पवारांना पावला, मुंडेना लाभला, भुजबळ-खडसेंसाठी गंडला तोच बंगला केसरकरांकडे…  

मुंबईच्या दुनियेत जितका राडा मंत्रीपद मिळाल्यानंतर होतो तितकाच राडा बंगल्यावरून होतो. नाही म्हणायला इथे किती मंत्री राहतात असा प्रश्न पडू शकतो पण खरच अनेक बंगल्यात मंत्री राहतात. कार्यकर्ते गावाकडून त्यांना भेटायला येतात ते इथेच. 

पण स्टोरीला लांबड लावणं हा आपला विषय नाही, विषय आहे तो म्हणजे या बंगल्यात सगळ्यात खास असलेल्या रामटेक बंगल्याचा.

मंत्र्यांना बंगले वाटण्यात आले. पण सर्वात खास म्हणजे रामटेक बंगला, हा बंगला आत्ता दिपक केसरकर यांच्या वाट्याला आला आहे. यापूर्वी हा बंगला छगन भुजबळ यांच्याकडे होता. 

वर्षा प्रमाणेच हा बंगला भरपूर मोठ्ठा आहे. सि फेसिंग असल्याने प्रशस्त आहे. पण या बंगल्याची सर्वाधिक चर्चा झाली होती ती एका उद्योगमंत्र्यांनी केलेल्या कार्यक्रमानंतर. झालेलं अस की वसंतदादांच्या मंत्रीमंडळात शरद पवार उद्योगमंत्री होते. त्यांनी पुलोदचा निट्ट कार्यक्रम केला. आणि मुख्यमंत्री झाले. उद्योगमंत्री असताना ते या बंगल्यात रहायचे पण मुख्यंमंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा बंगला सोडला नाही. रामटेक हाच आपला पत्ता मुख्यमंत्रीपदाच्या काळात कायम ठेवला. त्यामुळं शरद पवारांसाठी हा बंगला एकदम करेक्ट ठरला.. 

त्यानंतर या बंगल्यात मुक्काम पडला तो गोपीनाथ मुंडे यांचा.

राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून 1995 साली त्यांच्याकडे कारभार आला. तेव्हा गोपीनाथ मुंडेच्या वाट्याला या बंगल्याच्या किल्ल्या आल्या. अस सांगतात की गोपीनाथ मुंडेंनी हा बंगला हक्काने मागून घेतला होता. तस म्हणायला हा बंगला मुंडेना पावला पण आणि नाही पावला पण. कारण गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी चांगली ठरली. राज्यभर त्यांच्या काळात भाजप विस्तारली. मुंबईतलं अंडरवर्ल्ड त्यांनी धक्क्याला लावलं पण व्यक्तिगत आयुष्यात, विशेषत: त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे याच बंगल्यात वास्तव असताना पडले. 

मुंडे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ या बंगल्यात आले.

रामटेक आणि भुजबळ यांच नातं कितीही कटूता आली तरी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचू करमेना असं राहिलं. कारण रामटेकमध्ये असतानाच भुजबळांच नाव तेलगी घोटाळ्यात आलं. 

आत्ता सत्ता आली ती भाजपची. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत या बंगल्यात महसूल मंत्री म्हणून रहायला आले ते एकनाथ खडसे. खडसेंना धक्क्याला लागावं लागलं ते याचं बंगल्यात. दिड एक वर्षातच खडसेंवर आरोप होवू लागले. राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर हुकलेली संधी हुकलेलीच राहिली. अस सांगतात की खडसेंनी रामटेकची शांती देखील घातली होती. पण तोपर्यन्त खडसेंची गाडी धक्क्याला लागली होती. 

त्यानंतर आत्ताच्या महाविकास आघाडीच्या काळात छगन भुजबळ रामटेकमध्ये रहायचे.

भुजबळांना बंगला विशेष लाभला नाही तरिही भुजबळांचा हा आवडता बंगला असल्याचं सांगण्यात येतं. 

आत्ता हा बंगला आलाय तो दिपक केसरकर यांच्या ताब्यात.

पवार-मुंडे-खडसे-भुजबळ यांच्याकडे असणारा बंगला आपल्याकडे आल्याने केसरकर खुष असतील. तर केसरकर कधी धक्क्याला लागतील याची वाट बघणारे विरोधक बंगल्याकडं बघून एकवार नजर मारतं म्हणतील, बघा तुम्हाला तर काय जमतय का? 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.