सध्या बॉलीवुडचा फ्लॉप शो सुरुये.. पण पूर्वी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला पिक्चर पण सुपरहिट ठरला होता

सध्या बॉलीवुड वाल्यांची बोबडी वळल्यागत वाटाय लागलय. गड्यांचे पिक्चरच चालेना. एखादा पिक्चर येतो लईत लई 2 दिवस चर्चा होते मग काय विषयच नसतो. पिक्चरची काय हवा नसते का कसली खळबळ नसते. स्टार मंडळी 2-4 दिवस प्रोमो बिमोला जातात आणि परत आपले जिममध्ये घाम गाळायला लागतात.

त्यात ह्या टॉलीवुड वाल्यांनी सगळ्यांचा बाजारच उठवलाय. रिलीजनंतर दोन दिवसांत ह्यांचे आकडे 200 आणि 400 कोटींच्या घरात पोचलेले असतात.

आता हे सगळं झालं आत्ताचं. पण पूर्वीच्या एका बॉलीवुडच्या निर्मात्याने पिक्चर फ्लॉप होण्यासाठी म्हणून काढला होता असं जर आता तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला पटेल काय…? तर नाय पटणार. पण न पटून सांगताय कोणाला? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार नाय तर कोणावर?

आम्ही आहोत ना, पिक्चरचा अख्खा इतिहास सांगायला.

आता निर्मात्याचं नाव सांगितलं तर तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवणं जरा सोप्पं होईल. कारण हा निर्माता आहेच अवलिया, त्याची आई त्याला लहानपणी कार्ट म्हणत असणार, फिक्स.

असो, तर ह्या निर्मात्याचं नाव, लिजेंडरी किशोर कुमार. आणि अजून ससपेन्स न वाढवता सांगते, पिक्चरचं नाव, चलती का नाम गाडी. जो पिक्चर फ्लॉप व्हावा अशी निर्मात्याची इच्छा होती आणि पिक्चर ठरला होता ऑल टाइम हिट.

पण निर्मात्याची, पिक्चर फ्लॉप व्हावा अशी इच्छा का बरं असावी? सांगते.

तर हा चलती का नाम गाडी पिक्चर आला १९५८ साली. रिलीज झाला १ जानेवारीला. पिक्चरमध्ये तीन गांगुली बंधूंची मजा दाखवलीये आणि सोबत मधुबालाची जीवघेणी अदा.

आता मधुबाला सिनेमात आहे म्हटल्यावर सिनेमा फ्लॉप कसा काय होणार हा प्रश्न किशोर कुमार ला पडायला पाहिजे होता पण असो.

सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं सत्येन बोस यांनी. हा सिनेमा आधी कमल मुझुमदार दिग्दर्शित करणार होते. पण आयत्या वेळी त्यांचा म्हणे कॉन्फिडंस हलला आणि शूटिंगच्या पहिल्याच दिवशी किशोर कुमारने सत्येन बोस यांना डायरेक्ट, डायरेक्टरच्या खुर्चीत आणून बसवलं. किशोर कुमारचा नादच नाय. शिवाय त्यांना पिक्चर चालवायचाच नव्हता, त्यामुळे काय.. फार कशासाठी कष्ट म्हणून कोणी घेत नव्हतं.

तर हा पिक्चर बनवला गेला होता लॉस दाखवण्यासाठी. हा पिक्चर फ्लॉप व्हावा जेणेकरून आयकर खात्याला तोटा दाखवता येईल अशी किशोर कुमारची इच्छा आणि भन्नाट आयडिया होती.

त्यासाठी त्याने बंगली भाषेतला ‘लुकाछोरी’ आणि हिंदी भाषेतला ‘चलती का नाम गाडी’ हे दोन सिनेमे बनवायचं ठरवलं. आता त्या लुकाछोरीचं पुढं काय झालं काय माहीत नाही पण चलती का नाम गाडीचं उलटच झालं.

चलती का नाम गाडी तूफान गाजला, सुपरहिट झाला. १९५८ ह्या वर्षातल्या हिट सिनेमांच्या यादीत तो दुसऱ्या नंबरवरचा बॉक्स ऑफिस हिट ठरला.

मग किशोर कुमारने या सिनेमाचे सगळे हक्क आपल्या सेक्रेटरीला म्हणजेच अनूप शर्माला विकून टाकले.

तगडी स्टार कास्ट आणि धमाल स्टोरी लाइन ह्या दोन्ही गोष्टींमुळे तर पिक्चर हिट झालाच पण अजून एक गोष्ट ह्या पिक्चरला खास बनवते ती  म्हणजे पिक्चर मधली एक से बढकर एक गाणी.. 

बाबू समजो इशारे, पांच रुपैय्या  बारा आना, हाल कैसा है जनाब का.. नुसती गाण्यांची नावं घेतली तरी आपसूक आपण ती चालीत गुणगुणायला लागतो आणि इतकी ती आजही तोंडात बसलेली आहेत.

तर असा हा मजा मस्ती करत, फ्लॉप होण्यासाठी म्हणून बनवलेला ‘चलती का नाम गाडी’ सिनेमा नंतर पुढे एक क्लासिक कॉमेडी ठरला.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.