भारताचा स्टिंग ऑपरेशन सम्राट बलात्काराच्या आरोपामुळे स्वतःच गोत्यात आला होता

वर्ष २००० नवीन सहस्त्रक उजाडलं होतं. इंडिया शायनिंग करत होता. जागतिकीकरणाच्या झाडाला फळ लागली होती.ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत केबल टीव्हीचा जमाना सुरु झाला होता.  इंजिनियरिंगचा मार्केट जोरात होत. विशेषतः कॉम्युटर इंजिनियरिंगचा भाव धरला होता. टीसीएस, इन्फोसिस कॅम्पस इंटरव्यू वगैरे वगैरे चर्चा सुरु होत्या.

अणुबॉम्ब चाचणी झाली होती, आपण कारगिल युद्ध जिंकलं होतं. भारताच्या विकासाने स्पीड पकडला होता. अब्दुल कलाम म्हणतात तस पुढच्या वीस वर्षात आपण जगातली महासत्ता बनणार होतो.

सगळं कस एकदम भारी भारी चालू होतं. काय म्हणतात त्याला ? फील गुड फॅक्टर. इथं काय वाईट होऊ शकेल असं वाटतच नव्हतं. अशातच एक बॉम्ब येऊन पडला. हा काही पाकिस्तानी बॉम्ब नव्हता. हा आपल्या देशातलाच बॉम्ब होता. 

भारतीय क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगचा बॉम्ब.

एवढे दिवस घरगुती चर्चा व्हायच्या, मॅच हारली कि लोक शिव्या घालायची. खेळाडू पैशांसाठी खेळतात म्हणून नाव ठेवली जायची. मुंबई मध्ये बुकी असतात ते सगळ्या मॅच फिक्स करत असतात असं ऐकून होतो पण ते खरं असेल यावर १००% खात्री नव्हती. कुठं ना कुठं आपला देशाभिमान, चांगुल पणावरचा विश्वास वगैरे वगैरे वर जग चालू होतं.

झटक्यात ते फुटलं. आधी वाटलं फक्त आरोप असतील पण तस नव्हतं. माजी खेळाडू मनोज प्रभाकरने छुप्या कॅमेऱ्यासमोर इतर प्लेयर्सच्या मुलाखती घेतलेल्या. यात सुनील गावस्कर ते संजय मांजरेकर, रवी शास्त्री ते सिद्धू सगळे दिसत होते. भारताच्या क्रिकेटमधील सगळ्या काळ्या बाजूची यथासांग चर्चा सुरु होती. कोण कशी फिक्सिंग करतो याच्या खुलेआम चर्चा झाल्या.

या टेप नव्यानेच सुरु झालेल्या न्यूज चॅनेलने रिपीट मोडवर दाखवल्या. क्रिकेट वरचा भरवसा कायमचा उठला. फिक्सिंगची सखोल चौकशी सुरु झाली. कपिल देव भर टीव्हीवर रडला. अझरुद्दीन, मोंगिया, जडेजा हि मंडळी गोत्यात आली. 

असं बरंच काय काय घडून गेलं. पण मेन प्रश्न होता कि हे सगळं घडवून कोण आणलं होतं ?

पुराव्यासकट भारतीय क्रिकेटला नागडं केलं होतं एका तहेलका नावाच्या चॅनेलन आणि त्या चॅनेलच्या मालकानं.

नाव तरुण तेजपाल.

तरुण तेजपाल म्हणजे भारताच्या पत्रकारितेतील सगळ्यात सुप्रसिद्ध नाव. हा मूळचा पंजाबचा. त्याचे वडील मिलिटरीमध्ये ऑफिसर होते. तरुणच शिक्षण पंजाब विद्यापीठात झालं. वडिलांप्रमाणे आर्मीत वगैरे जायचा त्याचा काही मनसुबा नव्हता. चंदीगड मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री घेतली आणि लगेचच निघाला पत्रकार व्हायला.

सुरवातीला सगळ्या जगासारखं नॉर्मल वार्ताहर म्हणून काम केलं. चंदीगड मध्ये इंडियन एक्स्प्रेस साठी काम करायचा. इंग्लिश चांगलं होतं, खटपट्या होता. कुठं पण शिरून बातमी शोधून काढायचा. तरुण तेजपाल हे नाव गाजू लागलं. त्याला मग दिल्लीला बोलावून घेण्यात आलं. पुढं १९८४ साली इंडिया टुडे मध्ये लागला. दहा वर्षांनी फायनान्शियल एक्स्प्रेस.

१९९५ मध्ये भारतात एक नवीन मासिक लॉन्च झालं, आउट लूक. तरुण तेजपालला त्याचा पहिला कार्यकारी संपादक बनवण्यात आलं होतं. 

