स्टिव्ह जॉब्स गेला आणि ॲप्पलचं इनोव्हेशन संपल…
बहुचर्चित ॲप्पलचा आयफोन 14 लॉन्च झाला. आत्ता यात काय असणार तर मागच्या वेळी सांगितलेलं तेच असणार. जरा कुठेतरी काटछाट करून जुन्या बाटलीत जूनीचं दारू देण्याचा प्रकार सुरूय. आत्ता ज्यांना ॲप्पलवर मनापासून प्रेम आहे आणि नवा ॲप्पल घेवून लेटेस्ट असल्याचं दाखवायचं आहे, ते आम्हाला शहाणपण शिकवतील पण एका गोष्ट सर्वांनाच मान्य करायला पाहीजे..
ती म्हणजे स्टीव्ह जॉब्स गेला आणि ॲप्पलचं इनोव्हेशन गेलं..
कोण होता स्टीव्ह जॉब्स..
स्टीव्हचा जन्म १९५५ मध्ये कॅलिफोर्नियात झाला. त्यांची आई अविवाहित विद्यार्थिनी होती, ज्यामुळे त्यांच्या आईने स्टीव्हला कुठल्यातरी चांगल्या कुटुंबाला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. त्यांना पॉल आणि क्लाराने दत्तक घेतले.
पॉल एक मॅकॅनिक होते तर क्लारा एक अकाउंटंट. दत्तक घेण्याआधी त्यांनी जॉब्सच्या आईला आश्वासन दिले होते कि, ते जॉब्सचे शिक्षण पूर्ण करतील. जॉब्सला दत्तक घेतल्यानंतर पॉल आणि क्लारा १९६१ मध्ये कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्युव्ह मध्ये राहायला आले.
इथे पॉलने आपल्या उदरनिर्वाहासाठी एक गरज सुरु केले. जॉब्सला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत छेडछाड करायला आवडायचे. त्याला शाळेत जायला कधीच आवडले नाही. त्याला आपल्या वर्गातल्या पोरांची मैत्री करायला सुद्धा अवघड जायचे. तो नेहमी वर्गात एकटाच बसलेला असायचा.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑरगॉनच्या रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान हे खूप महागडे कॉलेज होते. ज्याचे फीज भरणं जॉब्सच्या कुटुंबियांना अवघड जाऊ लागलं. त्यामुळे स्टीव्हने कॉलेज सोडायचा निर्णय घेतला. ते फक्त कॉलेजमध्ये टेलिग्राफीचा क्लास अटेंड करायचे.
यावेळी स्टीव्हस जवळ अजिबात पैसे नसायचे, ते आपल्या मित्राच्या रूममध्ये फरशीवर झोपायचे. दोन वेळच्या अन्नासाठी त्यांनी कोकच्या बाटल्या विकल्या. रविवारी ते तिथल्या कृष्णाच्या मंदिरात जायचे जिथं त्यांना पोट भरून जेवायला मिळायचे.
१९७२ मध्ये स्टीव्ह अटारी नावाच्या व्हिडिओ गेम डेव्हलपिंग कंपनीमध्ये काम करायला लागले. पण त्यांचं इथंही मन लागली नाही, ज्यानंतर त्यांनी इथं काही पैसे जमवले आणि भारतात गेले. जिथं ते ७ महिने राहिले. आणि नंतर अमेरिकेला परत आले. आणि तिथं जाऊन मात्र त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.
१९७६ मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून गॅरेजमध्ये कम्प्युटरवर काम केले. त्यांनी एक कंपनी सुरु केली, ज्याचं नाव त्यांनी ॲपल ठेवलं. त्यावेळी ते फक्त २१ वर्षाचे होते. कंपनी वेगाने नफा कमवत होती. १९८० मध्ये ती एक प्रसिद्ध कंपनी बनली. १० वर्षात कंपनीची उलाढाल २ बिलियन डॉलरची कंपनी बनली. यात ४००० लोक काम करायला लागली.
ॲपलची टेक्निक वापरून दुसऱ्या कंपन्यांनी सुद्धा कम्प्युटर विकायला सुरुवात केली. ज्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. यासाठी स्टीव्हला जबाबदार धरलं गेलं. ज्यामूळे त्याला आपल्या कंपनीतून राजीनामा द्यावा लागला.
पण तरीही स्टीव्हने हार मानली नाही. त्याने ॲपल मधून बाहेर पडत “नेक्स्ट कम्प्युटर” नावाची कंपनी सुरु केली. नेक्स्टला नंतर सॉफ्टवेअर कंपनीत बदलण्यात आलं. १९८६ मध्ये स्टीव्हने १० मिलियन यूएस डॉलरमध्ये एक ग्राफिक कंपनी सुरु केली. त्याच नाव पिक्सार ठेवलं. त्यानंतर १९९६ मध्ये ॲपलने नेक्स्टला खरेदी करायचं ठरवलं आणि स्टीव्हची पुन्हा ॲपलमध्ये वापसी झाली. त्यांनी पुन्हा एकदा कंपनीला नवीन उंचीवर नेलं.
२००७ मध्ये ॲपलने पहिला मोबाईल फोन लॉन्च केला. ज्याने मोबाईलच्या दुनियेत क्रांती आणली. आणि आज कंपनीचा सक्सेस आपण सगळेच पाहतोय. पण आत्ता ते इनोव्हेशन होत नाही हे देखील खरं..!!!
हे ही वाच भिडू :
- १७ वर्षांनंतर स्टीव्ह बकनरने चुकीच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकरची माफी मागितली होती
- चार मोबाईल, एक कंपनी, एक मालक याला म्हणतात बिझनेस !
- स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिला आयपॉड चक्क फिशटॅंक मध्ये फेकून दिला होता..