खुन्या मुरलीधराला वाचवण्यासाठी, अरब सैनिकांनी ब्रिटीश जवानांचे खून केले होते.

लेख वाचण्यास सुरवात करण्यापुर्वी विशेष संपादकिय सुचना, सदरचा लेख अस्सल(भाडेकरु) पुणेकरांने लिहला आहे. ते भिडू स्वत:ला पुणेकर समजून घेतात पण ते कधीच दुपारचे झोपलेले आढळले नाहीत. त्यांचा स्वाभीमान दुखावू नये म्हणून फक्त कंसात भाडेकरु असा प्रयोग करण्यात आलेला आहे.

हल्ली पुर्वीच पुणे राहिलं नाही, पुर्वीची पेठेची भाषाही राहिली नाही अस म्हणून आम्हाला टोमणे मारू नये म्हणून हि अधिकची सुचना.

सुरवात करा (भाडेकरु) पुणेकरांचा लेख वाचायला.

तर तुम्हाला फक्त आमच्या पाट्याच माहिती आहेत. तुम्हाला भांग्या मारुती, उपाशी विठोबा, गुंडाचा गणपती, जिलब्या मारुती, डुल्या मारुती,खुन्या मुरलीधर, दाढीवाला दत्त ,निवडूंगा विठोबा माहिती आहेत का?

नसणारच हो माहिती.

कारण आम्ही (भाडेकरू) पुणेकर कोणाला माहिती सांगायला बांधीलच नसतो.

तर होय. आमच्या सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर म्हणून एक मंदिर आहे. आता स्वतः घनश्याम मुरलीधर पुण्यात आल्यावर खुन्या कसा झाला? 

पेठेत तुम्हाला खूप जण खूप कथा सांगतील. कोण सांगेल चाफेकर बंधूची फितुरी करणाऱ्या हरामखोर गणेश शंकर द्रविडचा इथं खून केलेला, तर कोणी सांगेल की इंग्रजाचा खून करून वासुदेव बलवंत फडके इथे लपले होते.

अस्सल स्टोरी फक्त अस्सल (भाडेकरू) पुणेकरानाच माहिती असते. (स्थानिक पुणेकरांना वेळ नसतो).

तर झालं असं  की उत्तर पेशवाईचे दिवस होते. पेशव्यांचे एक सरदार होते सदाशिव नारायण गद्रे. आज शनिवार पेठेत जिथे अहिल्यादेवी मुलींची शाळा आहे न तिथे होता त्यांचा प्रचंड वाडा. असं म्हणतात खुद्द पेशव्यांना वेळप्रसंगी गद्रे पैसे कर्जाऊ द्यायचे.

तर अशा या सावकार सदाशिव गद्रयाला म्हणे एकदा रात्री स्वप्न पडल. स्वप्नात मुरलीधराने दृष्टांत दिला. दादा गद्रयाला चैन पडेना. त्याने स्वप्नात दिसलेल्या मुरलीधराच मन्दिर बनवायचं ठरवलं. 

जयपूरचा एक प्रसिद्ध शिल्पकार होता, बख्तराम त्याच नाव. या बख्तरामाला सांगितलं “बाबा अख्खं जग तोंडात बोट घालेल अशी मूर्ती बनव” आणि काय सांगू तुम्हांला , अहो हातात मुरली घेतलेला कान्हा आणि त्याच्यासोबत राधा यांची अप्रतिम देखणी मूर्ती त्याने घडवली. मुर्ती कोणत्याही आधाराशिवाय एक पाय व दुस-या पायाचा अंगठा यावर उभी 

बख्तरामला तब्बल दहा हजाराची बिदागी गद्रे सावकारने दिली. शुभ्र संगमरवरात घडवलेल्या या तेजस्वी मूर्तीच्या देखणेपणाच्या चर्चा श्रीमंत बाजीराव पेशवा दुसरे यांच्यापर्यंत  पोहचल्या. खाशास्वारीने दादा गद्रेला सांगितल,

” मुरलीधराची मूर्ती शनवारवाड्यास धाडन्याचे करावे.”

गद्रे सावकारास काय करावे कळेना. त्याने रातोरात मुर्त्या आपल्या सदाशिव पेठेतल्या बागेत हलवल्या. पेशव्यापासून मुरलीधराचे रक्षण करण्यासाठी २०० तगडे अरब सैनिक बागेच्या बाहेर उभे केले. अखेर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम ठरला. त्र्यंबकेश्वरीचे प्रकांडपंडीत वेदमूर्ती नारायणभट्ट खरेना विधीसाठी पाचारण करण्यात आले. 

चैत्र वद्य द्वादशी शके १७१९ म्हणजेच १३ एप्रिल १७९७ रोजी भल्या पहाटे मंत्रोच्चारात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. 

इकडे बाजीरावचं पित्त खवळल. सावकाराने खुद्द पेशव्याचा अवमान केला होता. पेशव्यांनी कप्तान बॉयडच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश तैनाती तुकडी गद्रयांच्या बागेवर धाडली. मुसलमान अरब जवान आणि ख्रिश्चन ब्रिटीश कवायती सैनिक यांच्यामध्ये मुरलीधर कृष्ण मुरारीसाठी तुंबळ युद्ध झाले. प्रचंड रक्तपात झाला.

मंदिराच्या दारात साठ सैनिकांचे खून पडले. याच कारणाने गद्रेच्या मुरलीधरास खुन्या मुरलीधर असे ओळखले जाऊ लागले.

पेशव्याला नडणाऱ्या गद्रे सावकाराला अहमदनगर तुरुंगात टाकण्यात आले. पुढे तेवीस वर्षांनी जेव्हा पेशवाई संपून टोपीकराचे राज्य आले तेव्हा गद्रेशेठ सुटले. बाहेर आल्यावर त्यांनी मुरलीधराची प्राणप्रतिष्ठा केली. मोठ्या थाटात मंदिर उभारले. काही वर्षांनी गद्रेनी मंदिर खरे भटजीच्या हवाली केले आणि स्वतः नाशिक त्र्यंबकेश्वरला निघून गेले.

आज खरेंची सहावी पिढी मुरलीधराची पूजाअर्चा सांभाळते.

रेखीव चिरेबंदी प्रवेशद्वार, काताळातील गाभारा,कोरीव लाकडी सभामंडप,त्या गरुड भामंडपात असलेले राजा रवी वर्म्याने रंगवलेल्या तसबिरी पाहण्यासारखी आहेत. आज या मंदिराला लाकडी वासे लावून आधार दिलेला आहे. 

तर असा आहे खुन्या मुरलीधराचा इतिहास. परत कधी वेळ मिळाला तर नारायण पेठेतल्या मोदी गणपतीचा इतिहास सांगतो. कोणीतरी योगी म्हणे गावाचं नाव बदलतोय. तो पुण्याच्या देवांच नाव बदलन्याआधी खरा इतिहास सगळ्यापर्यंत पोहचवू. काय म्हणता? 

. सच्चा (भाडेकरू) पुणेकर.  

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Kunal More says

    अस्सल पुणेरी हो

Leave A Reply

Your email address will not be published.