स्वतःची एक पब्लिशिंग कंपनी देखील सुरु केली. इंडिया इंक नावाची. या कंपनीतर्फे प्रकाशित केलेल्या अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाला जगातला सर्वोच्च समजला जाणारा बुकर पुरस्कार देखील मिळाला. इथं पर्यंत त्याची गाडी सुसाट होती. पण वेगाची आवड असलेल्या तरुण तेजपालला वेगळं काही तरी करून दाखवायचं होतं.

आमच्या ऑफिस मधला एक भिडू म्हणतो तस त्याला स्वतःची आयडेंटिटी तयार करायची होती.

अखेर सुखाने चाललेल्या आऊटलूकचा राजीनामा दिला आणि सुरु केलं. काय? तर स्वतःच वेबपोर्टल. नाव दिल तहेलका.

एखाद्या जुन्या सस्पेन्स सिनेमा सारखं नाव असलेली हि वेबसाईट तरुण तेजपालने म्हणे फॅशन, बॉलिवूड, पेज ३ मध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारितेला बाहेर काढण्यासाठी सुरु केली होती. खरं तर अजून भारतातलं इंटरनेट अजून पाळण्यात होतं. बाकीच्या पत्रकारांनी तेजपालला वेड्यात काढलं. सुखाने चाललेली नोकरी सोडून हे काय अजब सुरु केलाय म्हणून जाईल तिथं त्याची चेष्टा केली जायची.

पण तरुण तेजपालला ठाऊक होत येणार युग हे कॉम्प्युटरचा आहे. काही वर्षांनी प्रत्येक जण इंटरनेटवर जगणार आहे. प्रिंट पेपर रद्दी साठी विकत घेतले जातील. याच कॉन्फिडन्सने त्याने तहेलका सुरु केला.

तहेलका करायचा झाला तर धमाका तर पाहिजेच. हाच तो भारतीय मॅच फिक्सिंगच्या स्टिंग ऑपरेशनचा धमाका.

तरुण तेजपाल आणि तहेलका हे नाव पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आलं. पुढं त्यांनी ऑपरेशन वेस्ट एन्ड नावाचं स्टिंग ऑपरेशन केलं. यात संरक्षण मंत्रालयात चालणाऱ्या लष्करी डीलचा पर्दा फाश करण्यात आला होता.

तहेलकाने या स्टिंगला नाव दिले होते ऑपरेश वेस्ट एन्ड.

या स्टिंग साठी तहेलकाने आपल्या पत्रकारांना लंडन मधील वेस्ट एन्ड नावाच्या काल्पनिक कंपनीचे प्रतिनिधी आहे असं दाखवून एक लष्करी डील करण्यासाठी पाठवून दिलं. या छुप्या पत्रकारांनी थर्मल कॅमेरे आणि इतर उपकरणे लष्कराला विकायचे आहेत असं दाखवून वेगवेगळया अधिकाऱ्यांची आणि पुढाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेलं बोलणं, पैशांची देवाणघेवाण रेकॉर्ड केली. त्याच्या सीडीज रिलीज केल्या.

यात सर्वात महत्वाचं नाव होतं भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण. त्यांच्या खालोखाल सापडलेलं दुसरं मोठं नाव म्हणजे जया जेटली.

तेव्हा वाजपेयीचं एनडीए सरकार सत्तेत होत. संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या एकदम जवळच्या सहकारी जया जेटली देखील पैशांच्या डील बद्दल दिसत होत्या तर दुसरीकडे खुद्द पंतप्रधानांच्या पक्षाचा अध्यक्ष दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना पूर्ण भारताला दिसला.

तहेलकाने केलेला हा दुसरा धमाका. शोध पत्रकारिता काय याची चुणूक त्याने भारताला दाखवली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडियाला त्याने स्टिंग ऑपरेशनचा नाद लावून दिला. तिथून पुढं कोण पण आपल्या शर्टला छोटा कॅमेरा लपवून स्टिंग करायला नेतेमंडळींकडे जाऊ लागला. कधी कोण सापडलं, तर कधी कोण याचा वापर पैशे कमवायला केलं.

तहेलकाचे धमाके मात्र तिथून पुढे दहा वर्ष चालले. कधी गुजरात दंगली तर कधी मणिपूर फेक एन्काउंटर , तर कधी टू जी स्कॅम घोटाळा. तरुण तेजपालचा तहेलका जगभरात गाजत होता. मधल्या काळात त्याने तहेलकाला प्रिंट मध्ये आणलं. सुरवात टॅब्लॉइट पासून केली पुढं साप्ताहिक बनलं.

याचा अर्थ तो पॉप्युलर झाला होता असं नाही. त्याने आपले कित्येक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्यांची स्टिंग ऑपरेशनची पद्धत तर अतिशय वादग्रस्त बनली होती. पत्रकारितेतील एथिक्स तर तहेलकाने कधीच गुंडाळून ठेवले होते. त्यात त्यांच्यावर काँग्रेसला मदत करत असल्याचा देखील आरोप केला जात होता. 

