलेले ऑक्सिजन सिलेंडर किंवा औषध स्वतःच्या ताब्यात घ्या आणि नंतरच पैसे देऊ करा.
४) जर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या माणसाने त्याचा पॅनकार्ड क्रमांक किंवा जीएसटी क्रमांकाचा पुरावा दिला असेल तर तुम्ही खात्रीशीरपणे त्याला टोकन रक्कम देण्याचा विचार करू शकता.
या गोष्टींचा विचार करून होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवू शकतो. अनधिकृतरित्या ऑक्सिजन सिलिंडरची किंमत महाग करून विकली जाण्याचं प्रमाणंही मोठ्या प्रमाणावर आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या सगळ्याच मेसेजवर सरसकट विश्वास ठेवू नका, दिलेल्या क्रमांकाची खात्रीलायक माहिती घेऊनच त्यांच्याशी थेट संपर्क साधा. काळाबाजार करताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार करून इतर लोकांची होणारी फसवणूक आपण टाळू शकतो.
हे हि वाच भिडू :
- कोर्टानं म्हटल्याप्रमाणं, खरचं निवडणूक आयोगामूळं कोरोना वाढलायं का? काय सांगते आकडेवारी?
- कोरोनाच्या भितीत या चार डॉक्टरांनी सोशल मिडीयावरून खूप आधार दिला…
- कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्वाचा ठरलेला ‘मेडिकल ऑक्सिजन’ नेमका कसा तयार करतात?