तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं. 

“वर्षा बंगला” मुख्यमंत्री पदाचं शासकिय निवासस्थान. निवडणुक झाली की हा बंगला कोणाला मिळणार याच्या चर्चा घुमू लागतात. चर्चा करण्यासारखा बंगला देखील आहेच की. असो तर या बंगल्यानं या वर्षी विठ्ठलाची पूजा पाहिली. कधीकाळी याच बंगल्याने सत्यसाईंचा पदस्पर्श देखील अनुभवला.

चुकून भितींना खरच कान असते तर ? वर्षा बंगल्याच्या भितींना आज जागतिक वारसा म्हणून घोषित करावं लागलं असत !! 

एक ना धड अनेक गोष्टी आपण डोळे झाकून मंत्र्यांच्या बंगल्यांवर बोलू शकतो. असो सध्यातरी शासकिय निवासस्थान विकत घेता येत नाहीत म्हणून “वर्षा” बंगला महाराष्ट्रातला सर्वात महाग बंगला म्हणून घोषित करायला हरकत नाही.  

तर याच “वर्षा” आणि वर्षाच्या आजूबाजूचे काही जबरदस्त किस्से आपल्या भिडू लोकांसाठी ! 

वर्षा बंगला हे तस अधिकृत स्थान नव्हतचं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व दूसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे वर्षावर रहात नव्हते. वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांच अधिकृत निवासस्थान होण्याची प्रथा हि वसंतराव नाईकांपासून सुरू झाली.

एका हातात पाईप असणारे वसंतराव हे स्टाईलीश व्यक्तीमत्व होते. आपल्या स्टाईसप्रमाणेच आपला बंगला देखणा असावा अशी त्यांची इच्छा असावी. म्हणूनच त्यांनी वर्षाची निवड केली. दूसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानातच रहात असताना मारोतराव कन्नमवार यांच निधन झाल्यानं वसंतराव नाईकांनी वर्षा बंगल्याचा प्राधान्य दिलं गेल्याचं सांगितलं जातं.

तिथूनच मुख्यमंत्री आणि वर्षा बंगला हे समीकरण दृढ झालं. 

शरद पवार का गेले नव्हते ‘वर्षा’वर रहायला ! 

पुलोद करुन शरद पवार मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार त्यांनी अवघ्या ३८ व्या वर्षी हातात घेतला. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या अगोदर ते दादांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री होते. उद्योगमंत्री म्हणून त्यांना रामटेक बंगला देण्यात आला होता. रामटेक बंगला हा आजही राज्यातल्या दूसऱ्या क्रमांकाचा अतीमहत्वाचा बंगला म्हणूनच ओळखला जातो.  याच बंगल्यात तेव्हा शरद पवारांच वास्तव्य होतं.

शरद पवार मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी वर्षावर जाण्यास नकार दिला.कारण अस सांगितलं जातं की, शरद पवार म्हणाले होते

हा रामटेक माझ्यासाठी लकी आहे. मी रामटेकवरच राहिलं.

आत्ता मुख्यमंत्री नसताना देखील वर्षावर जाण्याचा मान मिऴाला तो पुलोद सरकारमध्ये जेष्ठ म्हणून उत्तमराव पाटील यांना. शरद पवारांनी  रामटेकवर राहणचं पसंद केलं तर उत्तमराव पाटलांनी महसुल मंत्री असून देखील वर्षावर राहण्याचा मान मिळवलां. 

जेव्हा ‘वर्षा’च नामांतर रायगड करण्यात आलं. 

वर्षा बंगल्याशी निगडीत असणारा तितकाच मजेशीर किस्सा म्हणजे वर्षा बंगल्याच्या नामांतराचा. खूप कमी लोकांना चटकन बाबासाहेब भोसलेंच नाव आठवतं. बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले आणि वर्षाच्या नामांतराचा नवा विषय राज्याला अनुभवायला मिळाला. 

बाबासाहेब भोसले म्हणाले,

“वर्षा नाव योग्य नाही. या बंगल्याला रायगड नाव असावं.”

ते मुख्यमंत्री होते आणि विषय त्यांच्याच बंगल्याचा होता. “रायगड” नाव बंगल्यासाठी देण्यात देखील आलं. आत्ता वर्षा बंगला रायगड नावाने ओळखला जावू लागला. बाबासाहेब भोसलेंच्या या निर्णयावर मात्र चौफेर टिका झाली. बाबासाहेब भोसले स्वत:ला छत्रपती मानू लागले आहेत काय ? असे प्रश्न देखील विचारण्यात आले मात्र ते बाबासाहेब भोसले होते. टिकांचा परिणाम त्यांच्यावर होत नसे.

त्यानंतर वसंतराव दादा मुख्यमंत्री म्हणून आले. दिखाव्यापेक्षा कामाला महत्व देणं हा दादांचा स्वभाव होता. त्यांनी तात्काळ वर्षा हे पुर्वीचच नाव बंगल्यास काय ठेवलं. 

त्यानंतर काय ? असे छोटेमोठ्ठे किस्से वर्षांच्या बाबतीत घडतच असतात ! आमच्या हाती जे सापडलं ते तुम्हाला सांगितलं तुमच्या हाती देखील असे किस्से सापडले तर पाठवा की bolbhidu1@gmail.com वरती आम्ही आहोतच छापायला ! 

हे ही वाच भिडू – 

Leave A Reply

Your email address will not be published.