तहेलकाची स्टिंग ऑपरेशन ज्या प्रमाणात भाजप आणि इतरांच्या विरोधात खुंखार पणे काम करायची तीच काँग्रेस समोर आल्यावर लडिवाळ व्हायची. काँग्रेस सरकार विरुद्ध त्यांनी काही रिपोर्टींग केलं मात्र ते निरुपद्रवी असल्याचं बोललं गेलं. त्याच्या कंपनीत कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वागवलं जात नाही, पगार तटवले जातात अशा चर्चा मीठमसाले लावून पत्रकारितेच्या वर्तुळात सांगितल्या जात होत्या.

पण सुस्साट सुटलेल्या तरुण तेजपालला याकडे लक्ष देण्यास वेळ कुठे होता.

२००१ साली बिझनेस विकने आशियातील सर्वात भावी पॉवरफुल व्यक्तींमध्ये त्याचा समावेश केला. मध्यन्तरी त्याने एक कादंबरी लिहिली त्यावरही पुरस्कारांची भडीमार झाली. २०११ साली जी क्यू मासिकाने तेजपालला आपल्या कव्हरवर संधी दिली आणि मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला.

एकंदरीत तरुण तेजपालची पाची बोटे तुपात होती. पण जेवढ्या वेगात तुम्ही यशाच्या शिखरावर जाता तेवढ्याच वेगात तुम्हाला खाली खेचायचे नियोजन कुठे तरी सुरु असते. तेजपालच्या बाबतीत देखील तसेच झालं. त्याच्या तहेलका या कंपनीच्या मालकीवरून वाद सुरु झाले. तहेलकाचे काही शेअर्स तृणमूल  काँग्रेसच्या नेत्याकडे आहेत आणि काही शेअर्स हे एका फ्रॉड कंपनीकडे आहेत अशी चर्चा झाली.

देशभरात इंडिया अगेन्स्ट करप्शनचा दंगा चालू होता आणि धमाका करणारी तहेलका तस बघितलं तर शांतच होती.

७ नोव्हेंबर २०१३. गोव्याच्या एका आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तहेलका मासिकाचा थिंक फेस्ट कार्यक्रम सुरु होता. देशभरातील मोठमोठे सेलिब्रिटी नेते मंडळी या कार्यक्रमात सहभागी होते. तरुण तेजपाल यजमानाच्या दिमाखात सगळीकडे वावरत होता. त्याच्या राज्याचा तो अनभिषिक्त सम्राटच होता.

पण त्याच थिंक फेस्ट मध्ये एक घटना घडली. मध्यरात्रीची वेळ होती. तहेलकाची एक तरुण पत्रकार आपल्या गेस्टला त्यांच्या रूम पर्यंत सोडायला गेली. तिथून परतताना तिला लिफ्ट मध्ये तरुण तेजपाल दिसले. त्या लिफ्ट मध्ये ते दोघेच होते. ती सांगते कि अचानक तेजपाल यांनी लिफ्टची अशी काही बटणे दाबली कि ती लिफ्ट मध्येच अडकून पडली. या मधल्या काळात तरुण तेजपाल यांनी माझ्या सोबत गैरवर्तन केलं असा तिने दावा केला.

कशीबशी कपडे सावरत ती तिथून बाहेर पडली. पुढे दुसऱ्या दिवशी पण सेम हाच प्रकार घडला. त्या पत्रकार तरुणीची तेजपाल यांच्या मुलीशी ओळख होती. तिने तिच्या जवळ तक्रार केली तर तेजपाल यांची मुलगी म्हणाली की मी माझ्या वडिलांना लहानपणी देखील एका महिलेबरोबर असं करताना पाहिलंय.

त्या पीडित तरुणीने मग तहेलकाच्या कार्यकारी संपादकांकडे कम्प्लेंट केली. पुढे हे प्रकरण गोवा पोलिसांकडे गेलं. तरुण तेजपालला अटक झाली. योगयोग असा कि तेव्हा गोव्यात भाजपचं सरकार होतं. तेजपालच्या समर्थकांनी आरोप केला की त्याच्यावर झालेले आरोप हा सगळा एक बनाव होता. भाजप विरुद्ध तहेलका स्टिंग ऑपरेशन करते म्हणून त्याला अडकवण्यात आलंय.

तरुण तेजपालने तर आपल्या कडून चूक मान्य करून त्या पीडितेला काही भरपाई देण्याची ऑफर दिली आहे असं देखील बोललं गेलं.

गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. बराच काळ तो गोव्याच्या कारागृहात राहिला. पुढे त्याला जामीन मिळाला. पण त्याच्या सुस्साट पत्रकारितेच्या करियरला मोठा ब्रेकचं लागला. त्याच्यावरील केस पासून तहेलका गंडली ती अजूनही त्याच अवस्थेत आहे.

तरुण तेजपाल वरील केस जवळपास नऊ वर्षे चालली. अनेक सुनावण्या पुरावे आरोप प्रत्यारोप याच्या नंतर आज तो निर्दोष सुटला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.