खरंच हा हस्तर नावाचा दैत्य आपल्या पुराणकथांमध्ये होता…?

पूर्ती कि देवी, अंतहीन सोनें और अनाज का प्रतीक है। और ये ‘प्रिथ्वी’ देवी कि कोंक है। जब ब्रम्हांड कि शुरुवात हुई, तो देवी ने ईसी कोंक से सोला करोड देवीदेवताओं को जन्म दिया, पर देवी को सबसे ज्यादा प्यार था अपनी पहिली संतान सें… हस्तर सें..

२०१८ साली आलेल्या तुंबाड या पिक्चर मधला अंगावर काटा आणणारा डायलॉग. हॉरर कॅटेगरीत मोडणारा असा काल्पनिक भयपट आणि थरारक दृश्यांनी खिळवून ठेवणाऱ्या या पिक्चरची स्टोरी हस्तर या दानवाभोवती फिरत असते. पिक्चरची स्टोरी बघताना तर काल्पनिकच वाटते.

पण तुमच्या मनाला चुकून हा विचार कधी शिवला का? कि खरंच हा हस्तर नावाचा दैत्य आपल्या पुराणकथांमध्ये होता किंवा हे तुंबाड नावाचं गाव खरंच असेल. चला तर मग आज या हस्तरची आणि तुंबाड गावची थोडी माहिती घेऊ. 

थोडासा फिल्मी तडका

पिक्चरची स्टोरी आहे तुंबाड आणि हस्तर नावाच्या एका दैत्यावर आधारित. स्वातंत्र्याच्या आधीची हि कथा तुंबाड या गावात राहणाऱ्या सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक आणि विधवा आई यांच्या भोवती फिरते. हे कुटुंब शाप आणि उ:शाप यांच्या फेऱ्यामध्ये अडकलेल असत.

एका मोठ्या वाड्यामध्ये सदाशिवची आई आपल्या वयस्कर सासऱ्यांची सेवा करत असते. तर दुसरीकडे सदाशिव, विनायक एका लहानशा झोपडीमध्ये राहत असून त्यांच्या आजीला त्यांनी एका विशिष्ट जागी साखळदंडाने बांधून ठेवलं असतं. ही आजी एक राक्षस असून ती केवळ ‘हस्तर’ या एकाच नावाला प्रचंड घाबरत असते.

आता हा हस्तर म्हणजे नेमका कोण …

तर हा देवाच्या दोन मुलांपैकी एक..  हस्तर असं नाव असलेला महाभयंकर त्रास देणारा आणि अजस्र भूक असणारा मुलगा होता. त्यामुळे सगळे त्याला लांब ठेवायचे. त्याचं कधीही मंदिर बांधण्यात आलं नाही.

मात्र महाराष्ट्रातल्या तुंबाड गावात मात्र या राव कुटुंबाच्या वाड्यात त्या जमीनदाराने या हस्तरचं मंदिर बांधलं आणि तिथे हस्तर राहतो असा समज आहे. शिवाय तिथे सोन्याचा खजिना दडल्याचंही बोललं जातं, पण हस्तरच्या भयाने तिथे कोणीही जात नाही आणि मग काय होतं त्या खजिन्याचं, तो कोणाला मिळतो, त्या वाड्याचं गुपीत काय असतं आणि कसं शोधलं जातं याची स्टोरी ‘तुंबाड’ या पिक्चर मध्ये रंगवली आहे. आता तो पिक्चर तुम्ही पहिलाच असाल.

पण हस्तर नक्की कोण होता? त्याची आख्यायिका कितपत सत्य आहे? भारतीय  पौराणिक कथांमध्ये हस्तर कुठे दडला आहे? खरच तुंबाड नावाचं गाव असेल तर मग तिथे असणाऱ्या वाड्यात गुप्त खजिना असेल का?  या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी हस्तर कुठून आला हे गुपित उलगडवूया.. 

 तुंबड येथून हस्तरचे मूळ

तुंबाड या चित्रपटाच्या मते, ही हस्तकल्पित कथा आहे. जग समृद्धीच्या देवीने तयार केले, ज्याने 16 कोटी देवी-देवतांना जन्म दिला. पृथ्वी हा तिचा गर्भ होता आणि तिच्या गर्भात सोन्याचे व धान्याचे मोठे साठे होते. या गर्भाशयातून तिने पहिला जन्म दिला हस्तरला, तिच्या आवडत्या संतानाला.

