मुंबई आणि कोलकात्यात स्टोनमॅनच्या एकाच पॅटर्नच्या हत्येने पोलीस यंत्रणा कामाला लावली होती.
भारतात असे अनेक गुन्हे घडून गेलेत ज्यात आरोपी सापडले. काही गुन्हे करूनही निर्दोष सुटले. काही कायमचे फरार झाले. काही केसेसमध्ये तर सगळ्या चौकश्या, शोध लावूनही शेवट्पर्यंत आरोपी सापडले नाहीत. केसेसच्या केसेस पेंडिंग पडून आहेत. आजची क्राईम स्टोरी हि वेगळी आहे. या स्टोरीमध्ये भारतातल्या दोन महत्वाच्या शहरांमध्ये स्टोनमॅनने जो आतंक पसरवला होता जो सगळ्यात घातक होता.
मुंबईमध्ये आणि कोलकातामध्ये जे भयंकर हत्याकांड घडलं होतं त्या प्रकारचं विचित्र खुनी सत्र जगात कुठं घडलं नसेल. या खूनसत्रातला आरोपी कोण होता, त्याचा चेहरा कसा होता, इतके सारे खून करण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे शेवट्पर्यंत कुणाला सांगता आलं नाही. तर वळूया मेन स्टोरीकडं नक्की काय कांड घडलं होतं.
मुंबईमध्ये १९८५ ते १९८९ या चार वर्षाच्या काळात रस्त्याच्या कडेला प्रेतं मिळतात. सुरवातीला एक प्रेत मिळत ज्याचा चेहरा इतका विद्रुप झालेला असतो कि त्याची ओळख सुद्धा पटत नसते. पोलीस अंदाज लावतात कि जवळपास २५-३० किलो वजनाचा दगड डोक्यात घालून हत्या केली गेलेली आहे.
पोलीस चौकशी सुरु ठेवतात. पण काही दिवसांनी अजून एक सेम तशीच हत्या घडलेली दिसते. ज्यात डोक्यात दगड घालून हत्या केलेली असते आणि तीही रस्त्याच्या कडेलाच केलेली असते. पोलीस पहिल्या हत्येशी या प्रेताचा संबंध जोडू पाहत असतात तोच अजून एक घटना घडते यातही तोच हत्येचा पॅटर्न असतो.
आता मात्र मुंबई पोलीस हे प्रकरण सिरियसली घेतं आणि वेगाने तपस सुरु करतं. पण हा आरोपी काही केल्या सापडत नसतो.
या आरोपीचं शस्त्र हे २५-३० किलो वजनाचा दगड असतो आणि तो फक्त रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या किंवा भिकारी लोकांची हत्या करत असतो असा अंदाज पोलीस लावतात.
पण पोलिसांना आरोपी काहीही करून सापडत नाही.
या आरोपीने चार वर्षात मुंबईत एकूण २६ खून घडवून आणले पोलीस रेकॉर्डवर हे खून १३च आहेत म्हणून नोंद आहे. यात पोलिसांनी तो सायको किलर असल्याचं सांगितलं. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आणि भिकाऱ्यांना पोलीस सावध राहा किंवा रस्त्यावर झोपू नका म्हणून सांगू लागली. पण एकटा माणूस मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर झोपलेला माणूस दिसला कि त्याची हत्या तो सायको किलर करायचा.
पोलीस रेकॉर्डनुसार हे १३ खून त्याच माणसाने केले असावे असा संशय होता कारण दगड आणि हत्येचा पॅटर्न सेम होता. पुढे रात्रीच्या गस्ता पोलिसांनी वाढवल्या आणि प्रत्येक फुटपाथवर, रस्त्यांवर पोलीस नजरा ठेवू लागले. अचानकपणे हे खुनसत्र थांबलं. पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आता मुंबईतल्या हत्या थांबून १९८९ मध्ये कोलकाता शहरात हे खुनसत्र सुरु झालं. जस मुंबईत घडत होत तसंच कोलकातामध्ये घडू लागलं. दगडाने हत्या तेही रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या माणसांची. या सायको किलरला कोलकाता पोलिसांनी नाव दिलं
स्टोनमन
या स्टोनमनने सहा महिन्यात इतकी जबरी दहशत बसवली होती कि लोक रात्री घराबाहेर पडायलासुद्धा घाबरत होते. पोलिसांच्या अंदाजानुसार मुंबईतून हा स्टोनमन कोलकाता शहरात आला आहे. सहा महिन्यात कोलकातामध्ये १३ मर्डर या स्टोनमनने केले. इतक्या भीषण अवस्थेत मृतदेह सापडायचे कि पोलिसांना ओळख पटवणं देखील नामुष्कीचं जपून जायचं.
सगळ्या पोलीस यंत्रणा या स्टोनमनच्या मागावर राहू लागल्या. मुंबईत जास्तीची गस्त घालून हत्या रोखण्यात यश आलं तसाच प्रयत्न कोलकातामध्ये झाला. पण या हत्या कोण करतंय, कशासाठी करतंय याच उत्तर कुणाकडेच नव्हतं. अखेर अचानकपणे हे हत्या सत्र बंद झालं.
भारताच्या दोन मोठ्या शहरांमध्ये इतके बळी घेऊन स्टोनमन अचानक गायब झाला आणि पुन्हा कुठे उगवलाच नाही. ना या घटनेत कोणी संशयित सापडला ना आरोपी सापडला. बराच काळ या दोन शहरातील पोलीस यंत्रणा या स्टोनमनला शोधण्यात व्यस्त होती पण हत्या थांबल्या आणि स्टोनमनचा शोधही थांबला. पण स्टोनमन काय कुणाच्या हाती लागला नाही.
या सत्य घटनेवर आधारित २००९ साली स्टोनमन मर्डर्स नावाचा चित्रपट आला होता. केके मेनन आणि अरबाज खान यात मुख्य भूमिकेत होते.
हे हि वाच भिडू :
- एका सामान्य तरुणाने बीआरए टोळीच्या म्होरक्याची हत्या घडवून आणली होती.
- सायनाइड किलर : पोलीसांच्या मते केम्पम्माने सायनाइड वापरून २० हून अधिक खून केले
- पथ नाट्य सादर करणाऱ्या नाटककाराची काँग्रेस नेत्यांनी भररस्त्यात हत्या केली होती.
- अंडरवर्ल्डचा अमजद खान, याच्या हत्येचा बदला म्हणून शर्मांनी राजनची निम्मी गॅंग संपवली..