कथा आश्रमशाळेच्या जन्माची !!!!
पंडित नेहरू एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी जे अनुभवलं त्यातून भारतात आश्रमशाळा उभा करण्यास मदत झाली. –
ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी हे सर्वोदयी विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधीच्या विचारांतून घडलेल्या या नेत्यांनी नेहमीच गरिबांचा विचार केला. महात्मा गांधीच्या रचनात्मक कार्यावर त्यांचा भर होता. त्यांच्या पत्नी मालतीदेवी चौधरी यांनी देखील पतीच्या या कामात नेहमीच पुढाकार घेतला होता. ओरिसाती दुर्गम व आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारं हे दांपत्य.
त्यांच्या कामांची सुरवात झाली ती आदिवासी व दुर्गम भागातीव विद्यार्थाना शिक्षणाची संधी निर्माण करुन. आजही ओरिसा सारख्या राज्यात वाहतुकीच्या सोयी नसतील तर तेव्हाच्या काळात त्यांच स्वरुप कस असेल याचा विचार आपण करु शकतो. याचा विचार या दांपत्यानं केला आणि आदिवासी मुलांना निवासी शाळांची सोय करावी अशी कल्पना या दोघांच्या मनात आली. नभकृष्ण चौधरी यांच्या पत्नीने या उपक्रमात पुढाकार घेवून निवासी शाळा चालवण्यास सुरवात केली.
दुर्गम भागातून मुले या निवासी शाळांमध्ये भरती होवू लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यन्त ही मुले यांच शिक्षकांच्या सहवासात राहत असत. एकत्र भोजन करत असत. सफाई, शेतीकाम, ग्रामोद्योग, यांसारख्या कामांमध्ये शिक्षक व मुले दोन्हीही तितक्याच आत्मियतेने सहभागी होत असत. मालतीदेवी देखील या कामांतच रमत. त्यांचे पती आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी देखील भुवनेश्वर येथील निवास्थानातून वेळ मिळताच या ठिकाणी येत. मुलांच्यात रमत असत. याच दरम्यानच्या एका भेटीत त्यांनी शिक्षकांना सांगितल होतं की, “ निवासी शाळांमधील वातावरण हे गांधीजींच्या आश्रमाप्रमाणे आहे. त्यामुळे यास निवासी शाळा न म्हणता आपण आश्रमशाळा म्हणायला हवे”
शिक्षकांच्या आणि विद्यार्थांच्या श्रमाला जिथे प्रतिष्ठा मिळते तो आश्रम असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. पुढे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे ओरिसा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी यांनी त्यांना आश्रमशाळा पाहण्यास नेले. आश्रमशाळांचा परिसर पाहताच पंडित नेहरू या परिसराच्या प्रेमात पडले. त्यांनी संपुर्ण दिवस या आश्रमशाळेतच घालवला.
पुढे दिल्लीत येताच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलवली व मुख्यमंत्री नभकृष्ण चौधरी यांनी चालू केलेल्या आश्रमशाळांची माहिती मंत्रीमंडळापुढे मांडली. संबधीत राज्यांना पंडित नेहरूंनी अशा प्रकारच्या आश्रमशाळा सुरू करण्याची विनंती केली. आणि देशभर आश्रमशाळा निर्माण करण्याची योजना तयार झाली.