हस्तरचा जन्म जरी देवीच्या पोटी  झाला, तरी हस्तर हा अत्यंत स्वार्थी आणि धूर्त होता. त्याला देवीच्या गर्भातून मिळणाऱ्या संपत्तीवर नियंत्रण मिळवायचे होते. त्याने देवीचे सोने तर लुबाडले पण जेव्हा तो धान्य मिळविण्यासाठी हालचाल करू लागला तेव्हा त्याच्या 16 कोटी भावंडांनी त्याच्यासोबत युद्ध घोषित केले. दुर्बल असलेला हस्तर भावंडांचे हल्ले परतवून लावण्यास जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा समृद्धीची देवी म्हणजेच त्याची आई, त्याला वाचवते. त्याच रक्षण करण्यासाठी ती त्याला तिच्या गर्भात लपवून ठेवते.

या सगळ्यात हस्तरला त्याच्या स्वार्थाची एक किंमत मोजावी लागली. ती म्हणजे भूतलावर इतर देवी देवतांप्रमाणे त्याची उपासना केली जाणार नाही. तसंच सर्व पुराणांमधून त्याच नाव वगळण्यात आलं.

भारतीय पौराणिक कथांमध्ये हस्तरचा उल्लेख आढळतो का?

तुंबाडच्या कथेत हस्तरला हिंदू देवता मानन्यात आले असले तरी ही भारतीय पुराणकथेत हस्तरचा उल्लेख आजवर तरी आढळलेला नाही. हस्तरचे आयुष्य वाचविण्याच्या बदल्यात देवांच्या घातलेल्या अटींनुसार, भारतीय पुराणकथांमधील हस्तरचे सर्व उल्लेख खोडून टाकण्यात आले असावेत.

पण भारतीय हस्तरची कथा आणि टायटन्सची ग्रीक पौराणिक दंतकथा यांमध्ये बरेच साम्य आढळून आले आहे. हस्तर आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट ग्रीक देव-देवतांशी जुळते. ग्रीक पुराणकथेत ऑलिम्पियन्स नंतर टायटन्स राज्य करू लागले. त्यावेळी तुंबाडची देवी समृद्धी जशी आहे तशी  ग्रीक देवी मदर गाया असते.  क्रोनस हा तिचा पुत्र टायटन्सचा पुढारी असतो, पण त्याच्या हस्तर सारख्या स्वभावामुळे अखेरीस त्याचा स्वतःचा मुलगा झियस त्याला मृत्यूदंड देतो.

आणखी एक पौराणिक कथा आहे ज्यात हस्तरसारखे साम्य असलेला देव आढळतो. तो म्हणजे मॅमन. ज्याची कथा आपल्याला बायबलच्या नवीन करारामध्ये वाचायला मिळते. मॅमनचा हिब्रू भाषेतील अर्थ आहे भौतिक वस्तूंचा देव किंवा पैशांचा देवता. हा मॅमन लोभी लोकांना पैशाचे अमिश दाखवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात तुंबाड नावाचे गाव वास्तवात आहे का?

होय, तुंबाड नावाचे गाव महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात रत्नागिरीच्या खेड जिल्ह्यात हे गाव आहे. तुंबाड मुंबईपासून साडेसहा तास आणि कोयना वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. प्रत्यक्षात असलेल्या तुंबाड गावची, पिक्चरच्या स्टोरीनुसार कोणतीही पार्श्वभूमी नसली तरी ‘तुंबाडचे खोत’ नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे.

प्रख्यात मराठी कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांनी लिहिलेली ती कादंबरी आहे. आणि विशेष म्हणजे या कादंबरीत आणि तुंबाड या चित्रपटात एकाच कुटुंबातील अनेक पिढ्यांचा प्रवास दाखवला आहे. गावातल्या स्थानिकांमध्ये अशी वंद्यता आहे की, वाड्यात राहणाऱ्या पूर्वजांनी दैवी शक्तीच्या आधारे संपत्ती खजिना मिळवला असून तो वाड्याच्या तळघरात पुरून ठेवला आहे. आता तुंबाड गाव आणि हा खजिना यांचा संबंध म्हणजे निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. अमोल says

    हस्तर नाही पण आमच्या आयुष्यात मास्तर नावाचा दैत्य होता.

Leave A Reply

Your email address will not be published.