कपाटापासून रॉकेटपर्यंत गोदरेजने भारताला या ‘७’ गोष्टी दिल्या…

काल भारतातील १२० वर्षापेक्षा जुनी कंपनी असलेल्या गोदरेजने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना एक विडिओ बनवला, त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला. नेटकऱ्यांकडून #Godrejforindia असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे भारतासाठी गोदरेज किती महत्वाचं हे दिसून येते.

आर्देशिर गोदरेज यांनी १८९७ साली या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत भारतात अनेक स्वदेशी वस्तू तयार करण्यात गोदरेज अग्रस्थानी आहे. मात्र गोदरेजचे अशी देखील काही उत्पादन किंवा काम आहेत जे देशासाठी अत्यंत महत्वाची आहेत. यात अगदी घरातील कपाटापासून ते रॉकेट पर्यंत अशा ७ गोष्टींचा समावेश आहे.

१) गोदरेज कपाट : 

साधारण १९२३ च्या काळात गोदरेजचा कुलूप बनवण्याचा आणि साबण बनवण्याचा व्यवसाय स्थिरस्थावर झाला होता. त्यावेळी आर्देशिर दुसरे एखादे उत्पादन बनवण्याच्या मागे लागले होते. त्यावेळी जी कापट असायची ती लाकडाची होती. त्यांना आतासारखा जसा कपाटाचा आकार आहे तसा आकार देखील नव्हता.

विशेषतः त्यात धूळ खूप बसायची आणि त्या कपाटांवर वातावरणाचा परिणाम देखील व्हायचा. सोबतच त्यावेळी मुंबईत किंवा इतर ठिकाणी देखील बँक लॉकर्सची सुविधा देखील नव्हती. आर्देशिर यांनी यावर उपाय म्हणून यांना स्टीलच्या कपाटाची आयडिया सुचली. त्यांनी त्यावर काम करून एका स्टीलशीटला १६ वेळा मोल्ड करून एक कपाट बनवलं. त्याला डबल प्लेटेड दरवाजे लावले.

त्याचं वजन पण जास्त असायचं. उचलायला चार माणसं तर आरामात लागायची. सुरक्षित आणि कोणत्याही हवामानाचा परिणाम होणार नाही अशी त्याची जाहिरात केली. या कपाटांना तुफ्फान प्रतिसाद मिळाला. हळू हळू भारतात कपाट म्हणजे गोदरेज अशी ओळख मिळाली. लग्नात भेट देण्याची प्रथा सुरु झाली. पण त्यानंतर भारताला कायमच एक कापट मिळालं.

आज देखील भारतीय बाजारात या कपाटांना पहिली पसंती म्हणून मागणी आहे.

२) बॅलेट बॉक्स : 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १-२ वर्षातच निवडणुकांचे वेध लागायला सुरुवात झाली होती. १९५१ साली निवडणूक होणे अपेक्षित होते, पण त्याच्या खूप आधी पासून निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली होती. याच तयारीचा एक भाग म्हणजे मतपत्रिका टाकण्यासाठी आवश्यक असणारी बॅलेट बॉक्स.

त्यावेळी गोदरेजकडे कपाट बनवण्याचा अनुभव असल्यामुळे हि जबाबदारी गोदरेजकडेच द्यायचं ठरलं. त्यावेळी मुंबईमध्ये याचा प्लांट सुरु करण्यात आला. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशासाठी गोष्ट बनवणे ही तशी आव्हानात्मक जबाबदारी होती. पण गोदरेजने हे काम दिवस रात्र राबून विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. त्यावेळी १७ लाख बॅलेट बॉक्स तयार करण्यात आले.

गोदरेजचे के. आर. ठाणेवाला सांगतात,

मला आठवत आहे आम्ही प्रत्येक दिवसाला २२ हजार बॅलेट बॉक्स तयार करत होतो.

३) पहिला स्वदेशी टाईपरायटर : 

१९५० च्या दशकापर्यंत भारतात टाईपरायटर अमेरिकेमधून आयात केले जात होते. पण १९४८ साली गोदरेजने स्वदेशी टाईपरायटर बनवण्यासाठी काम सुरु केलं. पण त्याच वेळी गोदरेजला बॅलेट बॉक्स बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे हे काम काही काळासाठी मागे ठेवण्यात आले.

पुढे १९५५ साली टाईपरायटरसाठीचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. त्यावर्षी पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते याच उद्घाटन देखील करण्यात आले. त्यावेळी भारतात बनवलेला तो पहिलाच टाईपरायटर होता. पुढे अनेक वर्ष भारतीयांनी तो डोक्यावर घेतला होता.

२१ व्या शतकात कॉम्पुटरचा वापर वाढल्यामुळे टाईपरायटर बनवणाऱ्या कंपन्यांनी आपले उत्पादन बंद केले. मात्र अगदी २०१९ पर्यंत गोदरेजने टाईपरायटरचे उत्पादन बंद केलं नव्हतं. आजही ५०० युनिट स्टॉकला असल्याचं सांगण्यात येत.

४) भारताच्या मुन मिशनमध्ये सहभाग : 

२००८ मध्ये भारताने चांद्रयान – १ अर्थात कोणत्याही मनुष्याशिवाय मिशन मुन ठेवले होते. असे मिशन ठेवणं भारत ५ वा देश ठरला होता. भारताच्या याच मिशनला गोदरेजने सर्वोतोपरी सभाग घेऊन सहकार्य केले होते. गोदरेजमुळे इसरोचे मिशनमधील बरेच काम हलके झाले होते.

गोदरेज एअरस्पेस या आपल्या कंपनीतील इंजिनिर्सना इसरोच्या मदतीसाठी पाठवले होते. यात त्यांचं प्रमुख काम होतं,  लॉन्च व्हेइकल्सला बिल्ड करणं आणि मिशनसाठी लुनार ऑर्बिटर.

५) भारताच्या मिशन मंगळसाठी सहकार्य : 

इसरोसोबत मागील ३० वर्षांपासून असलेल्या पार्टनरशिपमध्ये गोदरेजने मिशन मुन सोबतच मिशन मंगळसाठी सहकार्य केले होते. आपल्या वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे गोदरेजने Polar Satellite Launch Vehicle साठी मदत केली होती.

तसेच PSLV आणि GSLV रॉकेट्स साठी लागणारे liquid propulsion engines तयार करण्याचे काम देखील केले होते. 

६) जगातील सर्वात मोठ रिऍक्टर :

जगातील सर्वात मोठी Continuous Catalytic Regeneration (CCR) रिऍक्टर बनवण्याचं काम गोदरेजने २०१६ साली करून दाखवलं आहे. हे रिऍक्टर ९५ मीटर उंच असं आहे. आणि याच वैशिट्य म्हणजे कुतुबमिनार पेक्षा २२ मीटर लांब असा दावा करण्यात येत आहे. 

Godrej CCR Reactor

७०३ मॅट्रिक टन वजनाचे हे रिऍक्टर स्पेस शटलच्या ९ पट जास्त वजनाचं आहे .

७) पिनाका रॉकेट : 

गतवर्षी गोदरेज कडून देशासाठी ऍटोमॅटेड पिनाक रॉकेट बनवण्याची फॅक्टरी चंद्रपूरमध्ये सुरु केली आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले होते.

pinaka-with-pod-1-web

उच्च दर्जाचे, प्रगत सुरक्षा साधन असलेले रॉकेट्स तयार करण्यासाठी इथं काम केलं जातं. अशा या ७ वस्तूंमुळे जगभरात आज भारताची एक प्रतिमा तयार झाली आहे, ज्यात गोदरेजच योगदान आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.